मी हे का निवडलं? मी ते निवडलं असतं तर? वयाच्या एखाद्या टप्प्यावर हा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. विशेषतः जोडीदाराच्या बाबतीत.

व्हॅनेसा रेडग्रेव्ह, क्लॅरिसाच्या भूमिकेत

व्हॅनेसा रेडग्रेव्ह, क्लॅरिसाच्या भूमिकेत

क्लॅरिसा डॉलोवे, व्हर्जिनिया वूल्फच्या ‘मिसेस डॉलोवे’ची नायिका याच विचाराशी झगडते आहे. 51 वर्षांची क्लारिसा लंडनच्या उच्चभ्रू वर्गातली गृहिणी. क्लारिसानं लंडनमधल्या आपल्या घरी पार्टी आयोजित केली आहे आणि फुलं आणण्यासाठी ती सकाळी सकाळीच बाहेर पडली आहे. त्या दिवसभरात क्लॅरिसाला आलेले अनुभव, तिच्या मनातले विचार, तिच्या तरूणपणीच्या आठवणी, तिचं आताचं जग यांतून कथानक उलगडत जातं. क्लॅरिसाचा एकेकाळचा जीवलग मित्र आणि प्रियकर पीटर वॉल्श दिला भेटण्यासाठी येतो आणि क्लॅरिसा आपल्या लग्नाच्या निर्णयाविषयी विचार करू लागले. क्लॅरिसाचा नवरा रिचर्ड राजकारणात तर मुलगी इतिहासाच्या अभ्यासात व्यस्त आहेत. आपण खरंच खूश आहोत का, जी स्वप्न पाहिली होती, ती पूर्ण झाली आहेत का या विचारात क्लॅऱिसा अडकली आहे.

तरुणपणीची काहीशी अवखळ क्लॅरिसा आता चार भिंतींच्या आड अडकली आहे. फॅशनेबल कपडे घालणं आणि मोठमोठ्या पार्ट्या देणं हेच तिचं विश्व बनलंय. आपली काही वेगळी ओळख नाही, याची खंतही तिला कधीतरी वाटते. ‘आता मी फक्त मिसेस डॉलोवे आहे, मला क्लॅऱिसा म्हणणारं कुणीही नाही’ हा विचार एका क्षणी क्लॅरिसाच्या मनात येतो.    

क्लॅरिसाच्या कथानकाला समांतर आणखी एक कथानक व्हर्जिनियानं या कादंबरीत मांडलं आहे- सेप्टिमस वॉरेन स्मिथ. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेसचा सामना करणारा, मनोविकारानं ग्रासलेला युवा सैनिक. ३-४ वर्षांपूर्वी संपलेल्या पहिल्या महायुद्धात सेप्टिमस लढला होता. युद्धादरम्यान मित्राच्या मृत्यूमुळं सेप्टिमसला धक्का बसला आहे, तो आत्महत्येच्या विचारात आङे. त्याची पत्नी रेझिया सेप्टिमससोबत खंबीरपणे उभी आहे, मात्र एका क्षणी सेप्टिमस आपलं आयुष्य संपवतो.

क्लॅरिसाच्या घरी पार्टीमध्ये समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले लोक येतायत. पीटर आणि क्लॅरिसाची लहानपणीची मैत्रिण सॅलीही तिथं आली आहे. सॅलीमधला बदल क्लॅऱिसाला काहीसा अनपेक्षित आहे. दुसरीकडे सेप्टिमसचे डॉक्टर आणि डॉलोवे कुटुंबाचे मित्र सर विल्यम ब्रॅडशॉ यांच्यामुळं क्लॅरिसाला सेप्टिमसच्या मृत्यूविषयी कळतं आणि ती स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करू लागते.

व्हर्जिनिया वूल्फ

व्हर्जिनिया वूल्फ

आठवणींचे फ्लॅशबॅक्स वगळता ‘मिसेस डॉलोवे’चं मुख्य कथानक एकाच दिवसात घडतं, आणि तरीही खिळवून ठेवतं. व्हर्जिनिया वूल्फनं त्या साध्या थीममध्येही नाट्य उभं केलं आहे. ही कहाणी दोन महायुद्धांमधलं इंग्लंड, युद्धामुळं समाजात घडत असलेले बदल, युद्धावरून परतलेल्या सैनिकांसमोरच्या समस्या, मनोविकार एका गृहिणीचं भावविश्व, अपुरी राहिलेली स्वप्न, समलिंगी आकर्षण, स्त्रीस्वातंत्र्य अशा महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य करते.

अशा विचारसरणीनं व्हर्जिनियानं आधुनिक साहित्याला मोठं योगदान दिलं आहे. उच्चशिक्षित, घरातून साहित्याचा वारसा लाभलेली व्हर्जिनिया अधिक डोळसपणे आसपासच्या परिस्थितीकडे पाहते. तिनं स्वतः मानसिक आजारांचा सामना केला होता, आणि अखेर ५९व्या वर्षी स्वतःच आपलं आयुष्य संपवलं होतं.

आपल्या लेखनातून व्हर्जिनियानं स्त्रीचं अंतरंग, तिचे विचार मोकळेपणानं मांडले. त्यामुळंच आज तिच्याकडे फेमिनिस्ट विचारसरणीचा पाया घालणारी लेखिका म्हणून पाहिलं जातं.

– जान्हवी मुळे