Category: Social Reform


obama

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीचा लेखा-जोखा इतिहासकार कसा मांडतात, हे आत्ताच कदाचित सांगता येणार नाही. पण ओबामांचे टीकाकारही एक गोष्ट मान्य करतील. ओबामा हे अतिशय उत्कृष्ठ वक्ता आहेत. त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात, तर त्यात काही ना काही विचार मांडलेला असतो आणि ऐकणाऱ्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहात नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्यानं ओबामांनी केलेली काही महत्त्वपूर्ण भाषणं एकदा पुन्हा ऐकण्याची ही योग्य वेळ ठरावी..

1. ‘ए न्यू बिगिनिंग’ – ४ जून २००९, कैरो

ओबामा सत्तेत आल्यापासून, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि बदलाची नवी आशा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विशेषत: त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाता. त्याच सुमारास कैरो विद्यापीठातील आपल्या भाषणाद्वारा ओबामांनी मुस्लिम जगताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मुस्लिमविरोधी प्रतिमा असलेल्या अमेरिकेचा बदलता दृष्टीकोन म्हणजे काही काळ जागतिक शांततेची नवी आशा ठरला होता. दुर्दैवानं ती आशा फार काळ टिकू शकली नाही.

2. नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण, १० डिसेंबर २००९

कैरो विद्यापीठातील भाषणाद्वारा ओबामांनी मांडलेल्या विचारांमुळंच त्यांची २००९ सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावरून वादही निर्माण झाला. पण ओबामांना हा पुरस्कार त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून नाही, तर त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांसाठी देण्यात आला होता. आपल्या भाषणात ओबामांनी त्या जबाबदारीची जाणीव ठेवली. युद्ध आणि शांततेविषयीचे विचारही ओबामांनी त्या भाषणाद्वारा मांडले होते. प्रत्यक्षात मात्र ओबामांना युद्धांतून लवकर माघार घेता आली नाही, किंबहुना अमेरिका वेगळ्या तऱ्हेनं नव्या युद्धांमध्ये ओढली गेली.

3. ओसामाच्या मृत्यूची घोषणा.  १ मे २०११, वॉशिंग्टन डीसी

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकी नेव्ही सील्सच्या टीमनं मारल्याची घोषणा ओबामांनी या भाषणाद्वारे केली होती. टीव्हीद्वारा राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण जेमतेम ९-१० मिनिटांचं होतं. तेवढ्या कमी वेळेत, नेमक्या शब्दांत ओबामांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. ना विजयाचा जल्लोष, ना घोषणाबाजी, ना मी हे केलं असा आव.

4. समलिंगी संबंधांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ावरील प्रतिक्रिया. 26 जून 2015

ओबामांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला समलिंगी व्यक्तींच्या हक्कांविषयी बोलणं टाळलं होतं. पण पुढं त्यांचे विचार बदलत गेले. ओबामांच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या सर्व राज्यांत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली. सर्वोच्च न्यायालयानं तसा निर्णय दिल्यावर ओबामांनी केलेलं भाषण त्यांच्या मनातल्या आदर्श समाजाचं प्रतिबिंब दाखवतं.

5. सेल्मा, ७ मार्च २०१५

अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यादरम्यान सेल्मा इथं झालेल्या रक्तपाताच्या घटनेला गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी ओबामांनी केलेलं भाषण अमेरिकेत आजही वर्णद्वेश अस्तित्वात आहे या वास्तवाची जाणीव करून देणारं ठरलं.

6. अमेझिंग ग्रेस – २६ जून २०१५, चार्ल्सटन

चार्लस्टनमध्ये दंगल भडकवण्याच्या उद्देशानं वर्णद्वेषी हल्लेखोरानं चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात स्टेट सीनेटर क्लेमेंटा पिंकनी यांच्यासह 9 कृष्णवर्णीयांचा बळी गेला होता. त्यांना आदरांजली वाहताना ओबामांनी अमेझिंग ग्रेस गाण्यास सुुरुवात केली.

7. सँडी हूक, 5 जून 2016

सँडी हूकमधील गोळीबाराच्या घटनेनंतर बोलताना ओबामांना अश्रू आवरले नव्हते. अमेरिकेत गन लायसन्सविषयी नियम कडक करण्याची गरज ओबामांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. अमेरिकेतली गन लॉबी आणि तिचा राजकारण्यांना असलेला पाठिंबा यांमुळं ओबामांना आपल्या कार्यकाळात बंदुकांच्या वापरावर निर्बंध आणता आले नाहीत. या एका गोष्टीचं शल्य त्यांना पुढेही जाणवत राहील.

8. राष्ट्राध्यक्ष म्हणूनअखेरचं भाषण – १० जानेवारी २०१७, शिकागो

शिकागोमध्ये, जिथून ओबामांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली, त्याच शहरात ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलं अखेरचं भाषण केलं. ट्रम्प यांच्या निवडीनंतरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात हे भाषण सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरलं.

 

 

Advertisements

मी हे का निवडलं? मी ते निवडलं असतं तर? वयाच्या एखाद्या टप्प्यावर हा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. विशेषतः जोडीदाराच्या बाबतीत.

व्हॅनेसा रेडग्रेव्ह, क्लॅरिसाच्या भूमिकेत

व्हॅनेसा रेडग्रेव्ह, क्लॅरिसाच्या भूमिकेत

क्लॅरिसा डॉलोवे, व्हर्जिनिया वूल्फच्या ‘मिसेस डॉलोवे’ची नायिका याच विचाराशी झगडते आहे. 51 वर्षांची क्लारिसा लंडनच्या उच्चभ्रू वर्गातली गृहिणी. क्लारिसानं लंडनमधल्या आपल्या घरी पार्टी आयोजित केली आहे आणि फुलं आणण्यासाठी ती सकाळी सकाळीच बाहेर पडली आहे. त्या दिवसभरात क्लॅरिसाला आलेले अनुभव, तिच्या मनातले विचार, तिच्या तरूणपणीच्या आठवणी, तिचं आताचं जग यांतून कथानक उलगडत जातं. क्लॅरिसाचा एकेकाळचा जीवलग मित्र आणि प्रियकर पीटर वॉल्श दिला भेटण्यासाठी येतो आणि क्लॅरिसा आपल्या लग्नाच्या निर्णयाविषयी विचार करू लागले. क्लॅरिसाचा नवरा रिचर्ड राजकारणात तर मुलगी इतिहासाच्या अभ्यासात व्यस्त आहेत. आपण खरंच खूश आहोत का, जी स्वप्न पाहिली होती, ती पूर्ण झाली आहेत का या विचारात क्लॅऱिसा अडकली आहे.

तरुणपणीची काहीशी अवखळ क्लॅरिसा आता चार भिंतींच्या आड अडकली आहे. फॅशनेबल कपडे घालणं आणि मोठमोठ्या पार्ट्या देणं हेच तिचं विश्व बनलंय. आपली काही वेगळी ओळख नाही, याची खंतही तिला कधीतरी वाटते. ‘आता मी फक्त मिसेस डॉलोवे आहे, मला क्लॅऱिसा म्हणणारं कुणीही नाही’ हा विचार एका क्षणी क्लॅरिसाच्या मनात येतो.    

क्लॅरिसाच्या कथानकाला समांतर आणखी एक कथानक व्हर्जिनियानं या कादंबरीत मांडलं आहे- सेप्टिमस वॉरेन स्मिथ. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेसचा सामना करणारा, मनोविकारानं ग्रासलेला युवा सैनिक. ३-४ वर्षांपूर्वी संपलेल्या पहिल्या महायुद्धात सेप्टिमस लढला होता. युद्धादरम्यान मित्राच्या मृत्यूमुळं सेप्टिमसला धक्का बसला आहे, तो आत्महत्येच्या विचारात आङे. त्याची पत्नी रेझिया सेप्टिमससोबत खंबीरपणे उभी आहे, मात्र एका क्षणी सेप्टिमस आपलं आयुष्य संपवतो.

क्लॅरिसाच्या घरी पार्टीमध्ये समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले लोक येतायत. पीटर आणि क्लॅरिसाची लहानपणीची मैत्रिण सॅलीही तिथं आली आहे. सॅलीमधला बदल क्लॅऱिसाला काहीसा अनपेक्षित आहे. दुसरीकडे सेप्टिमसचे डॉक्टर आणि डॉलोवे कुटुंबाचे मित्र सर विल्यम ब्रॅडशॉ यांच्यामुळं क्लॅरिसाला सेप्टिमसच्या मृत्यूविषयी कळतं आणि ती स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करू लागते.

व्हर्जिनिया वूल्फ

व्हर्जिनिया वूल्फ

आठवणींचे फ्लॅशबॅक्स वगळता ‘मिसेस डॉलोवे’चं मुख्य कथानक एकाच दिवसात घडतं, आणि तरीही खिळवून ठेवतं. व्हर्जिनिया वूल्फनं त्या साध्या थीममध्येही नाट्य उभं केलं आहे. ही कहाणी दोन महायुद्धांमधलं इंग्लंड, युद्धामुळं समाजात घडत असलेले बदल, युद्धावरून परतलेल्या सैनिकांसमोरच्या समस्या, मनोविकार एका गृहिणीचं भावविश्व, अपुरी राहिलेली स्वप्न, समलिंगी आकर्षण, स्त्रीस्वातंत्र्य अशा महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य करते.

अशा विचारसरणीनं व्हर्जिनियानं आधुनिक साहित्याला मोठं योगदान दिलं आहे. उच्चशिक्षित, घरातून साहित्याचा वारसा लाभलेली व्हर्जिनिया अधिक डोळसपणे आसपासच्या परिस्थितीकडे पाहते. तिनं स्वतः मानसिक आजारांचा सामना केला होता, आणि अखेर ५९व्या वर्षी स्वतःच आपलं आयुष्य संपवलं होतं.

आपल्या लेखनातून व्हर्जिनियानं स्त्रीचं अंतरंग, तिचे विचार मोकळेपणानं मांडले. त्यामुळंच आज तिच्याकडे फेमिनिस्ट विचारसरणीचा पाया घालणारी लेखिका म्हणून पाहिलं जातं.

– जान्हवी मुळे 

इंग्रजी साहित्याविषयीची कुठलीही मालिका जेन ऑस्टिनच्या ‘प्राईड अँड  प्रेज्युडिस’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 

कियारा नाईटली - एलिझाबेथ बेनेटच्या भूमिकेत

कियारा नाईटली – एलिझाबेथ बेनेटच्या भूमिकेत

प्राईड अँड  प्रेज्युडिस ही इंग्रजीमधली सर्वात लोकप्रिय कादंबरी मानली जाते. एलिझाबेथ बेनेट उर्फ लिझी याच कादंबरीची नायिका आहे. इंग्रजी साहित्यातली सर्वात लाडकी नायिका. म्हटलं तर चाकोरीमधली आणि म्हटलं तर चाकोरीबाहेरची.

लिझी ही बेनेट दंपतीच्या पाच मुलींपैकी दुसरी. ती सुंदर आहे, पण केवळ नटण्यामुरडण्यात रमणारी नाही. ती हुशार आहे, विचार करून वागते-बोलते म्हणून आपल्या वडिलांचीही ती लाडकी आहे. लिझीच्या आईला मात्र आपल्या पाचही मुलींच्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचत नाही.

बेनेट कुटुंबियांच्या शेजारी चार्ल्स बिंगले आणि फिट्झविल्यम डार्सी राहायला येतात आणि लिझीच्या आईचा उत्साह ओसंडून वाहायला लागतो. लिझीची मोठी बहीण जेन आणि चार्ल्स एकमेकांच्या प्रेमात पडतायत असं वाटू लागतं. तर दुसरीकडे लिझी आणि डार्सीमध्ये खटकेच उडताना दिसतात. एकमेकांविषयी पूर्वग्रह आणि अभिमान लिझी आणि डार्सीच्या कहाणीत आडवे येतात.

१८व्या शतकातल्या इंग्लंडधील प्रथेनुसार आणि आर्थिक परिस्थितीमुळं लिझीला लग्न करणं भाग आहे. पण केवळ सामाजिक गरज आणि पैशासाठी नाही, तर प्रेमासाठी. लिझी इथंच आपल्या बहिणींपेक्षा वेगळी ठरते. लग्नाचा एक प्रस्ताव ती सहज नाकारते. डार्सीवर प्रेम करत असूनही सुरूवातीला त्यालाही नकार देते. कथानक पुढे सरकतं, तसं लिझीचं पात्र खुलत जातं, तिच्यात अधिक मोकळेपणा आणि ठामपणा येतो.

ऑस्टिननं ज्या पार्श्वभूमीवर हे लेखन केलंय, त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १९व्या शतकाच्या सुरूवातीचा, इंग्लंडच्या सिंहासनावर राणी व्हिक्टोरिया येण्याआधीचा तो काळ. ऑस्टिन लिहित होती, तेव्हाच अमेरिकचं स्वातंत्र्ययुद्ध, फ्रान्समधली राज्यक्रांती, नेपोलियनिक युद्धं या जग बदलणाऱ्या घटना घडत होत्या. (याच सुमारास भारतात इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तीन युद्ध झाली.)

तरीही ऑस्टिननं राजकीय अथवा सामाजिक भाष्य केलं नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र या सर्व घटनांचा तिच्या कथानकातील पात्रांवर अगदी थेट नाही, पण परिणाम तर होतोच. प्राईड अँड प्रेज्युडाईसमध्ये गावात सैन्यानं तळ ठोकल्याचा उल्लेख आहे, काही पात्रांची लष्करी पार्श्वभूमी आहे.

बदलांच्या त्या काळात, प्रिन्स जॉर्जच्या अधिपत्याखाली इंग्लंडमध्ये साहित्य आणि कलेची मात्र भरभराट झाली. ऑस्टिनला त्याचा फायदाच झाला.

तसं जेन ऑस्टिनच्या कादंबऱ्या एका चौकटीतलं – उच्चभ्रू ब्रिटिश कुटुंबांमध्ये घडतात. तिथं गरीब-श्रीमंत हा भेद दिसतो, पण त्यातला संघर्ष समोर येत नाही. मात्र ऑस्टिनचं जग त्या त्या काळातल्या इंग्लंडच्या समाजव्यवस्थेची विशेषतः स्त्री-विश्वाची जाणीव करून देतं. तिथं स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, पण त्या स्वतंत्र विचारही करतात. म्हणूनच त्या जास्त खऱ्या वाटतात.

ऑस्टिनच्या जगातल्या स्त्रिया आणि आजच्या बहुसंख्य महिला यांच्या आसपासच्या परिस्थितीत अजूनही बरंच साम्य आहे. कदाचित म्हणूनच तिच्या कादंबऱ्या आजही वाचल्या जातात, आजच्या काळालाही लागू पडतात.

ऑस्टिन बंडखोर लेखिका नव्हती कदाचित, पण आपल्या चाकोरीच्या आत राहून तिनं केलेलं छोटंस बंडही महत्त्वाचं आहेच.

– जान्हवी मुळे 

What Kiran Rao said, came from a mother’s heart. A mother whose kid’s father belongs to other religion. and being a celebrity kid doesn’t mean you won’t be bullied. Kiran might be wrong, she might be worrying too much or thinking too much, but it’s cruel to judge what a mother feels.

But let’s face it. We Are Not The Safest Place for Children.

Our cities are overcrowded and polluted. Our villages lack infrastructure, some are ruined because of drought.

We talk of harmony but are ready to take on each other any instance. We are losing acceptance and difference of opinions and there is polarization in the society about anything and everything.

We see a rise in crimes against women and children and elderly. People are still being persecuted on basis of caste. Women are still disallowed from entering temples for being women. Communities force their eating habits on society. Writers and thinkers are killed for speaking out. And the “I don’t care” attitude still persists.

Youth is getting addicted to technology and losing touch with reality. Drinks, drugs and tobacco poses a threat. Traffic rules are broken every second and road-rage is becoming common. People still die of Dengue, Malaria, TB, Diarrhoea, hunger and cold.

Inflation is flattening the middle class. Rich and intellectuals have no time for poor and persecuted. Poor are barely surviving and slowly losing it.

Trees are cut down without a second thought, miners are destroying jungles, rivers are shrinking, seas are rising, sudden flash-floods are displacing thousands every year.

You will say this is happening all over the World. But should we not focus on the fact- this is happening in India of 21st century? Sure we have a great past, and strive for a glorious future, but we shall not forget the present that counts most.

Let’s face it. IT IS ALL HAPPENING. It has been happening not just for past few months, but for over a decade and half. What we see today is a result of what we all have been doing (or not doing) for years.

We are certainly not the safest and best place in the world. Perhaps we are on the brink. But as Jeff Daniels character in “The Newsroom”, Will McAvoy says in his oration about America, “we can be the best country in the world”

We still have people who care about what is happening around. We still have youngsters ready to die on the border, we still have women defying all odds. We still have people raising their voices against injustice. We still have HOPE.

And as long as hope is there, we can fight all insecurities. Doesn’t matter who is our leader. What matters is who we are and what we want to be.

If your brother is afraid of something should you mock him all the time? Or should you stand by his side, make him trust yourself and destroy his insecurities? Decide. Decide what is more Indian. To rage and destroy or to love and heal? to fire in defence or to kill for supremacy?

Let’s decide. Let’s make India a much better place than what it is- a Great country. A place where every mother would want her children to be.

  • Janhavee Moole, ABP Majha/ABP News.

अँगेला मर्कल, जर्मनीच्या चॅन्सेलर, युरोपियन युनियन रुपी शाळेची हेडमास्तरीण… अगदी ब्रिटन, फ्रान्सलाही अँजेला बाईंचा दरारा वाटतो.

angela-merkel-2011-7-19-10-0-51अँगेला मर्कल आजच्या घडीला युरोपच नाही तर जगातल्या सर्वात ताकदवान महिला आहेत. युरोपियन युनियनच्या आर्थिक नाड्या अँगेला बाईंच्याच हातात आहेत. जगाच्या राजकारणात सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर दुसऱी सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण असेल तर अँगेला मर्कल.

या मर्कलबाई म्हणजे नेमकं काय रसायन आहे, याची जाणीव जगाला २००९ साली युरोझोनमधल्या आर्थिक संकटाच्या काळात झाली. ग्रीसनं आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचं जाहीर केलं. ग्रीस दिवाळखोरीत निघालं असतं तर त्याचा फटका युरोपातल्या युरो चलन वापरणाऱ्या इतर देशांना आणि मग पर्यायानं जगालाही बसला असता. कर्जांमुळे युरोपातल्या इतर अनेक देशांचीही आर्थिक स्थिती हालाखीची बनली होती. त्यावेळी युरोपची नजर मदतीसाठी जर्मनीकडे वळली.

अँगेला मर्कल यांनी निर्णय घेण्यास वेळ लावला. पण ग्रीसला युरोपियन युनियनमार्फत आर्थिक मदत देऊ केली. अर्थात त्यासाठी ग्रीसवर काही निर्बंधही घातले. कुणाला अँजेलाबाईंचा निर्णय म्हणजे कडक शिक्षा वाटली. पण त्यांनी उचललेल्या पावलामुळे युरोपची अर्थव्यवस्था सावरते आहे.

युरोझोनमध्ये ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इटलीसारख्या राष्ट्रांतील दिग्गज नेत्यांना आर्थिक संकटामुळे आपली खुर्ची गमवावी लागली. पण त्याच काळात अँगेला मर्कल यांची सत्ता भक्कम झाली. गेल्या वर्षी मर्कलबाई तिसऱ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी भरघोस मतांसह निवडून आल्या.

60 वर्षीय अँजेला म्हणजे जगाच्या राजकारणातलं एक रहस्यमय व्यक्तिमत्व. 2005 साली त्या पहिल्यांदा चॅन्सेलरपदी निवडून आल्या तेव्हा त्यांच्या स्टायलिश ब्लेझर्सची आणि हसतमुख चेहऱ्याची चर्चा जास्त व्हायची. पण लवकरच त्यांचं पोलादी व्यक्तिमत्व जगासमोर आलं.

एका धार्मिक पित्याची मुलगी, एक वैज्ञानिक, कार्यकर्ती आणि राजकारणी… अँजेला यांच्या व्यक्तीमत्वाचे हे वेगवेगळे पैलू आहेत. पूर्वश्रमीच्या अँजेला कासनेर यांचा जन्म हॅम्बर्गमध्ये झाला, तेव्हा जर्मनी एकसंध राष्ट्र नव्हतं. पश्चिम जर्मनीत चर्चमध्ये पाद्री म्हणून काम करणारे त्यांचे वडील नंतर पूर्व जर्मनीत स्थायिक झाले. घरात समाजवादी विचारांचा पगडा होता आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांचा वावर असायचा. शीतयुद्धाच्या काळात वाढलेल्या अँजेला यांनी सुरूवातीला विज्ञानाची कास धरली. रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करणाऱ्या अँजेला यांचं आयुष्य 1989मध्ये पूर्ण बदलून गेलं.

बर्लिन भिंत कोसळली आणि दोन्ही जर्मनींची एकीकरणाकडे वाटचाल सुरू झाली. त्या मंतरलेल्या दिवसांत अँगेला राजकारणाकडे वळल्या. मग दशकभरात जर्मन संसद, चॅन्सेलर हेलमट कोल यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद अशी झेप घेतली. पण त्याच हेलमट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना मर्कल यांनी कुठलीच हयगय केली नाही. पुढे 2000 साली ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनचं अध्यक्षपद आणि 2005 साली जर्मनीचं चॅन्सेलरपद असा अँजेला बाईंचा प्रवास. या दोन्ही पदांवर आरूढ होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

वयाची साठी गाठल्यावरही अँगेलाबाईंचा उत्साह तरुणांना लाजवेल असाय. मर्कल स्कीईंग आणि फुटबॉलच्या चाहत्या आहेत. ब्राझिलमधल्या फिफा विश्वचषकात तर त्या जर्मन टीमच्या सर्वात मोठ्या चीअरलीडर बनल्या होत्या.. विश्वचषक जिंकल्यावर खेळाडूंना त्यांनी आईच्या मायेनं आलिंगन दिलं. आजच्या जमान्यात राजकारणात येण्यासाठी उत्सुक महिलांसाठी अँगेला मर्कल खऱ्या अर्थान रोल मॉडेल बनल्या आहेत.

– जान्हवी मुळे

कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध किंवा सत्तेसमोर उभं राहणं सोपं नसतं. पण इराणच्या शिरीन एबादी यांनी ती हिंमत दाखवली म्हणूनच इराणमध्ये अनेकांच्या आयुष्यात, खास करून स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडून आला..

56-212027-3634016280-cf3c010b99-bतेहरानमधल्या घरात लहान भावंडांसह बागडणारी छोटी मुलगी ते नोबेल पारितोषिक जिंकणारी मुस्लीम देशांतील पहिली महिला असा शिरीन एबादी यांचा प्रवास.

एबादी यांचा जन्म १९४७ साली एका संपन्न कुटुंबात झाला, जिथे मुलं आणि मुलींना समान वागणूक दिली जायची. अन्याय सहन करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. म्हणूनच त्यांनी न्यायाधीश व्हायचं ठरवलं. कायद्याचा अभ्यास करत असतानाच इराणच्या शाहविरुद्ध आंदोलनातही त्या उतरल्या होत्या. वयाच्या २२व्या वर्षी कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांची कनिष्ठ कोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूकही झाली.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इराण मुस्लिम राष्ट्र असलं तरी अरब राष्ट्र नाही. तिथे स्त्रियांना इतर मुस्लिम राष्ट्रांपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांना आजही पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान आहे. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांतीनंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवू लागली. शिरीन एबादींसह सर्व महिला न्यायाधीषांना आपलं पद सोडावं लागलं.

 एबादींना सल्लागार म्हणून बदली नोकरी मिळाली पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. १९८४ साली त्यांनी निवृत्ती घेतली.  खूप प्रयत्नांनंतर १९९२ साली एबादी यांनी वकिली कारकीर्द सुरू केली.

इतर वकिल ज्यावर बोलण्यासही धजावायचे नाहीत, असे संवेदनशील खटले एबादी यांनी लढवले. मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य आणि इस्लामशी निगडीत अनेक प्रश्न एबादी यांनी न्यायालयात उपस्थित केले आणि सत्ताधीषांना आव्हान दिलं. एबादी महिलांच्या अधिकाऱांसाठी लढणाऱ्यांचा आवाज बनल्या.. अत्याचार सोसणाऱ्यांची बाजू एबादी यांनी मांडली तीही इस्लामच्या चौकटीत राहूनच. एबादी अनेकदा कुराणमधल्या घटनांचे दाखले अशातऱ्हेने देत की कट्टरपंथी न्यायाधीशही गोंधळून जात. देशविदेशांतून शिरीनना भाषणासाठी आमंत्रणं येऊ लागली. एबादी यांनी पुस्तकांतूनही अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

२००० साली शिरीनना  तुरुंगात टाकण्यात आलं. कबुलीजबाब घेण्यासाठी आपला अतोनात छळ करण्यात आला, असं एबादींनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय. एबादींना लोकांचा पाठिंबा पाहता सरकारनं अखेर त्यांची जामिनावर सुटका केली.

२००३ साली एबादी यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं. पुरस्कार स्वीकारून एबादी घरी परतल्या तेव्हा विमानतळावर हजारो लोक,  सहकारी, पुरोगामी नेते, अधिकारी आणि अयातोल्ला खोमेनींची मुलगीही आली होती.

२००९ साली इराणच्या वादग्रस्त निवडणुकींनंतर राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद यांच्याविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. एबादी यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांच्या जीवाला आधीपासून धोका होताच, पण परिस्थिती चिघळत गेली. २००९ सालापासून एबादी इंग्लंडमध्येच वास्तव्याला आहेत. इराणमध्ये परतणं त्यांच्यासाठी सध्या अशक्य आहे. पण देशाबाहेर पडल्यावरही त्यांचं काम थांबलेलं नाही.

– जान्हवी मुळे

पाकिस्तानच्या मातीत काही तरी खास असावं. म्हणूनच तिथे अनेक खंबीर महिलांनी जन्म घेतला. अस्मा जहांगीरपासून मलाला युसाफझाईपर्यंत अनेक स्त्रिया आज पाकिस्तानचं आणि पर्यायानं जगाचं रूप पालटवण्यासाठी प्रयत्न करतायत. तिथल्या सनातनी आणि कट्टरतावाद्यांचा सामना करतायत. खलिदा ब्रोही त्यातलीच एक. 2513bcc-2.cached

अवघ्या सोळाव्या वर्षी खलिदा महिलांवरील अत्याचाराविरोधात आंदोलनात उतरली. पण केवळ आंदोलन करून थांबली नाही, तर अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय.

बलुचिस्तानातल्या एका खेड्यात खलिदाचा जन्म झाला. टोळीवाल्यांच्या या प्रदेशात आजही जगणं सोपं नाही. त्यात महिलांची वाट तर आणखीनच खडतर. महिलांनी घराबाहेर पडू नये, असाच शिरस्ता. पण खलिदाचे वडील त्याला अपवाद ठरले. त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे खलिदाच्या आईला स्वतः लिहा वाचायला शिकवलं. आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनी गाव सोडून कराचीत राहण्याचा निर्णयही घेतला. पण खलिदा पाच वर्षांची असताना त्यांना गावी परतावं लागलं.

गावातला निसर्ग, तिथली संस्कृती, परंपरा यांत खलिदा रमून गेली. मात्र आपल्या समाजातल्या बालविवाह, ऑनर किलिंगसारख्या अनिष्ट प्रथा तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. खलिदा सोळा वर्षांची असताना घडलेल्या एका घटनेनं तिचं आयुष्य बदलून गेलं. खलिदाच्या एका मैत्रिणीची तिच्याच घरच्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या केली.

त्यानंतर खलिदानं ऑनर किलिंगविरोधात मोहीमच सुरू केली. फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तिचं काम चालायचं. ऑनर किलिंगसारख्या चालीरीतींना सरकारी नियम कसं खतपाणी घालतायत हे या मोहिमेतून समोर आलं. अम्नेस्टी इन्टरनॅशनलच्या पाठिंब्यामुळे दोनच वर्षांत खलिदाच्या मोहिमेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं. मीडियात खलिदाला प्रसिद्धी मिळत गेली. पण गावात येण्याच्या तिच्या वाटा बंद झाल्या.

समाजातल्या एखाद्या प्रथेविरुद्ध आवाज उठवणं सोपं नसतं. तरीही अनेकजण ते धैर्य दाखवतात. त्यातूनच आंदोलन तर उभं राहतं. पण अनेकदा प्रश्न सुटत नाहीत. केवळ सरकारी धोरणं बदलून समाज बदलणार नाही याची जाणीव खलिदाला झाली. तीन वर्ष ऑनर किलिंगविरोधात मोहिम चालवल्यावरही आपल्या गावातली परिस्थिती जैसे थे आसल्याचं तिच्या लक्षात आलं.

खलिदानं मग आपली योजनाच बदलून टाकली. सर्वात आधी खलिदानं गावातील लोकांची, टोळीवाल्या नेत्यांची आणि समाजातील मोठ्या लोकांची माफी मागितली. खलिदासाठी ते पाऊल फार कठीण होतं. पण त्यामुळे तिच्या समाजातील कला, संगीत, भाषा यांच्यावर आधारीत योजनेसाठी परवानगी मिळाली.

स्थानिक कलाकुसर आणि भरतकामाचा प्रसार करण्यासाठी खलिदानं गावात एक केंद्र सुरू केलं. प्रत्येक घरातील बायका दिवसातले दोन-तीन तास तिथं काम करायच्या. अनेकींनी त्याआधी कधीच घराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं. मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाल्यावर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. जमलेल्या महिलांना खलिदानं फक्त भरतकामच शिकवलं नाही, तर लिहा-वाचायला शिकवलं आणि आपल्या हक्कांची जाणीवही करून दिली.

सहा महिने सेंटरवर काम करणाऱ्या महिलांना खलिदानं स्वस्तात कर्ज उपलब्ध करून दिलं आणि स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. वाढत्या महागाईच्या काळात घरी पैसा येतोय म्हटल्यावर पुरुषांनीही थोडं नमतं घ्यायला सुरूवात केली.

सेंटरवर तयार होणारी कलाकुसर खलिदानं कराची आणि इतर मोठ्या शहरांत नेली अगदी थेट फॅशन शोज पर्यंत. आज खलिदाच्या टीमनं बलुचिस्तानातील आदिवासी स्त्रियांचा सुघार हा नवा फॅशन ब्रँडच तयार केला आहे. सुमारे २५ गावांत सध्या अशी भरतकामाची केंद्रं चालवली जातात आणि आठशेहून अधिक महिलांना त्यामुळे रोजगार मिळालाय. येत्या दहा वर्षांत दहा लाख महिलांपर्यंत पोहोचायचं लक्ष खलिदानं नजरेसमोर ठेवलंय.

केवळ धोरणं आणि कायदे आणून महिलांचं सबलीकरण होणार नाही, तर ठोस योजनाही राबवली जायला हवी, हे खलिदानं दाखवून दिलंय. तिच्या या कहाणीतून आपल्यालाही शिकण्यासारखं बरच काही आहे.

– जान्हवी मुळे

One child, one teacher, one book and one pen can change the World…

article-2465900-18D2B2DD00000578-33_306x423शिक्षणाच्या बळावर अख्खं जग बदलता येतं, हा विचार मांडलाय पाकिस्तानची युवा कार्यकर्ती मलाला युसुफझाईनं. खेळा बागडायच्या वयात मलालानं आपल्या देशात पाकिस्तानात एक चळवळ उभी केली, जी आज जगभर पोहोचली आहे.

मलाला खरं तर जेमतेम सतरा वर्षांची आहे. तिचा जन्म १९९८चा. पाकिस्तानातल्या निसर्गरम्य स्वात खोऱ्यात मलाला राहायची आणि इतर सर्वसामान्य मुलींसारखीच आपल्याच विश्वात रमलेली असायची. तिचे वडील झियाउद्दीन युसाफझई शाळा चालवायचे. त्यातही मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करायचे मलालाला त्यांनीच शिक्षणासाठी आणि पुढे लिखाणासाठी प्रोत्साहन दिलं.

एका पश्तुन परिवारात, जिथे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, अशा वातावरणात मलालाचा जन्म झाला होता. पण झियाउद्दीन यांनी आपल्या मुलीला कधीच दुबळं मानलं नाही. मलालाई या पश्तुन नायिकेचं नाव त्यांनी आपल्या मुलीला दिलं. वडिलांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र मलाला विसरलेली नाही.

जेव्हा तुमच्यापासून एखादी गोष्ट हिरावून घेतली जाते, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते, मलालाच्या बाबतीतही काहीसं तसंच झालं.

स्वातवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यावर तिथल्या सामान्य माणचांची घुसमट होऊ लागली. मुलींनी तर शिकूच नये असा फतवा निघाला. मलाला तेव्हा अकराच वर्षांची होती. पण त्या वयातही तिनं बीबीसीच्या उर्दू वेबसाईटसाठी गुल मकाई या नावानं लेखन केलं आणि स्वातमधलं वास्तव, त्यातही लहान मुलांची, मुलींची होत असलेली फरफट जगासमोर आणली. मलालावर कौतुकाचा, पारितोषिकांचा वर्षाव होऊ लागला.

आपल्या वाढत्या लोकप्रियेचा उपयोग मलालानं शाळेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी केला. पाकिस्तानी तालिबानला ही गोष्ट रुचली नाही. त्यामुळेच ऑक्टोबर २००८मध्ये शाळेतून घरी जात असताना मलालावर जीवघेणा हल्ला झाला. सगळं जगच त्या घटनेनं हादरून गेलं. ब्रिटनमध्ये मलालावर उपचार करण्यात आले. मृत्यूला मात देऊन मलाला त्यानंतर पुन्हा उभी राहीली, आणि मलाला फंडच्या रुपानं आजही तिचं शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच आहे.

मलालानं जे धैर्य दाखवलं, त्याचं कौतुक जगभरातील लोकांनी केलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये गेल्या वर्षी युवकांच्या खास सभेत मलालानं भाषण केलं. तो दिवसच ‘मलाला डे’ म्हणून साजरा करण्याचं संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलं. जगातल्या सोळा सर्वात प्रभावशाली युवतींमध्ये मलालाचा समावेश केला जातो. पण एक सेलिब्रिटी बनल्यावरही आपलं उद्दिष्ट विसरलेली नाही.

मलालानं आपली कहाणि ‘आय एम मलाला’ या पुस्तकात मांडली आहे, जी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

– जान्हवी मुळे

मणिपूर.. देशाच्या एका कोपऱ्यातलं राज्य, ज्याच्याकडे बहुतेकदा इतर भारतीयांचं फारसं लक्ष जात नाही. पण त्याच मणिपूरनं आपल्या देशाला दिल्या आहेत दोन नायिका.. बॉक्सर मेरी कोम, जिच्याविषयी आपण सगळेच जाणतो. आणि दुसरी इरोम चानू शर्मिला. आयर्न लेडी ऑफ मणिपूर. सहनशीलता, संघर्ष, कणखरता आणि मार्दव याचं प्रतिक बनली आहे शर्मिला.irom sharmila

जेवणाची नेहमीची वेळ टळून गेली तरी तुम्ही आम्ही भुकेनं कासावीस होतो. उपवासाच्या दिवशीही अनेकांचा एकादशी नि दुप्पट खाशी असा थाट असतो. मग विचार करा, गेली चौदा वर्ष, अन्नाचा कणही न घेता शर्मिला उपोषण करते आहे. मणिपूरमध्ये मानवाधिकारांसाठी शर्मिलाचा अहिंसक लढा सुरू आहे.

मणिपूर आणि आसाममध्ये फुटिरतावाद्यांचा बिमोड करण्यासाठी १९८०च्या दशकापासून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अक्ट अर्थात आफस्पा लागू करण्यात आलाय. ब्रिटिशांच्या राजवटीतल्या अध्यादेशावर आधारीत या कायद्यानं सैन्याला विशेषाधिकार दिले आहेत, ज्यांचा अनेकदा गैरवापरच होताना दिसतो. साल २०००मध्ये अशीच एक घटना घडली होती जिनं इरोम शर्मिलाचं आयुष्य बदलून टाकलं.

२ नोव्हेंबर २००० रोजी इम्फाळजवळच्या मालोम या छोट्या गावात आसाम रायफल्सच्या जवानांच्या एका गाडीसमोर विस्फोट झाला. त्यानंतर गाडीतील सैनिकांनी दहा निरपराध नागरिकांना गोळ्या घालून ठार केलं. मणिपूरमध्ये त्यावरून बरंच वादळ उठलं होतं. आफस्पाचा गैरवार पाहता हा कायदा मागे घेतला जावा या मागणीनं जोर धरला. इतर मणिपूरी जनतेप्रमाणेच २८ वर्षांची इरोम शर्मिलाही त्या घटनेनं पेटून उठली. मालोममध्ये हिंसाचार घडला त्या दिवशी शर्मिलाचा उपवासच होता. तिनं मग जेवण न घेण्याचा निर्धार केला आणि उपोषण सुरू ठेवलं.

तिसऱ्याच दिवशी शर्मिलाला अटक करण्यात आली. मणिपूर सरकारनं शर्मिलाला आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली कैदेत टाकलं आणि नाकातून बळजबरीनं अन्न द्यायला सुरूवात केली. आता चौदा वर्ष होत आली. पण शर्मिलाचा अहिंसक लढा अजून थांबलेला नाही. वयाची चाळीशी ओलांडल्यावरही तिचा निर्धार कायम आहे. आजवर कुणीही इतकी वर्ष उपोषणातून संघर्ष केलेला नाही. सैन्याकडून होणारा कायद्याचा गैरवापर आणि मानवाधिकारांचं उल्लंघन याविरुद्ध लढ्याची शर्मिला नायिका बनली आहे.

शर्मिलाची अधूनमधून कैदेतून सुटका केली जाते, ती पुन्हा अटक करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही पुन्हा तेच पाहायला मिळालं. शर्मिलाची मुक्तता करण्यात आली. मात्र तिनं उपोषण सुरूच ठेवल्यानं दोनच आठवडयात तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं. हे चक्र असंच सुरू आहे. पण शर्मिला हार मानणाऱ्यातली नाही, हे तिनं वारंवार सिद्ध करून दिलंय.

शर्मिलाच्या या लढ्यानं काय साध्य झालं, असा प्रश्न विचारला जातो. पण तिच्या सततच्या संघर्षामुळेच मणिपूरमधलं वास्तव इतर भारतीयांसमोर आलंय. मणिपूरच्या अनेक भागांतून आज आफस्पा मागे घेण्यात आलाय. पण हा कायदा पूर्णपणे मागे घेतला जाईपर्यंत आपली लढाई संपणार नाही असं शर्मिलानं स्पष्ट केलं आहे.

शर्मिलाला अनेक पक्षांनी निवडणुकीत उमेदवारी देऊ केली होती. पण ते शर्मिलानं नाकारलं. आपल्याला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, आपण एक सर्वसामान्य स्त्री आहोत आणि एक स्त्री म्हणून सामान्य, नॉर्मल आयुष्य जगायचं आहे, एवढीच शर्मिलाची अपेक्षा आहे. पण त्याच इच्छेनं शर्मिलाला असामान्य बनवलंय.

– जान्हवी मुळे