Tag Archive: Egypt


२५ जानेवारी २०१५. आंदोलनाला हिंसक वळण लागून सोळा जणांचा मृत्यू

२९ जानेवारी – सायनाईमध्ये अतिरेकी हल्ल्यात २० जण मृत्यूमुखी

३ फेब्रुवारी – अलेक्झांड्रियात बॉम्बस्फोट, कैरो शहरात आणि विमानतळावर स्फोटकं हस्तगत

गेल्या काही दिवसांतल्या या घडामोडींनी मन विचलीत केलंय. मनात चुकचुकणारी शंकेची पाल समोर प्रत्यक्षात अवतरल्यासारखं वाटतंय. इजिप्तमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा दिसून आलं.

20150102_132030

Downtown Cairo

खरं तर इजिप्तला जाणं किती सुरक्षित आहे असा प्रश्न अनेकांनी विचारून झाला आहे. आज त्याचंच उत्तर देणार आहे. It may not be completely safe, but it’s definitely worth taking the risk.  तिथल्या वास्तव्यात मला हेच वारंवार जाणवलं होतं, आणि आजही मला तेच म्हणावंसं वाटतं. कदाचित मी तिथल्या सुरक्षिततेची खात्री देऊ शकणार नाही, पण इजिप्तभेटीचा धोका पत्करायला हरकत नाही, असंच मला वाटतं.

इजिप्त हे एक वेगळंच रसायन आहे. २०११ साली अरब स्प्रिंगनंतर इजिप्तमध्ये सत्तांतर झालं. मैदान तहरीर (तहरीर चौक) मधील आंदोलनानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. २५ जानेवारी २०११ रोजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारकनी राजीनामा दिला. पुढच्या चार वर्षांत इजिप्तमध्ये दोन राष्ट्राध्यक्ष (मोहम्मद मोरसी आणि अब्देल फताह अल सिसी) आणि सहा पंतप्रधान झाले पण लोकशाहीनं अजूनही खऱ्या अर्थानं मूळ धरलेलं नाही.

पण चार वर्षांतील उलथापालथींचा तिथल्या समाजजीवनावर मात्र खोलवर परिणाम झालेला आहे. कैरो एयरपोर्टवर उतरल्यावरच त्याची पहिली झलक पाहायला मिळाली. टूरिस्ट सीझन असूनही एयरपोर्टवर तुरळक माणसंच दिसत होती. पिरॅमिड्स, म्युझियम आणि इतर ठिकाणीही तसंच चित्र. तुलनेनं लुक्सॉर आणि अलेक्झांड्रियाला पर्यटकांची गर्दी दिसली. मात्र नेहमीपेक्षा यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं. इजिप्तसारख्या देशात जिथे पर्यटन व्यवसाय हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे, अशा अर्थव्यवस्थेवर त्यामुळे मोठा ताण पडला आहे. टूरिस्ट गाईड्स, टूर ऑपरेटर्सपासून ते टॅक्सी ड्रायव्हर्स, हॉटेल व्यवसायिक, आणि अगदी सामान्य फेरीवाले अशा सगळ्यांनाच त्याची झळ पोहोचली आहे.

Graffiti in Tehrir Square

Graffiti in Tehrir Square

 

तिथे पदोपदी जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पोलीसांचा प्रभाव. लौकिकार्थानं इजिप्त पोलीस स्टेट नसलं तरी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठीकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस, सशस्त्र सुरक्षारक्षक आणि सैनिकांचा वावर दिसून येतो. अनेकदा पोलिसच अतिरेकी हल्यांचं टारगेट बनतात. आमच्या तिथल्या वास्तव्यात रोज अशा हल्ल्याची काही ना काही बातमी यायचीच.

२७ डिसेंबरला आम्ही मैदान तहरीर आणि इजिप्शियन म्युझियमला भेट दिली. तहरीर चौक म्हणजे चहुबाजूंनी इमारतींनी वेढलेली शहरातली एक रिकामी जागा, चारी बाजूंनी शहराच्या वेगवेगळ्या भागांकडे जाणारे रस्ते आणि सतत वाहणारं ट्रॅफिक. पण याच रिकाम्या जागेत भरलेल्या आंदोलनानं सगळं जग भारावून गेलं होतं. २०११ मध्ये होस्नी मुबारक यांच्या विरोधात आणि २०१३ साली मोहम्मद मोरसी यांच्याविरोधात तहरीरमध्ये मोठे उठाव झाले. सध्या तहरीरमध्ये एकप्रकारची जमावबंदी आहे. थेट कर्फ्यू नसला तरी लोकांना मोठ्या गटानं एकत्र उभंही राहू दिलं जात नाही. अपवाद अर्थात पर्यटकांचा. बाकी ठिकठिकाणी पोलीस, ट्रॅफिक पोलीस जणू पाळत ठेवून असतात. २५ जानेवारीला, आंदोलनाच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या दिवशी तर तहरीर बंदच ठेवण्यात आलं होतं. आज त्यामुळेच आंदोलनाचं केंद्र शहरातल्या इतर भागांत जिथे मुस्लीम ब्रदरहूडचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी सरकलं आहे.

Egyptian Museum

Egyptian Museum, Tehrir Square, Cairo

 

याच चौकात एका बाजूला आहे इजिप्शियन म्युझियम. इजिप्तचा ऐतिहासिक ठेवा जपणारं संग्रहालय. युवा फारो तुतनखामूनचा मुखवटा, त्याच्या मकबऱ्यातून सापडलेला खजिना, प्राचीन आणि रोमन काळातील इजिप्तच्या रोजच्या जगण्यातील अनेक वस्तू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ममीज. म्युझियममध्ये एका खास दालनात रामसेस, हाटशेसूट, सेटी आणि इतर प्रसिद्ध फारोजच्या ममीज ठेवण्यात आल्या आहेत. संग्रहालयाच्या वेगवेगळ्या दालनांत शिरताच आपण वेगळ्याच विश्वात, इतिहासात खूप मागे गेल्यासारखं भासतं.

२०११मध्ये या संग्रहालयाला क्रांतीचे चटके सहन करावे लागले. तहरीरमध्ये त्यावेळी प्रचंड अनागोंदी माजली, त्याचा फायदा घेत काहींनी वेस ओलांडून म्युझियममध्ये प्रवेश केला. त्या दंगलीत संग्रहालयात बरीच नासधूस आणि लुटालूट झाली. सुदैवानं बहुतेक सर्व वस्तू परत मिळवण्यात आल्या. सध्या संग्रहालयात अनेक वस्तूंचं रिस्टोरेशन सुरू आहे. त्यामुळेच ‘हा मुखवटा २०११च्या क्रांतीच्या वेळेस तुटला होता’, ‘सदर मूर्तीचे २०११च्या क्रांतीच्या वेळेस दोन तुकडे झाले होते, एक मैदानातील लॉनवर सापडला, नंतर ही मूर्ती दुरुस्त करण्यात आली’ अशा नोंदी सापडतात. आणि मग प्रश्न पडतो. क्रांतीनं इजिप्तला खरंच काय दिलं? फायदा नेमका कुणाचा झाला? का आज हा देशच रिस्टोरेशनच्या अवस्थेत पोहोचला आहे?

मुबारक यांच्यानंतर मुस्लीम ब्रदरहूडचे नेते मोहम्मद मोरसी ३० जून २०१२ रोजी सत्तेत आले. मात्र कट्टरतेकडे झुकणाऱ्या त्यांच्या राजवटीविरुद्ध पुन्हा आंदोलन झालं आणि वर्षभरानं मोरसींना सत्ता गमवावी लागली. मात्र आजही मुस्लीम ब्रदरहूड आणि मोरसींच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. इजिप्त हा देश ब्रदरहूड समर्थक आणि ब्रदरहूडच्या विरोधकांमध्ये विभागला गेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यातही ब्रदरहूड विरोधकांमध्ये कुणी सिसींचे समर्थक आणि कुणी विरोधक आहेत. सामान्य इजिप्शियन लोक मात्र स्वतःला या राजकारणाच्या थेट चर्चेपासून दूर ठेवताना दिसतात. पण त्यांच्या राजकीय जाणीवा तीव्र असल्याचं प्रकर्षानं जाणवतं.

The future of Egypt: Our little friends in Luxor, Their smiles are precious...

The future of Egypt: Our little friends in Luxor, Their smiles are precious…

 

एक मात्र खरं वेगवेगळ्या विचारसरणींचे असूनही सर्वांना इजिप्शियन असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. राष्ट्रीयत्वाची ही भावना इजिप्तच्या इस्लामिक आणि अरब या दोन ओळखींपेक्षा मोठी आहे. आणि म्हणूनच इजिप्तकडून आशाही मोठ्या आहेत. एरवीही क्रांतीचं रान पेटल्यावर शांत होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. फ्रेन्च आणि रशियन राज्यक्रांतीनंतरही लगेच स्थैर्य आलं नव्हतं. इजिप्तलाही थोडा वेळ द्यायला हवा.

या देशानं खूप काही उपभोगलं आहे, भोगलं आहे आणि सोसलंही आहे. आज तिथे अस्थिरता नसली, तरी एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहते. भविष्याविषयी अनिश्चितता जरूर आहे, पण तिचं सावट रोजच्या जगण्यावर पडलेलं नाही. हाच आशेचा मोठा कीरण आहे.

Advertisements

‘इजिप्तला खाल्लंस काय? तिथलं जेवण कसं असतं आणि आवडलं तुला?’ इजिप्तवरून आल्यावर बहुतेकांचा हाच पहिला प्रश्न होता. म्हणूनच ठरवलंय, सर्वात आधी तिथल्या खाद्यसंस्कृतीवर लिहायचं.

खरं तर आश्चर्य वाटेल, पण इजिप्तला स्वतःची खाद्यसंस्कृतीच नाही. इतका प्राचीन देश असूनही इजिप्तचं जेवणाच्या बाबतीत स्वतःचं अस्तित्व नाही. तिथं मिळणारे बहुतेक पदार्थ हे मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत सगळीकडे मिळतात. ग्रीक, इटालियन (रोमन), टर्किश, मोरोक्कन, फ्रेन्च, लेबनीज, सीरियन खाद्यसंस्कृतीची छाप इजिप्तवर दिसून येते. पण इजिप्शियन क्विझिन असं काही अस्तित्वातच नाही. कदाचित हीच इजिप्तची सर्वात मोठी ताकद आहे, या देशानं इथं आलेल्या सगळ्यांच्या संस्कृतींना आपलंसं केलं आहे. निदान जेवणाच्या बाबतीत तरी नक्कीच.

पण तरिही, काही पदार्थ असे आहेत, जे इजिप्तची ओळख आहेत. विशेष म्हणजे त्यात शाकाहारी पदार्थांची कमी नाही.

IMG_20150105_213851

Clockwise from right – १. तामिया, २. लेंटिल सूप, ३. सॅलड्स, ४. कोशरी, ५. फुल मदामिस आणि ब्रेड ६. पिकल्ड एगप्लांट

 

तामिया अर्थात फलाफल म्हणजे एक प्रकारचे पकोडेच. भारतीयांना हा पदार्थ हळूहळू सवयीचा होतो आहे. चिक पीज अर्थात आपले छोले, हा यातला मुख्य घटक. फलाफल मूळचं लेबनॉनचं की इजिप्तचं, यावरून मतभेद आढळून येतात आणि चर्चाही झडतात.

फुल मिदामिस म्हणजे उकडलेल्या फावा बिन्सपासून बनवलेला पदार्थ. राजम्याच्याच जातकुळीतलं फुल इजिप्शियन ब्रेकफास्टमधला अविभाज्य भाग आहे. खारवलेल्या भाज्या आणि इजिप्शियन ब्रेडबरोबर फुल खाल्लं जातं. ऐश मास्री, ऐश बालादी असे इथल्या ब्रेडचे काही प्रकार, थेट मकई की रोटीची आठवण करून देतात.

याच ब्रेडवरून बरंच मोठं वादळही उठलं होतं. इजिप्तमध्ये घरोघरी ब्रेड बनत नाही. त्या प्रदेशातील इतर अनेक देशांप्रमाणे खास बेकरींमधूनच रोजचा ब्रेड घेतला जातो. रेशनिंगद्वारा ब्रेडच्या वाटपावरून सात वर्षांपूर्वी दंगलही झाली होती. पण आता ब्रेड वाटपासाठी नवी पद्धत लागू करण्यात आली आहे.

 

एगप्लांट्स अर्थात वांगं इजिप्तमध्ये सर्सास खाल्लं जातं. पिकल्ड एगप्लांट, इजिप्शियन मुसाका, ग्रिल्ड एगप्लांट्स अशा वांग्याच्या प्रकारांवर मी अक्षरशः ताव मारला. मसूराच्या डाळीचं सूप, तऱ्हेतऱ्हेची सॅलड्सही बहुतेक वेळा आमच्या टेबलवर असायचीच.

कोशियरी ही इजिप्तची नॅशनल डिश मानली जाते. भात, बारीक पास्ता, मसूर किंवा मसूर डाळ, कांदा, छोले आणि आवडीनुसार भाज्या किंवा चिकन घालून बनवला जाणारा हा पदार्थ एकेकाळी मजूरांचं अन्न म्हणून ओळखला जायचा. एक वाडगाभर कोशियरी खाल्ल्यावर पुढे कित्येक तास काही खाल्लं नाही, तरी चालून जातं.

20141228_135426

डोल्मा

20141228_135442

मोसाका

IMG_20150105_215713

ग्रिल्ड फिश आणि कलामारी, अलेक्झांड्रिया

 

डोल्मा, म्हणजे द्राक्षाच्या पानात गुंडाळून वाफवलेलं भाताचं मिश्रण. अगदी आपल्या अळुवडीसारखं. काहीसा कडवट लागणारा हा पदार्थ, औषधीही मानला जातो. भूमध्य सागरी प्रदेशात सगळीकडे डोल्मा खाल्लं जातं.

इजिप्तमधले वेगवेगळे कबाब्ज, श्वावर्मा, ग्रिल्ड मीट, चिकन आणि फिशचेही अनेक प्रकार म्हणजे अस्सल खवय्यांसाठी पर्वणीच आहे. आणि अलेक्झांड्रिया तर सी-फूडच्या चाहत्यांचा स्वर्गच आहे. समुद्राची गाज ऐकत, गार वाऱ्यात सामक माश्वी, सामक माकली अर्थात ग्रिल्ड फिश आणि कलामारी (स्क्विड) यांचा आस्वाद लुटण्याची मजा औरच होती.

करकदेह

करकदेह

बकलावा, टर्किश डिलाईट आणि इजिप्शियन मिठाई

बकलावा, टर्किश डिलाईट आणि इजिप्शियन मिठाई

 

इजिप्शियन लोक भारतीयांसारखेच पक्के चहाबाज. उत्तर इजिप्तमधला चाय कोशरी आणि दक्षिणेकडचा चाय सेईदी असे ब्लॅक टीचे प्रकार इथे प्रसिद्ध आहेत. करकदेह हे एक प्रकारच्या फुलाच्या पाकळ्यांपासून बनवलं जाणारं पेय, खास करून दक्षिण इजिप्तमध्ये लोकप्रिय आहे.

गोडधोड खाणाऱ्यांचीही इजिप्तमध्ये चंगळ आहे. टर्किश डिलाईट, बक्लावा, आणि अनेक तऱ्हेची डेझर्टस इथं मिळतात.

माझ्या तितल्या वास्तव्याच्या काळात, अधूनमधून कोरियन, चायनीज, थाई, भारतीय, इटालियन, फ्रेन्च खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळाली.

IMG_20141231_100056

रमादानच्या घरचा जेवणाचा थाट..

आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. इजिप्शियन लोकांना स्वतः खायला भरपूर आवडतं, आणि पाहुणेमंडळींना भरपूर खायला घालायलाही आवडतं. लुक्सॉरला आमचा गाईड आणि मित्र रमादाननं त्याच्या घरी जेवायला नेलं होतं, आणि आम्ही दोघी शाकाहारी जेवणाला पसंती देतो म्हटल्यावर, तशी खास तजवीजही केली होती.

One should enjoy the food and taste of life- प्रत्येकानं जेवणाचा आणि जीवनाचा आनंद लुटायला हवा, हे रमादानचे बोल खूप काही शिकवून गेले.

– जान्हवी मुळे

 

IMG_20141226_192203

Corner view of The Great Pyramid, Giza

इजिप्तहून परतले, त्याला आता आठवडा उलटलाय. पण मन अजूनही तिथेच रेंगाळते आहे. तो देश आहेच तसा. पटकन आपलंसं करणारा, मनावर गारूड करणारा, प्रसंगी अचंबित करणारा, विचार करायला लावणारा, कधी थोडं घाबरवणारा आणि कधी नवी उमेद देणारा..

 

इजिप्तमध्ये पाऊल ठेवताच काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. दिशा, भाषा सगळंच काही वेगळं. राईट हँड ड्रायव्हिंग असो, किंवा उजवीकडून लिहिली जाणारी अरबी, उत्तरेला समुद्र आणि दक्षिणेला पर्वत हे भारतापेक्षा अगदी उलटं गणित.. अप्पर इजिप्त दक्षिणेला आणि लोअर इजिप्त उत्तरेला, नाईल दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते, असे संदर्भ लक्षात ठेवावे लागतात. एरवी किती सहजेतनं आपण या दिशा गृहित धरून चालतो!

 

IMG_20150102_200246

A relaxed Afternoon, Khan al Khalili Market Cairo

पण असे काही फरक सोडले, तर इजिप्त आणि भारतामध्ये खूप साम्य दिसून येतं. दोन्ही देशांना प्राचीन इतिहासचा संपन्न वारसा लाभला आहे. महान नद्यांच्या काठावर पोसले गेलेले हे देश.. दोन्ही देशांत प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत आलीय. दोन्ही देशांवर एकेकाळी ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. दोन्ही देशांतील नागरिकांना आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. शीतयुद्धाच्या काळात अलिप्त राष्ट्र गटाच्या माध्यमातून भारत आणि इजिप्तनं जगात शांतता टिकवून ठेवण्यास हातभार लावला होता. दोन्ही देश प्रादेशिक महासत्ता आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

गेल्या काही वर्षांत इजिप्त जागतिक राजकाऱणात एक महत्त्वाचं केंद्र बनलंय. कैरोच्या मैदान तहरीर मध्ये झालेला उठाव असो, किंवा इस्राएल आणि पॅलेस्टाईनमधल्या वाटाघाटी, इजिप्त नेहमीच चर्चेत राहिलंय. बहुसंख्य मुस्लिम असणारं अरब राष्ट्र असूनही इजिप्त अनेक बाबतींत वेगळं ठरतं.  इथल्या लोकांना आपण इजिप्शियन असल्याचा अभिमान आहे, जो पदोपदी जाणवत राहतो.

IMG_20141226_185619

Suez Canal connecting the Mediterranean and Red Sea

 

फारोंच्या काळातलं प्राचीन इजिप्त, ज्याचे केवळ भग्नावशेष आज पाहायला मिळतात. ग्रीक, रोमन ऑटोमन काळातलं इजिप्त, ज्याचा ठसा आजच्या इजिप्तवरही दिसून येतो. डाऊनटाऊन कैरोवर पॅरिसची छाप जाणवते, तर अलेक्झांड्रिया युरोपमध्येच असल्यासारखं वाटतं. सुएझ कालवा होण्याच्या आधीपासूनच इजिप्त पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं एक महत्त्वाचं केंद्र आहे. कदाचित म्हणूनच तिथे अनेक विरोधाभास पाहायला मिळतात.  इजिप्तची खाद्यसंस्कृतीही अशीच, रंगीबेरंगी आहे.

इजिप्त म्हणजे मस्त जमून आलेली भेळ आहे. जगातलं सगळं काही थोडं थोडं, एकत्र येऊन तयार झालेली.  पण इतिहास आणि राजकारणाच्या पलिकडे जायचं, तर इजिप्तच्या माणसांनी, त्यांच्या आदरातिथ्यानं मला अगदी आपलंसं केलं.

 

इजिप्तच्या सफरीत खूप काही अनुभवायला मिळालं. सगळंच शब्दांत मांडायचं तर थोडा वेळ आणि थोडी जागा लागेल. म्हणूनच जसं जमेल तसं लिहून शेअर करायचं ठरवलंय.

– जान्हवी मुळे.