Tag Archive: Movie


15241905_1190797534348300_1538772655171383849_n

सौजन्य – फेसबुक – Code Mantra

तीस एक वर्षांपूर्वीची अमेरिकेतली एक घटना, त्यावर आधारीत नाटक, तीच घटना पुन्हा सांगणारा २४ वर्षांपूर्वीचा सिनेमा… हे सारं भारतीय रंगभूमीवर आधी गुजरातीत आणि मग मराठीमध्ये आणणं, त्याला भारतीय रूप चढवणं ही गोष्ट सोपी नाही. पण ‘कोडमंत्र’च्या टीमनं हे साकार करून दाखवलं आहे.

काल रात्रीच मी हे नाटक पाहिलं. मला नाटक पाहायला फारसा वेळ मिळत नाही. अनेकांनी आग्रह केल्यामुळंच वेळ काढून काल हे नाटक पाहायला गेले होते आणि खरं तर अजूनही त्या ट्रान्समधून बाहेर आलेले नाही.  (Thank you, Neelima and Poorti)

मूळात ‘A Few Good Men’ हा माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. (त्यात टॉम क्रूझ असला, तरीही.) ग्वांटानामो बेमधल्या एका घटनेनंतरच्या कोर्ट मार्शलवर आधारीत या चित्रपटाची मी अनेक पारायणं केली आहेत. त्यानंतर मूळ नाटकाच्या व्हीडियो क्लिप्सही पाहिल्या आहेत. एनबीसी लाईव्हवर ते नाटक सादर करण्यात आलं होतं, त्याची रेकॉर्डिंग्जही पाहिली आहेत.

अॅरॉन सॉर्किनची ही कलाकृती १९८९ साली रंगभूमीवर आणि १९९२ साली रुपेरी पडद्यावर आली होती. पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला होता, तेव्हा त्याचं गांभीर्य समजण्याचं माझं वय नव्हतं. पण पुढच्या दशकभरात जग बदलत गेलं, संदर्भ बदलत गेले, युद्धांचा, राजकारणाचा अभ्यास करू लागले आणि हा चित्रपट आणखी भावत गेला.

कधीकधी एखादी कलाकृती काळ बदलला की आणखी relevant बनते. तसंच सॉर्किनच्या या नाटकाचं झालं.

अमेरिकेनं गेल्या दशकात दोन मोठी युद्ध छेडली आणि त्यांच्या देशातली हजारो तरुण मुलं-मुली सैनिक बनून युद्धभूमीवर उतरली. युद्धाची भाषाही बदलत गेली. अबू घरेब तुरुंगातल्या घटना असोत वा ग्वांटानामो बेमधील प्रसंग- सत्ता आणि सैन्यसत्तेची काळी बाजू जगासमोर आली. जगातल्या सर्वात ताकदवान सैन्यदलात – अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सच्या बाबतीत जे घडू शकतं, ते इतर कुठेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेनादलातील जवानांविषयी, अधिकाऱ्यांविषयी आम्हा सामान्यांच्या मनात आदर, आणि सुप्त आकर्षणाची भावना असते. पण एखाद्या जवानाच्या कर्तव्य आणि त्यागाचं glorification करताना त्याच्या पोलादी रूपाआडच्या माणसाचा आपल्याला विसर पडतो. तो माणूस आहे म्हणून त्याला भावना आहेत आणि तो माणूस आहे म्हणूनच तो चुकू शकतो. (इथं तो म्हणजे तो आणि ती दोघंही, हेही स्पष्ट करते)

भारतासारख्या देशात जिथं सैनिक म्हणजे त्याग आणि कर्तव्य हे गृहित धरलं जातं, जिथं युद्ध सुरू करा आणि एकदाचं चिरडून टाका शत्रूला अशी भाषा सर्रास वापरली जाते, तिथं सैनिकाचा माणूस म्हणून विचार करणारे फार कमी आहेत. एखादा जवान शहीद झाल्यावरच त्याच्याविषयीचं प्रेम उफाळून येतं आणि शहिदाची चिता थंड होण्याआतच अनेकांना त्याचा विसरही पडतो.

म्हणूनच ‘कोडमंत्र’ नाटकाविषयी थेट लिहिण्याआधी, मला या परिस्थितीवर भाष्य करावंसं वाटलं. आंधळ्या-उथळ देशभक्तीची शाल अधूनमधून पांघरणाऱ्यांनी हे नाटक जरूर पाहायला हवं.

आणि तुम्ही माझ्यासारखंच  A few Good men पाहिला असेल, तर नक्कीच हे नाटक पाहा. विषय आणि कथानकात साम्य असलं, तरी ही कथा वेगळी आहे, भारतीय मातीतली आहे आणि तिचा क्लायमॅक्सही वेगळा आहे. थोडासा मेलोड्रॅमॅटिक, पण मराठी मनांना रुचेल असाच. भाषांतरीत-रूपांतरीत कलाकृतींना येणाऱ्या मर्यादांवर या नाटकानं मात केली आहे. आधी इंग्रजीतून स्नेहा देसाईंनी गुजरातीमध्ये आणि मग विजय निकम यांनी मराठीमध्ये आणलेली संहिता, त्यातलं साहित्यिक मूल्य कुठंही कमी होत नाही. आणि अभिनय तर अप्रतिमच. विशेषतः मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांनी जीवंत केलेल्या व्यक्तीरेखा अंगावर काटा आणतील अशाच.

मुक्ताचं कौतुक मी काय करावं? एवढंच सांगेन, की आता पुन्हा चित्रपट पाहिला, तर टॉम क्रूझ ऐवजी मला तिथं मुक्ता आणि मुक्ताच दिसेल. खरं तर अशी कुठल्याच कलाकारांची तुलना करायची नसते, पण कधीकधी तो मोह आवरत नाही. चित्रपटात जॅक निकलसननं साकारलेली कर्नल जोसेपची भूमिका म्हणजे मराठी नाटकातलं कर्नल निंबाळकरांचं पात्र. अजय पूरकर हॅट्स ऑफ! 

जवळपास ५० कलाकारांचा संच, एक वेगळ्या धाटणीचं स्टेज आणि प्रकाशव्यवस्थेतून बदलत जाणाऱ्या भावना, हे सगळं प्रत्यक्षात अनुभवायला हवं असंच आहे.

मी गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये फँटम ऑफ द ऑपरा पाहिलं होतं, त्यानंतर थेट मराठी रंगभूमीवर कोडमंत्र.. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर इतकं भव्य काहीतरी उभं राहिलं आहे, ही गोष्ट खूप समाधान देणारी आहे.

जय हिंद!

(या नाटकाविषयी माझे विचार ऐकल्यावर एका आर्मी ऑफिसरनं हे नाटक म्हणजे काही बाबतींत अतिशयोक्ती आहे, मूळ घटना अमेरिकेतली आहे आणि भारतात असं काही होत नाही अशी टिप्पणी केली आहे. एवढंच सांगावसं वाटतं, की सैनिक कुठल्याही देशाचे असले, तरी त्यांचं जगणं फारसं वेगळं नसतं. intensity वेगळी असली तरी भावना सारख्या असू शकतात.)

Advertisements

कधी कधी आपण चूक ठरलो, याचा केवढा आनंद होतो! काल हे दोनदा झालं माझ्या बाबतीत. आधी एयर फ्रान्स विमानात बॉम्बची बातमी आणि मग बाजीराव मस्तानी. कालच हा चित्रपट पाहिला, काहीशी धाकधूक मनात ठेवूनच. I won’t say I loved the movie, but I did like it and that came as a surprise.

तसं आता बाजीराव मस्तानी चित्रपटाबद्दल खूप जणांनी खूप काही लिहून झालं आहे. तरीही मला जाणवलेले काही मुद्दे शेअर करावेसे वाटतात.

डिसक्लेमर – मी चिकित्सक स्वभावाची इतिहासप्रेमी आहे. ऐतिहासिक चित्रपट Accurate म्हणजे अचूक असावेत असा माझा अट्टाहास नाही. पण ते जास्तीत जास्त खरे म्हणजे Authentic वाटायला हवे, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. तसंच माझ्या पिढीच्या मराठी रसिकांवर राऊ, स्वामी अशा कादंबरी आणि मालिकांचा प्रभाव आहे. त्यामुळंच आम्ही अतिचिकित्सक बनलो आहोत. तेव्हा आमची समीक्षा खूप जास्त तांत्रिक झाली, तर तो योगायोग समजावा. 🙂

मसाले पदार्थाची चव वाढवतात. पण तोच अख्खा मसाला जेवताना दाताखाली आला, तर सगळी मजा जायची भीती असते. पण म्हणून हा पदार्थच वाईट ठरत नाही. बाजीराव मस्तानीमध्येही असेच काही खडे आहेत. तरीही आजच्या पिढीला बाजीरावांसारख्या योद्ध्याची ओळख करून दिली आहे या फिल्मनं हे लक्षात ठेवलं पाहीजे.

  • अभिनयाच्या बाबतीत काही सीन्स सोडले तर रणवीरला खरोखर सलाम.. तो इतरांपेक्षा वेगळा आणि थोड्या वरच्या दर्जाचा अभिनेता आहे, हे रणवीरनं पुन्हा सिद्ध केलंय. त्याची संवादफेक आणखी चांगली होऊ शकली असती, पण रणवीर शब्दांची भाषा विसरायला लावतो, यात शंका नाही.
  • दीपिका, प्रियांका तोडीस तोड आहेत. दीपिका नृत्यांगनेपेक्षा योद्धा आणि आईच्या रुपातील मस्तानीला जास्त न्याय देते. प्रियांकानं तुलनेनं दुय्यम भूमिकेला बरोबरीचं ठरवलं आहे. शिडशिडीत अंगकाठी सोडली, तर प्रियांका मराठीच वाटते बऱ्याच ठिकाणी. काय करणार, आमच्या डोक्यात पेशवीण म्हणून मृणाल कुलकर्णी घट्ट बसली आहे..
  • आणखी एक गोष्ट जाणवते. दीपिकाच्या मस्तानीसमोर काशीबाईंची भूमिका साकारेल, अशी कुणीच मराठी अभिनेत्री नव्हती का? खेदाची गोष्ट, म्हणजे असं एकही नाव सध्या तरी मला आठवत नाही. आणि इतर भाषिक अभिनेत्रींमध्ये प्रियांका सोडून इतर कुणाला ही भूमिका पेलवली असती, असं वाटत नाही.
  • सपोर्टिंग कास्टचा अभिनयही अफलातून आहे. तन्वी आझमीला तर दाद द्यायलाच हवी. दुसऱ्या पत्नीलाही सन्मान मिळावा म्हणून धडपडणाऱ्या मुलाविषयी वाटणारा अभिमान, समाज काय म्हणेल याचा विचार, आणि ही ब्यादच नको असा विचार करण्याचा बेरक्या स्वभाव.. So typical! मस्तच वठवलाय.
  • ‘अखंड भारत’ नावाचं प्रकरण तेव्हा अस्तित्वात होतं का? म्हणजे अशा नकाशांवर अखंड भारत वगैरे लिहिलेलं असायचं का?
  • कॉस्च्युम्स – नऊवारी साडी ही नेसलेलीच चांगली दिसते. शिवलेली नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. जर किलो किलो वजनाचा घागरा घालून नाचू शकतात, किंवा २० किलोचं चिलखत घालून लढण्याचे सीन्स करू शकतात, तर सुटसुटीत नेसलेली नऊवारी का सांभाळता येणार नाही?
  • कॉस्च्युमविषयी (उगाच) पडलेला आणखी एक प्रश्न – त्या काळात वेल्वेट आणि क्रेपचं कापड होतं का? जर एवढी मोठी फिल्म बनवली जाते आहे, तर अशा छोट्या गोष्टींविषयी तडजोड कशासाठी?
  • पिंगा हे गाणं चांगलं झालं असलं, तरी ऑथेन्टिक वाटत नाही. अज्जिबातच नाही. कारण कोरियोग्राफी- पिंगा म्हणताना पिंगा घालताना दिसत नाही कुणी. आणि लावणी-कम-मंगळागौरी म्युझिक. हा मोह टाळता आला असता.
  • मल्हारी गाणं चित्रपटांत असण्याबद्दल आक्षेप नाही. पण त्यातही कोरियोग्राफी खरंच खटकते.
  • चित्रपटातील काही कॅऱेक्टर्स विसाव्या शतकातले मराठी शब्द वापरतात, याऐवजी ते हिंदीतच बोलले असते तर बरं असंही वाटून गेलं.

बाकी चित्रपट संपल्यावर बाहेर पडलो, तेव्हा एकही प्रेक्षक काही बोलत नव्हता. थोड्या वेळानं आमच्या समोरून चालणारं एक (अमराठी) जोडपं इतिहासावर चर्चा करू लागलं. स्कूल मे नही क्या पढा था? वोही बाजीराव. इतना बडा था पता नही था. फिर से पढना होगा, कोई बुक है क्या?

चित्रपट बाजी मारतो, ती इथे. जातीपाती आणि धर्माच्या भिंती ओलांडणाऱ्या बाजीराव पेशव्यांची महती आता तरी महाराष्ट्राबाहेर पोहोचेल. कदाचित पानिपत आणि माधवराव पेशव्यांची कहाणीही दिसेल कधीतरी मोठ्या पडद्यावर.