आजारपण बरंच काही शिकवून जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते तुम्हाला शांत करतं. It makes you take a pause and think. पण हा पॉझ एकदम धपकन येतो. तुम्ही तुमचं आयुष्य प्लॅन करत असता. मला हे करायचं आहे, याला भेटायचं आहे, इथे जायचं आहे, ते खायचं आहे… आणि धप्प!

१०३ ताप. डेंग्यू. बेड रेस्ट. कामाचा विचारही करायचा नाही. कसलाच ताण येऊ द्यायचा नाही. म्हणून आई-काकू विश्रांतीसाठी घरी कर्जतला घेऊन गेल्या. सुरूवातीला रोज ब्लड टेस्ट. प्लेटलेट काऊंट, डब्ल्यूबीसी, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर, अँटी बायोटिक्स, टॉनिक्स, व्हिटॅमिन्स .. बातम्यांऐवजी याच सगळ्या संज्ञांची चर्चा.

सतत धावपळ करणाऱ्या माणसाला बेड रेस्ट म्हणजे मोठी शिक्षा वाटते. शरीराला विश्रांती देणं सोपं तरी आहे, पण मनाचं काय? विचार न करण्याचा प्रयत्न ही जगातली सर्वात कठीण गोष्ट वाटू लागते अशा वेळी. दिवस चढू लागतो, तसे आसपासच्या सहसा दुर्लक्षित गोष्टी जाणवू लागतात. बेडशेजारच्या खिडकीतून येणाऱ्या उजेडाचे बदलते रंग, मऊ गादीचा कठीणपणा, छतावर फिरणाऱ्या पंख्याची गती, बाहेरचे आवाज.. आणि घरच्यांसोबत संवादातून उलगडत जाणारं जग.. थोडी बाहेरची हवा मिळावी म्हणून विशाल लाँग ड्राईव्हला घेऊन गेला, तेव्हा आणि दहीहंडीच्या दिवशी अंगणात आले तेव्हा केवढं हायसं वाटलं. सगळे अनुभव शब्दात मांडता येत नाहीत.

घरच्या प्रत्येकानं घेतलेली काळजी, औषधांसोबत रोज चार ते पाच लीटर पाणी, नारळपाणी, साखर-मीठ आणि कसलं कसलं पाणी यासोबतच पपईच्या पानांचा कडू आणि (भयंकर) उग्र दर्प असलेला रस असे बरेच उद्योग झाल्यावर आता बरी झालेय.

तीन खास व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी ही पोस्ट लिहिते आहे. आमचे कर्जतचे फॅमिली डॉक्टर दंपती ओसवाल आणि कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयातले आरोग्य सेवक अरूण कुमावत. कर्जतला डेंग्यूची साथ नाही. त्यामुळं डेंग्यूचा रुग्ण आढळला, तर सरकारी रुग्णालयात त्याची नोंद केली जाते. डॉक्टरांनी माझी केस रजिस्टर केल्यावर कुमावतजी आमच्या घरी आले.

एरवी सरकारी माणसं म्हणजे आपल्या ज्या काही संकल्पना असतात, त्या सगळ्या कुमावत यांनी खोट्या ठरवल्या. ते घरी पाहणी करण्यासाठी आले, माझ्या आजाराचे तारिखवार तपशील लिहून घेतले. डेंग्यूची माहिती दिली आणि घाबरू नका, असा धीरही दिला.

आजवर डेंग्यूसंदर्भातल्या जाहिराती रोज प्रत्येक ब्रेकमध्ये पाहिल्या आहेत. डासांमुळे डेंग्यू पसरतो. पण हा रोग नेमका काय आहे, कशानं होतो, आणि त्यावर काहीच औषध नाही, अशी माहिती नव्यानंच आणि नेमकी उमजली. आपल्या देशात एखाद्या आजाराची साथ इतक्या सहज पसरते, आणि त्याच्या गंभीरतेविषयी आपण बहुतेकदा अनभिज्ञ असतो. म्हणूनच डेंग्यूची माहिती सोबत जोडते आहे.

————

🔴डेंग्यू🔴

🔴मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्‍टाय डास चावल्‍यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानव – डास –मानव असा असतो. या डासांची उत्‍पत्‍ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्‍या व टाकाऊ वस्‍तू यात साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते.

🔴अधिशयन काळ

विषाणू बाधित डासाने चावा घेतल्‍यानंतर लक्षणे ५ ते ६ दिवसांच्‍या अधिशयन काळात दिसून येतात. मात्र हा काळ ३ ते १० दिवसांपर्यतचा असू शकतो.

रोगांची सर्वसाधारण चिन्‍हे व लक्षणे

डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्‍यामागे दुखणे इ. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्‍याचा सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्‍या काही दिवसात याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात व क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्‍या पुरळांवरुन केली जाते. नाकातून, हिरडयातून व गुदव्‍दारातून रक्‍तस्‍त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

🔴औषधोपचार

डेंग्‍यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, तथापि रोगलक्षणानुसार उपचार करावे. या रुग्‍णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.

🔴डेंग्‍यू तापाचे व्‍यवस्‍थापनः –

डेंग्‍यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्‍यास त्‍या रुग्‍णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्‍ट ) घेणेबाबत सल्‍ला देणे.

रुग्‍णाचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्‍या खाली राहण्‍यासाठी ताप प्रतिबंधक औषधे देणे व रुग्‍णांना ओल्‍या कपडयाने पुसून घेणे.

ज्‍या रुग्‍णांना जास्‍त प्रमाणात वेदना होतात त्‍यांना वेदनाशामक औषधे देण्‍याची आवश्‍यकता भासू शकते.

ज्‍या रुग्‍णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार / पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे.

🔴आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.

🔴पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.

🔴घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.

🔴घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकऊ साहित्‍य ठेऊ नये.

(माहिती संकलन- अरुण कुमावत, कर्जत)

Advertisements