51zk10qrjwl-_sx321_bo1204203200_

“I think there’s just one kind of folks. Folks.”

माणसाची एकच जात असते- माणूस.

किती साधं, सोपं आणि तेवढंच कठीण वाक्य आहे! हार्पर ली या लेखिकेच्या ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीचा हाच तर संदेश आहे. हार्परचं खरं नाव नेली हार्पर ली. आपल्या लहानपणीच्या आठवणींवर आधारीत तिची ही कादंबरी 1960 साली प्रकाशित झाली. या कादंबरीचं कथानक १९३०-३५ दरम्यान अलाबामामधल्या एका छोट्या शहरात मेकोम्बमध्ये घडतं. स्काऊट त्याच कथेची नायिका आहे.

जीन लुई स्काऊट फिन्च जेमतेम पाच-सात वर्षांची आहे. स्काऊटला आई नाही, तिचे वडी अॅटिकस अटॉर्नी आहेत. स्काऊट आणि तिचा भाऊ जिम वडिलांना नावानंच हाक मारतात. स्काऊट पक्की टॉमबॉय आहे आणि तिची आंट अॅलेक्झांड्रा तिला मुलींसारखं वागवण्याचा प्रयत्न करत राहते. पण अॅटिकसनं स्काऊटला अगदी मोकळीक दिली आहे.

मेरी बॅडहॅम - स्काऊटच्या भूमिकेत आणि ग्रेगरी पेक अॅटिकस फिन्चच्या भूमिकेत

मेरी बॅडहॅम – स्काऊटच्या भूमिकेत आणि ग्रेगरी पेक अॅटिकस फिन्चच्या भूमिकेत

स्काऊट धाडसी तर आहेच, पण अत्यंत हुशारही आहे. तिच्यातली दयाळू वृत्ती आणि कनवाळू स्वभावही अनेकदा दिसून येतो. स्काऊट कधीकधी आपल्या कल्पनाविश्वातही रमते. 

स्काऊटच्या नजरेतून मेकोम्बमधल्या घडामोडी उलगडत जातात. अॅटिकस लढत असलेला खटला, त्याविषयी आसपास उमटणाऱ्या प्रतिक्रिया यांचा परिणाम स्काऊटवरही होतो. १९६० साली लिहिलेली ही कादंबरी बलात्कार आणि वर्णद्वेश या दोन मुख्य समस्यांवर भाष्य करते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही अमेरिकेतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात या समस्या कायम आहेत. स्काऊटची ही गोष्ट ५५ वर्षांनंतरही म्हणूनच महत्त्वाची ठरते.

हार्पर लीला टू किल अ मॉकिंगबर्डसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. याच पुस्तकावर आधारीत चित्रपटात अॅटिकसच्या भूमिकेसाठी ग्रेगरी पेकलाही ऑस्कर मिळालं. स्काऊटची कहाणी अमेरिकेत शालेय अभ्यासक्रमाचाही भाग बनली. स्वतः हार्परलाही हे एवढं यश अपेक्षित नव्हतं. कदाचित म्हणूनच तिनं त्यानंतर दुसरी कादंबरी लिहिली नाही.

टू किल अ मॉकिंगबर्डची लोकप्रियता केवढी आहे याचा प्रत्यय गेल्या वर्षी पुन्हा आला. हार्पर लीच्या या पुस्तकाचा पहिला कच्चा मसूदा गो सेट अ व़ॉचमन या नावानं प्रकाशित झाला, तेव्हा त्यावरही लोकांच्या उड्या पडल्या. अर्थात त्या पुस्तकाला टू किल अ मॉकिंगबर्डची सर नाही.

हार्परनं यंदा फेब्रुवारीमध्ये या जगाचा निरोप घेतला. पण तिची कहाणी यापुढच्या पिढ्यांनाही खूप काही शिकवणारी ठरेल यात शंका नाही.

– जान्हवी मुळे

 694008

Advertisements