‘लिटल विमेन’ मराठी वाचकांसाठी अगदीच अपरिचित नाही. लुईसा मे अलकॉटच्या या कादंबरीचा शांताबाई शेळकेंनी केलेला अनुवाद ‘चौघीजणी’ अनेकांना वाचला असेल.

लिटल विमेन

लिटल विमेन

असं भाषा-स्थल-काल यांच्यापलिकडे जाण्याचं भाग्य एखाद्याच पुस्तकाला लाभतं. लिटल विमेननं ती करामत साधली आहे. मार्च कुटुंबातल्या मार्गारेट (मेग), ज्योसेफाईन (ज्यो), एलिझाबेथ (बेथ) आणि एमी कर्टिस (एमी) या चौघीजणी लहानपणीच माझ्या मैत्रिणी बनून गेल्या. ज्योसोबत तर गट्टीच जमली. आणि हो, त्यांचा मित्र लॉरी माझाही बेस्ट फ्रेण्ड बनला.  

लुईसा मे अल्कॉटनं आपल्या लहानपणीच्या अनुभवांवर आधारीत लिहिलेली ही कादंबरी अमेरिकन क्लासिक लिटरेचरमध्ये मानाचं पान ठरली आहे. 1869-70मध्ये लिटल विमेन प्रकाशित झाली. पुढं गुड वाईव्ज हा दुसरा भाग प्रकाशित झाल्यावर दोन्ही पुस्तकं एकसंध कादंबरी म्हणून पुन्हा प्रकाशित झाली. जगभरातील भाषांतरं, अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, कार्टून सीरीजमध्ये झालेली रुपांतरं यांच्यामाध्यमातून लिटल विमेन घराघरात पोहोचल्या. आजही लहान मुलींनी आणि विशेषतः मुलांनी आवर्जून वाचावं अशा पुस्तकांत या कादंबरीची गणना होते.

मार्च भगिनींशी माझी पहिली ओळख अशाच एका चित्रपटामुळं झाली. विनोना रायडर, कर्स्टन डंस्ट, क्लेर डेन्सनं त्या चित्रपटात काम केलं होतं. मला वाटतं १९९६-९६चं वर्ष असावं. टीव्हीवर चित्रपट पाहिल्यावर ते पुस्तक शोधून वाचून काढलं. नंतर शांताबाईंनी केलेला अनुवादही वाचला. लिटल मेन, ज्यो’ज बॉईज हे लुईसानं लिहिलेले पुढचे भागही वाचले. प्रत्येक वेळी प्रत्येक स्त्री पात्रात मी मला शोधते आहे, असं वाटून गेलं.

प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची तयारी असलेली, स्त्रियांविषयी प्रस्थापित अपेक्षा झुगारून लावणारी, लेखिका बनण्याचं स्वप्न पाहणारी, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पूर्ण करण्यासाठी झगडणारी विचारी मुलगी.. मला ज्यो सारखं बनायचं होतं, अजूनही मी तिच्यासारखं बनण्याचाच प्रयत्न करते आहे.

लुईसा मे अल्कॉट

लुईसा मे अल्कॉट

ज्योमध्ये लुईसानं काही प्रमाणात स्वतःचा प्रवास रेखाटला आहे. स्वतः लुईसानं अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता, पण आपल्या कादंबरीच्या दुसऱ्या भागात तिला ज्योचं लग्न झालेलं दाखवावं लागलं. कारण पुरुषाशिवाय राहणारी स्त्री नायिका म्हणून वाचकांना पटत नव्हती. अनेकांना ज्यो आणि लॉरी अशी जोडी जमेल याची खात्री होती. स्वतः लुईसाचं मात्र ज्यो आणि लॉरीमधल्या मैत्रीविषयी वेगळं मत होतं. ज्योचा जोडीदार एक प्रस्थापित नायक असू शकत नाही, या विचारातूनच तिनं मग फ्रेडरिकचं पात्र लिहिलं. लिटल विमेनमधल्या मुलींपेक्षाही त्यातल्या मुलांची- पुरुषांची पात्र अधिक जवळून अभ्यासली गेली.

लिटल विमेनकडे एक स्त्री-वादी, फेमिनिस्ट कादंबरी म्हणून पाहिलं जातं. पण लिटल विमेनमधला फेमिनिझम हा फक्त आक्रमक फेमिनिझम नाही. कुटुंबवत्सल आई आणि बहीणी, करारी आंट मार्च, कोमल मनाची बेथ, अल्लड एमी, नोकरी करणारी स्त्री, स्वाभिमानी महिला अशा वेगवेगळ्या रुपातली स्त्री या पुस्तकात दिसते. म्हणूनच ते चित्रण जास्त वास्तववादी वाटतं. अमेरिकेतील यादवी युद्धाच्या काळात घडणारं कथानक, त्या काळात अमेरिकेत घडत असलेल्या वैचारिक परिवर्तनाचीही झलक दाखवतं.

म्हणूनच काळाच्या पुढे असणारी कादंबरी असूनही लिटल विमेनला विरोध झाला नाही. नव्या पिढीची विचारसरणी घडवण्यात या पुस्तकाचा छोटासा का असेना पण महत्त्वाचा वाटा आहे.

(PS – लुईसा मे अल्कॉटच्या आयुष्यावर शार्लोट ब्राँटेचा प्रभाव होता. शार्लोटविषयी पुढच्या भागात )

 

Advertisements