Category: Food


‘इजिप्तला खाल्लंस काय? तिथलं जेवण कसं असतं आणि आवडलं तुला?’ इजिप्तवरून आल्यावर बहुतेकांचा हाच पहिला प्रश्न होता. म्हणूनच ठरवलंय, सर्वात आधी तिथल्या खाद्यसंस्कृतीवर लिहायचं.

खरं तर आश्चर्य वाटेल, पण इजिप्तला स्वतःची खाद्यसंस्कृतीच नाही. इतका प्राचीन देश असूनही इजिप्तचं जेवणाच्या बाबतीत स्वतःचं अस्तित्व नाही. तिथं मिळणारे बहुतेक पदार्थ हे मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत सगळीकडे मिळतात. ग्रीक, इटालियन (रोमन), टर्किश, मोरोक्कन, फ्रेन्च, लेबनीज, सीरियन खाद्यसंस्कृतीची छाप इजिप्तवर दिसून येते. पण इजिप्शियन क्विझिन असं काही अस्तित्वातच नाही. कदाचित हीच इजिप्तची सर्वात मोठी ताकद आहे, या देशानं इथं आलेल्या सगळ्यांच्या संस्कृतींना आपलंसं केलं आहे. निदान जेवणाच्या बाबतीत तरी नक्कीच.

पण तरिही, काही पदार्थ असे आहेत, जे इजिप्तची ओळख आहेत. विशेष म्हणजे त्यात शाकाहारी पदार्थांची कमी नाही.

IMG_20150105_213851

Clockwise from right – १. तामिया, २. लेंटिल सूप, ३. सॅलड्स, ४. कोशरी, ५. फुल मदामिस आणि ब्रेड ६. पिकल्ड एगप्लांट

 

तामिया अर्थात फलाफल म्हणजे एक प्रकारचे पकोडेच. भारतीयांना हा पदार्थ हळूहळू सवयीचा होतो आहे. चिक पीज अर्थात आपले छोले, हा यातला मुख्य घटक. फलाफल मूळचं लेबनॉनचं की इजिप्तचं, यावरून मतभेद आढळून येतात आणि चर्चाही झडतात.

फुल मिदामिस म्हणजे उकडलेल्या फावा बिन्सपासून बनवलेला पदार्थ. राजम्याच्याच जातकुळीतलं फुल इजिप्शियन ब्रेकफास्टमधला अविभाज्य भाग आहे. खारवलेल्या भाज्या आणि इजिप्शियन ब्रेडबरोबर फुल खाल्लं जातं. ऐश मास्री, ऐश बालादी असे इथल्या ब्रेडचे काही प्रकार, थेट मकई की रोटीची आठवण करून देतात.

याच ब्रेडवरून बरंच मोठं वादळही उठलं होतं. इजिप्तमध्ये घरोघरी ब्रेड बनत नाही. त्या प्रदेशातील इतर अनेक देशांप्रमाणे खास बेकरींमधूनच रोजचा ब्रेड घेतला जातो. रेशनिंगद्वारा ब्रेडच्या वाटपावरून सात वर्षांपूर्वी दंगलही झाली होती. पण आता ब्रेड वाटपासाठी नवी पद्धत लागू करण्यात आली आहे.

 

एगप्लांट्स अर्थात वांगं इजिप्तमध्ये सर्सास खाल्लं जातं. पिकल्ड एगप्लांट, इजिप्शियन मुसाका, ग्रिल्ड एगप्लांट्स अशा वांग्याच्या प्रकारांवर मी अक्षरशः ताव मारला. मसूराच्या डाळीचं सूप, तऱ्हेतऱ्हेची सॅलड्सही बहुतेक वेळा आमच्या टेबलवर असायचीच.

कोशियरी ही इजिप्तची नॅशनल डिश मानली जाते. भात, बारीक पास्ता, मसूर किंवा मसूर डाळ, कांदा, छोले आणि आवडीनुसार भाज्या किंवा चिकन घालून बनवला जाणारा हा पदार्थ एकेकाळी मजूरांचं अन्न म्हणून ओळखला जायचा. एक वाडगाभर कोशियरी खाल्ल्यावर पुढे कित्येक तास काही खाल्लं नाही, तरी चालून जातं.

20141228_135426

डोल्मा

20141228_135442

मोसाका

IMG_20150105_215713

ग्रिल्ड फिश आणि कलामारी, अलेक्झांड्रिया

 

डोल्मा, म्हणजे द्राक्षाच्या पानात गुंडाळून वाफवलेलं भाताचं मिश्रण. अगदी आपल्या अळुवडीसारखं. काहीसा कडवट लागणारा हा पदार्थ, औषधीही मानला जातो. भूमध्य सागरी प्रदेशात सगळीकडे डोल्मा खाल्लं जातं.

इजिप्तमधले वेगवेगळे कबाब्ज, श्वावर्मा, ग्रिल्ड मीट, चिकन आणि फिशचेही अनेक प्रकार म्हणजे अस्सल खवय्यांसाठी पर्वणीच आहे. आणि अलेक्झांड्रिया तर सी-फूडच्या चाहत्यांचा स्वर्गच आहे. समुद्राची गाज ऐकत, गार वाऱ्यात सामक माश्वी, सामक माकली अर्थात ग्रिल्ड फिश आणि कलामारी (स्क्विड) यांचा आस्वाद लुटण्याची मजा औरच होती.

करकदेह

करकदेह

बकलावा, टर्किश डिलाईट आणि इजिप्शियन मिठाई

बकलावा, टर्किश डिलाईट आणि इजिप्शियन मिठाई

 

इजिप्शियन लोक भारतीयांसारखेच पक्के चहाबाज. उत्तर इजिप्तमधला चाय कोशरी आणि दक्षिणेकडचा चाय सेईदी असे ब्लॅक टीचे प्रकार इथे प्रसिद्ध आहेत. करकदेह हे एक प्रकारच्या फुलाच्या पाकळ्यांपासून बनवलं जाणारं पेय, खास करून दक्षिण इजिप्तमध्ये लोकप्रिय आहे.

गोडधोड खाणाऱ्यांचीही इजिप्तमध्ये चंगळ आहे. टर्किश डिलाईट, बक्लावा, आणि अनेक तऱ्हेची डेझर्टस इथं मिळतात.

माझ्या तितल्या वास्तव्याच्या काळात, अधूनमधून कोरियन, चायनीज, थाई, भारतीय, इटालियन, फ्रेन्च खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळाली.

IMG_20141231_100056

रमादानच्या घरचा जेवणाचा थाट..

आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. इजिप्शियन लोकांना स्वतः खायला भरपूर आवडतं, आणि पाहुणेमंडळींना भरपूर खायला घालायलाही आवडतं. लुक्सॉरला आमचा गाईड आणि मित्र रमादाननं त्याच्या घरी जेवायला नेलं होतं, आणि आम्ही दोघी शाकाहारी जेवणाला पसंती देतो म्हटल्यावर, तशी खास तजवीजही केली होती.

One should enjoy the food and taste of life- प्रत्येकानं जेवणाचा आणि जीवनाचा आनंद लुटायला हवा, हे रमादानचे बोल खूप काही शिकवून गेले.

– जान्हवी मुळे

 

Advertisements

Coffee Mug

दोन दिवसांपूर्वी एका मैत्रिणीशी झालेला संवाद..

‘हलो जान्हवी… शॉपिंग झालं?’

‘नाही गं.,’

‘काय विकत घेते आहेस आता? ‘

‘कॉफी मग.’

‘अगं थोड्या वेळापूर्वी फोन केला, तेव्हा पण कॉफी मगच शोधत होतीस ना? ‘

‘हो, पण मनासारखा मिळत नाहीये एकपण.’

‘तू पण कमाल आहेस. थापा नको मारूस हां.. कपडे, दागिने खरेदी करताना अगदी पटकन निवडून मोकळी होतेस. आणि एका साध्या कपासाठी एवढा वेळ?‘

‘हं.. तीच तर खरी गंमत आहे. साधा कप नकोच आहे मला. I want a unique coffee mug. Something special. चांगला दिसला पाहिजे, शक्यतो पांढरा किंवा काळा किंवा अगदी गडद निळा. आणि त्याची ग्रिप छान असली पाहिजे’

‘ग्रिप?’

‘कान गं.’

‘अरे देवा, एवढ्याशा मगसाठी इतका विचार. चहासारखा चहा किंवा कॉफीसारखी कॉफी. मग ती कोणत्याही कपमधून प्या, काय फरक पडतो? चव चांगली असेल म्हणजे मिळवलं… छोट्या छोट्या गोष्टींवर केवढा वेळ घालवायचा?’

‘छोट्या छोट्या गोष्टी… खरंय, चहाचा कप, कॉफीचा मग ही गोष्ट काही फार मोठी नाही. पण काहीवेळा अशा छोट्या गोष्टीच महत्त्वाच्या असतात. म्हणजे बघ हां, माझा स्वतःचा मग, ज्यातून फक्त मी चहा-कॉफी पिणार, म्हणजे तो माझ्या रोजच्या जगण्याचा, सकाळचा भाग बनणार. दिवस सुरू होताना त्याची साथ असणार. कधी अस्वस्थ वाटल्यावर तोच माझ्या हातात असणार. माझा कॉफी मग, आणि त्याच्यासोबत शांतपणे घालवण्यासाठी काढलेली चार-पाच मिनिटं, अनेकदा नवा विचार जागवतात मनात. I must feel special to hold it you know… and don’t forget one thing- your tea/coffee-mug is the only one whom you’d kiss every morning, without fail..!’

‘Lolz! आवडली ही कल्पना.. तू भन्नाट आहेस.. ‘

‘भन्नाट नाही गं, पण एक गोष्ट समजली आहे. आयुष्यात अशा छोट्या गोष्टींना जपलं पाहिजे. त्यातच मोठा आनंद असतो.’

– जान्हवी मुळे