इंग्रजी साहित्याविषयीची कुठलीही मालिका जेन ऑस्टिनच्या ‘प्राईड अँड  प्रेज्युडिस’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 

कियारा नाईटली - एलिझाबेथ बेनेटच्या भूमिकेत

कियारा नाईटली – एलिझाबेथ बेनेटच्या भूमिकेत

प्राईड अँड  प्रेज्युडिस ही इंग्रजीमधली सर्वात लोकप्रिय कादंबरी मानली जाते. एलिझाबेथ बेनेट उर्फ लिझी याच कादंबरीची नायिका आहे. इंग्रजी साहित्यातली सर्वात लाडकी नायिका. म्हटलं तर चाकोरीमधली आणि म्हटलं तर चाकोरीबाहेरची.

लिझी ही बेनेट दंपतीच्या पाच मुलींपैकी दुसरी. ती सुंदर आहे, पण केवळ नटण्यामुरडण्यात रमणारी नाही. ती हुशार आहे, विचार करून वागते-बोलते म्हणून आपल्या वडिलांचीही ती लाडकी आहे. लिझीच्या आईला मात्र आपल्या पाचही मुलींच्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचत नाही.

बेनेट कुटुंबियांच्या शेजारी चार्ल्स बिंगले आणि फिट्झविल्यम डार्सी राहायला येतात आणि लिझीच्या आईचा उत्साह ओसंडून वाहायला लागतो. लिझीची मोठी बहीण जेन आणि चार्ल्स एकमेकांच्या प्रेमात पडतायत असं वाटू लागतं. तर दुसरीकडे लिझी आणि डार्सीमध्ये खटकेच उडताना दिसतात. एकमेकांविषयी पूर्वग्रह आणि अभिमान लिझी आणि डार्सीच्या कहाणीत आडवे येतात.

१८व्या शतकातल्या इंग्लंडधील प्रथेनुसार आणि आर्थिक परिस्थितीमुळं लिझीला लग्न करणं भाग आहे. पण केवळ सामाजिक गरज आणि पैशासाठी नाही, तर प्रेमासाठी. लिझी इथंच आपल्या बहिणींपेक्षा वेगळी ठरते. लग्नाचा एक प्रस्ताव ती सहज नाकारते. डार्सीवर प्रेम करत असूनही सुरूवातीला त्यालाही नकार देते. कथानक पुढे सरकतं, तसं लिझीचं पात्र खुलत जातं, तिच्यात अधिक मोकळेपणा आणि ठामपणा येतो.

ऑस्टिननं ज्या पार्श्वभूमीवर हे लेखन केलंय, त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १९व्या शतकाच्या सुरूवातीचा, इंग्लंडच्या सिंहासनावर राणी व्हिक्टोरिया येण्याआधीचा तो काळ. ऑस्टिन लिहित होती, तेव्हाच अमेरिकचं स्वातंत्र्ययुद्ध, फ्रान्समधली राज्यक्रांती, नेपोलियनिक युद्धं या जग बदलणाऱ्या घटना घडत होत्या. (याच सुमारास भारतात इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तीन युद्ध झाली.)

तरीही ऑस्टिननं राजकीय अथवा सामाजिक भाष्य केलं नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र या सर्व घटनांचा तिच्या कथानकातील पात्रांवर अगदी थेट नाही, पण परिणाम तर होतोच. प्राईड अँड प्रेज्युडाईसमध्ये गावात सैन्यानं तळ ठोकल्याचा उल्लेख आहे, काही पात्रांची लष्करी पार्श्वभूमी आहे.

बदलांच्या त्या काळात, प्रिन्स जॉर्जच्या अधिपत्याखाली इंग्लंडमध्ये साहित्य आणि कलेची मात्र भरभराट झाली. ऑस्टिनला त्याचा फायदाच झाला.

तसं जेन ऑस्टिनच्या कादंबऱ्या एका चौकटीतलं – उच्चभ्रू ब्रिटिश कुटुंबांमध्ये घडतात. तिथं गरीब-श्रीमंत हा भेद दिसतो, पण त्यातला संघर्ष समोर येत नाही. मात्र ऑस्टिनचं जग त्या त्या काळातल्या इंग्लंडच्या समाजव्यवस्थेची विशेषतः स्त्री-विश्वाची जाणीव करून देतं. तिथं स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, पण त्या स्वतंत्र विचारही करतात. म्हणूनच त्या जास्त खऱ्या वाटतात.

ऑस्टिनच्या जगातल्या स्त्रिया आणि आजच्या बहुसंख्य महिला यांच्या आसपासच्या परिस्थितीत अजूनही बरंच साम्य आहे. कदाचित म्हणूनच तिच्या कादंबऱ्या आजही वाचल्या जातात, आजच्या काळालाही लागू पडतात.

ऑस्टिन बंडखोर लेखिका नव्हती कदाचित, पण आपल्या चाकोरीच्या आत राहून तिनं केलेलं छोटंस बंडही महत्त्वाचं आहेच.

– जान्हवी मुळे 

Advertisements