“I am no bird; and no net ensnares me: I am a free human being with an independent will.”

“मी माणूस आहे, स्वतंत्र आहे, माझ्या स्वतःच्या इच्छा आहेत.”

जेन एअर

जेन एअर

आजच्या जमान्यातही अनेक स्त्रिया हे शब्द उघडपणे बोलू शकत नाहीत. पण शार्लोट ब्राँटेनं एकोणिसाव्या शतकात लिहिलेल्या जेन एअर कादंबरीची नायिका, हे निक्षून सांगते. लुईसा मे अल्कॉट, व्हर्जिनिया वूल्फसारख्या नावाजलेल्या लेखिका असोत वा अगदी अलिकडच्या काळातल्या महिला. जेन एअर सर्वांना आपलीशी वाटते.

शार्लोटनं क्युरर बेल या टोपणनावानं जेन एअर (Jane Eyre) १८४७ साली प्रकाशित केली आणि इंग्रजी साहित्यात क्रांती घडली. तोवरच्या प्रस्थापित नायिकांपेक्षा जेन एअर ही नायिका बरीच वेगळी होती. आणि विशेष म्हणजे जवळपास १७० वर्षांनंतरही तिची कहाणी अगदी ताजी वाटते.

जेन एअरचं आयुष्य साधं – सोपं अजिबात नाही. तिच्या आवडी-निवडी ‘टिपिकल’ मुलींसारख्या नाहीत. लहानपणीच अनाथ झालेली जेन तिच्या मामाच्या घरी राहते, मामीच्या जाचाविरोधात बंड पुकारते. अनाथ मुलींच्या शाळेत रवानगी झाल्यावरही तिचे हाल संपत नाहीत आणि तिच्यातली बंडखोर वृत्ती कमी होत नाही. ती मैत्रीला किंमत देते. आधी बदल्याच्या भावनेनं पछाडलेली जेन अनुभवानं परिपक्व बनते. जेन दिसायला सुंदर वगैरे नाही. ती गव्हर्नेस म्हणून एका घरात – थॉर्नफिल्डमध्ये – नोकरी करू लागते आणि तिथल्या मालकाच्या, एडवर्ड रोचेस्टरच्या प्रेमात पडते. पण रोचेस्टरच्या आयुष्यातली एक काळी बाजू समोर आल्यावर जेनचं आय़ुष्य पुन्हा वेगळं वळण घेतं.

जेन एअरची कहाणी रहस्यमय आहे, तितकंच गहिरं आहे तिचं व्यक्तीमत्व. जेनला आणि तिची व्यक्तीरेखा चितारणाऱ्या शार्लोट ब्राँटेला स्त्री-पुरुष समानता हवी होती. या दोघींनाही लौकिकार्थानं कदाचित ‘फेमिनिस्ट’ म्हणता येणार नाही. पण व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये हे कथानक लिहिलं गेलं, हे विसरता येणार नाही.

त्या काळात स्त्रियांचं जणू एकच ध्येय असायचं – चांगलं स्थळ मिळवणं. महिलांना दिलं जाणारं शिक्षणही केवळ संसारोपयोगी गोष्टींबाबतच असायचं. पण जेनचं मन त्यातच रमत नाही. ती स्वतःला चित्रांमधून व्यक्त करते, दागदागिने आणि उंची कपड्यांचा तिला सोस नाही, जेनलाही लग्न करावंसं वाटतंच, पण आपल्या प्रियकरासाठी ती स्वाभिमान बाजूला ठेवत नाही. आणि केवळ रीत आहे म्हणून समोर आलेला दुसरा लग्नाचा प्रस्तावही स्वीकारत नाही. 

शार्लोट ब्राँटे

शार्लोट ब्राँटे

शार्लोटच्या व्यक्तिगत आयुष्यातले अनुभवही जेन एअरला अधिक वास्तववादी बनवतात.

शार्लोट, एमिली आणि त्यांच्या दोन मोठ्या बहिणींना त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी – पॅट्रिक ब्राँटे यांनी – लँकेशायरमधल्या शाळेत ठेवलं होतं. पण टीबीमुळं मारिया आणि एलिझाबेथचा मृत्यू झाला. पॅट्रिकनी आपल्या दोन मुलींना घऱी परत आणलं. शार्लोट मग वडील, धाकट्या बहिणी म्हणजे एमिली आणि अन आणि भाऊ ब्रानवालसह यॉर्कशायरच्या हॉवर्थमध्ये राहू लागली. याच तीन बहिणींनीही पुढं कादंबऱ्या- कविता लिहिल्या. ब्रानवालला लहान असून मिळणारी वागणूक, त्याच्या शिक्षणावर दिला जाणारा भर शार्लोटला पसंत नव्हता. तिलाही शिकायचं होतं, पुढं जाऊन स्वतःची शाळाही काढायची होती. 

कथेची नायिका नेहमी सुंदरच दिसणारीच असते यावर शार्लोटचा विश्वास नव्हता. एमिली आणि अॅनसोबत एकदा त्यावरून तिचा वादही झाला. त्यानंतर शार्लोटनं जेन एअर लिहायला घेतली होती. स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं हे जेन एअरनं दाखवून दिलंय.  

– जान्हवी मुळे

Advertisements