आजच्या घडीच्या सर्वात यशस्वी लेखकांपैकी एक म्हणून जे. के. रोलिंग प्रसिद्ध आहे. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही तिचा कालपरवापर्यंत समावेश होता. पण सेवाभावी कार्यासाठी तिनं आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान केल्यामुळं ताज्या यादीत तिला आता स्थान मिळालं नसल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती.

 

jk-rowling

जे. के. रोलिंग

एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठी झगडणारी जोआन, सिंगल मदर म्हणून मुलीला सांभाळायची कसरत करणारी जोआन, पुढं जगातली सर्वात श्रीमंत लेखिका बनली. रोलिंगला इतकं अफाट यश हॅरी पॉटरनं मिळवून दिलंय. पण त्या एकाच पुस्तक-मालिकेवर ती थांबलेली नाही.

हॅरी पॉटर मालिकेनंतर रोलिंगनं त्याच्याशी निगडीत लिखाण सुरू ठेवलंच, शिवाय 2012 साली ‘ कॅज्युअल व्हॅकेन्सी’ ही कादंबरी – खरं तर ग्रंथच प्रकाशित केला.

पण रोलिंगचा पोस्ट-हॅरी पॉटर-मास्टरपीस म्हणजे डिटेक्टिव्ह कार्मोरॉन स्ट्राईक. रॉबर्ट गॅलब्रेथ या टोपणनावानं रोलिंगनं ‘द कुकूज कॉलिंग’ ही कादंबरी लिहिली. कार्मोरॉन त्या कादंबरीचा नायक. द कुकूज कॉलिंग प्रकाशित झाली, तेव्हा तिचं बरंच कौतुक झालं. पण लेखकाविषयी नेमकी कुणाला माहिती नव्हती. एका वृत्तपत्रानं बरंच संशोधन करून गॅलब्रेथ म्हणजे दुसरं-तिसरं कुणी नाही तर रोलिंगच आहे हे सिद्ध केलं.

द कुकूज कॉलिंगनंतर याच मालिकेत रोलिंगनं द सिल्कवर्म आणि करिअर ऑफ एव्हिल या याच मालिकेतील दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्यात स्ट्राईकच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणारी त्याची सेक्रेटरी रॉबिन एलाकॉट हे एक भन्नाट कॅरेक्टर आहे.

तसं रोलिंगच्या कादंबऱ्यांमधील मुख्य स्त्री पात्रं – अगदी खलनायिकाही अतिशय कणखर असतात. रॉबिन हे त्यातलं सर्वात वास्तववादी पात्र आहे.

द कुकूज कॉलिंगमध्ये रॉबिन स्ट्राईकसाठी टेम्पररी सेक्रेटरी म्हणून आठवडाभरच काम करणार असते. पण पुढे त्याची जणू पार्टनर बनते. एका दूरच्या गावात वाढलेली रॉबिन बॉयफ्रेण्ड मॅथ्यूसोबत लंडनला राहायला आली आहे. दोघांचं लग्न ठरलं असून रॉबिनच आयुष्य मॅथ्यू म्हणेल ती पूर्व दिशा असं बनलं आहे. मात्र स्ट्राईकसोबत काम करताना रॉबिनला स्वतःचं अस्तित्व निर्माण कऱण्याची संधी मिळते आणि तिचं पात्र बहरत जातं.

रॉबिनचा भूतकाळ दुर्दैवी घटनेनं झाकोळला आहे. त्या भूतकाळानंच तिला काहीसं दुर्बल बनवलं, पण पुढं लढण्याचा आत्मविश्वासही दिला. आपल्या लग्नाचं अगदी बारकाईनं प्लॅनिंग करणारी रॉबिन, बिनधास्त गाडी चालवणारी रॉबिन, गुन्ह्याचा तपास लावताना चालाखीनं काम करणारी रॉबिन, गुन्ह्याचे बळी पडलेल्यांविषयी आत्मीयता बाळगणारी रॉबिन, स्ट्राईक आणि मॅथ्यू या दोघांमध्ये ओढाताण झालेली रॉबिन असे रॉबिनच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे आहेत.

पुरुषाकडून होते ती चूक, स्त्रीकडून होतो तो गुन्हा या मनोवृत्तीचा फटका रॉबिनला बसतो. रॉबिन मुलगी असल्यानं ती ‘डिटेक्टिव्हगिरी’ करणार या कल्पनेनं तिच्या भावाला हसू येतं. अशा अनके पूर्वग्रहांना रॉबिन तोंड देते. रॉबिन आणि स्ट्राईकमधलं नातं व्यावसायिक नात्यापलिकडे गेलं आहे, दोघांमध्ये एक भावनिक बंध निर्माण झाला आहे पण रॉबिन मॅथ्यूची आहे हा विचार स्ट्राईकच्या मनातून जात नाही.

ही कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. कदाचित रोलिंग भविष्यात आणखी स्ट्राईक नॉव्हेल्स काढेल आणि त्यात रॉबिनचं पात्र आणखी किती भराऱ्या घेतंय यावर माझ्यासारख्या चाहत्यांची नजर राहील.

– जान्हवी मुळे

robert galbraith.png

Advertisements