ती नायिका आहे, पण नायकाची प्रेयसी नाही. तिच्याशिवाय कहाणी पूर्ण होऊ शकत नाही.

hermione1

एमा वॉटसन – हर्मायनी ग्रेंजरच्या रूपात

जे.के. रोलिंगची हर्मायनी ग्रेंजर केवळ हॅरी पॉटरच्या विश्वातली ग्रेटेस्ट विच कदाचित आजवरची ग्रेटेस्ट हिरॉईन ठरावी. 

 

आता लहान मुलांच्या पुस्तकाविषयी काय वाचायचं, असा विचार मनात आला असेल, तर जरा थांबा. कारण रोलिंगची ही मालिका केवळ लहान वयाच्या वाचकांसाठीची नाही. त्या कथानकातून समोर येणाऱ्या अनेक themes कुणा प्रौढ व्यक्तीलाही विचारात पाडणाऱ्या आहेत. हर्मायनीचं पात्र हे त्यापैकीच एक.

हर्मायनीची आणि माझी पहिली भेट झाली, तेव्हा खरं तर माझे कॉलेजचे दिवस होते. हॅरीपेक्षाही मला पहिल्यापासून हर्मायनीच आवडली.

हर्मायनी जादूगारांच्या परिवारातली नाही. पण ती अत्यंत हुशार आहे. हर्मायनीला आपल्या गुणवत्तेची जाणीव आहे, पण तिला अजिबात गर्व नाही आणि ती बुजरीही नाही. तिला पुस्तकं आवडतात आणि कुठल्याही समस्येचं उत्तर हुडकून काढण्यात ती तरबेज आहे.

हर्मायनी शिस्त पाळते; पण वेळ पडली तर नियम मोडायचीही तिची तयारी आहे. कुण्याही दुर्बल व्यक्तीवर अन्याय झालेला तिला सहन होत नाही. 

86cba82f2f7849c842ae447238c035d2

हर्मायनी ग्रेंजर

हर्मायनीच्या व्यक्तिमत्वाला नाजूक कंगोरेही आहेत, पण एक स्त्री म्हणून तिला कमजोर समजण्याची चूक कुणीही करू शकणार नाही. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची तिची तयारी आहे. आपलं मत ती स्पष्टपणे व्यक्त करते आणि तितक्याच मोकळेपणानं प्रसंगी भावनांना वाट करून देते.

कथा हॅरीची असली, तरी त्यातही हर्मायनीचं स्वतंत्र अस्तित्व आहे. हॅरीसोबतचं तिचं नातं हे निखळ मैत्रीचं नातं आहे. हर्मायनीचा हॅरीमधल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. ती आणि ऱॉन वेळोवेळी हॅऱीला साथ देतात. एका क्षणी रॉनही हॅरीची साथ सोडतो, पण हर्मायनी हॅरीसोबत चालत राहते. हॅरीला आणि पर्यायानं जगालाही वाचवण्यासाठी कुठली वाट निवडायला हवी, हे तिला नेमकं उमगतं.

हॅरी आणि रॉनपेक्षा बऱ्याच बाबतींत अगदी वेगळी हर्मायनी खरं तर हॅरी आणि रॉनमधलाही दुवा आहे. 

हर्मायनी नसती तर हॅरीनं काय केलं असतं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. मला वाटतं तेच जे.के. रोलिंगचं सर्वात मोठं यश आहे.

रोलिंगच्या या हर्मायनीला एमा वॉटसननं पडद्यावर जीवंत केलं आहे. पण एमाच्या पडद्याबाहेरच्या सेवाभावी कार्यानं आणि स्त्री-मुक्तीविषयी विचारांनी हर्मायनीला खऱ्या अर्थानं वास्तवात आणलं आहे.

एऱवी परिकथांच्या स्वप्नांत रमणाऱ्या लहान मुलींना हर्मायनीच्या रूपानं मिळालेली नायिका हे पुढच्या पिढ्यांसाठी रोलिंगचं गिफ्टच म्हणायला हवं.

( रोलिंगविषयी आणि तिच्या दुसऱ्या तितक्याच कणखर नायिकेविषयी आता पुढच्या भागात..)

– जान्हवी मुळे

हॅरी, हर्मायनी आणि रॉन

हॅरी, हर्मायनी आणि रॉन

Advertisements