जेन ऑस्टिन

जेन ऑस्टिन

इंग्रजी साहित्याची, विशेषतः रोमँटिक नॉव्हेल्सची अनभिषिक्त साम्राज्ञी म्हणजे जेन ऑस्टिन. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला ऑस्टिनच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि आज २१व्या शतकातही त्या तितक्याच आवडीनं वाचल्या जातात.

खरं तर जेन इंग्लंडच्या उच्चभ्रू जमिनदार वर्गातली. साहजिकच तिच्या बहुतेक कहाण्या प्रामुख्यानं त्याच वर्गात घडतात आणि त्या काळातल्या इंग्लंडच्या सामाजिक परिस्थितीवर – खास करून स्त्रियांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकतात.

ऑस्टिनच्या नायिका या केवळ लग्न करून संसार थाटण्याच्या उद्देशानं जगतात अशी टीका अनेकदा केली जाते. पण त्या काळातल्या समाजानं आखून दिलेल्या चौकटीतही या प्रत्येक नायिकेचं स्वतंत्र भावविश्व आहे. परावलंबी असूनही अनेकदा थोड्या प्रमाणात का असेना, त्या या परिस्थितीविरोधात बंडही करतात.

जेन ऑस्टिननं एकूण सहा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यात असंख्य पात्रं उभी केली. ‘सेन्स अँड सेन्सिबलिटी’मध्ये एलिनॉर डॅशवूड, ‘प्राईड अँड प्रेज्युडाईस’ची एलिझाबेथ बेनेट, ‘मॅन्सफील्ड पार्क’ची फॅनी प्राईस, ‘एमा’ कादंबरीची नायिका एमा वुडहाऊस, ‘नॉर्थहँगर अॅबी’मधली कॅथरीन मोरलँड आणि ‘परस्युएजन’ची अॅन इलियट – ऑस्टिनच्या प्रत्येक कादंबरीत नायिकेचं पात्रच केंद्रस्थानी आहे.

प्राईड अँड प्रेज्युडाईसच्या लोकप्रियतेमुळं एलिझाबेथ बेनेट अनेकांच्या परिचयाची असेल. ( या कादंबरीच्या बॉलिवूड कॉपीमध्ये ऐश्वर्या रायनं ते पात्र साकारलं होतं.) तर एमा वरही बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार करण्यात आला. (सोनम कपूरचा ‘आयशा’)

एलिनॉर

एलिनॉर

पण या दोघींपेक्षा व्यक्तिशः मला एलिनॉरच जास्त आवडते. सेन्स अँड सेन्सिबलिटी ही कादंबरी एलिनॉर आणि तिची बहीण मरियनची कहाणी सांगते.  

अवघ्या १९व्या वर्षी एलिनॉर वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आई-बहिणींना सावरण्यासाठी उभी राहते. सावत्र भाऊ-वहिनीच्या दुस्वासामुळं एलिनॉर, मरियन, त्यांची आई आणि लहान बहीण मार्गारेटवर संकट कोसळलंय. एका नातेवाईकाच्या आधारानं त्यांच्या डोक्यावर छप्पर तर आहे. पण जगण्यासाठी पैसाही लागतो हे वास्तव एलिनॉरला माहिती आहे. ती आपल्या घराची जबाबदारी स्वीकारते. मरियन मात्र १६ वर्षांची, अल्लड आहे आणि स्वप्नांच्या जगात रमते. एलिनॉरलाही लग्न करायचं आहेच, पण भावानांमध्ये ती वाहात नाही आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणं हे तिचं मुख्य ध्येय्य आहे.

एलिनॉरचा सेन्स आणि मरियनची सेन्सिबलिटी… स्त्रीची दोन रूप ऑस्टिननं एकाच कादंबरीत रंगवली आहेत. ऑस्टिनच्या या पहिल्यावहिल्या कादंबरीनं वाचकांना खिळवून ठेवलं नसतं, तरच नवल.

51uizmo5y1l-_sx338_bo1204203200_

सेन्स अँड सेन्सिबलिटी 1811 साली अनामिकपणे (By a Lady या नावानं) प्रकाशित झाली तेव्हा ऑस्टिन 36 वर्षांची होती आणि ऑस्टिनचा मृत्यू झाला तेव्हा तिचं वय होतं ४१ वर्ष (1817). म्हणजे केवळ ५-६ वर्षांच्या काळात या कादंबऱ्यांना मोठा वाचकवर्ग मिळाला. ऑस्टिनच्या आणखी दोन कादंबऱ्या अर्धवट असतानाच तिचा मृत्यू झाला.

ऑस्टिनच्या मृत्यूनंतर जवळपास ५ दशकांनी तिचं जीवनचरित्र प्रकाशित झालं आणि वाचकांना पुन्हा या कादंबऱ्यांमध्ये रस वाटू लागला. ऑस्टिनच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती नाही. तिनं लग्न न करण्याचा निर्णय का घेतला याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जातात. २०० वर्षांनंतरही ऑस्टिनविषयीची आणि तिच्या कादंबऱ्यांविषयीची उत्सुकता कमी झालेली नाही.

– जान्हवी मुळे

PS – ऑस्टिनच्या कादंबऱ्या चित्रपटांसाठी अगदी परफेक्ट आहेत. सेन्स अँड सेन्सिबलिटीवर 1995 मध्ये आंग लीनं काढलेला चित्रपट अतिशय गाजला होता – त्यात एमा थॉम्पसननं एलिनॉरची तर केट विन्सलेटनं मरियनची भूमिका केली होती. याच कथेवर आधारीत तमिळ चित्रपटात तब्बू आणि ऐश्वर्या रायनं काम केलं होतं.

Advertisements