अवघं ३० वर्षांचं आयुष्य. वुदरिंग हाईट्स ही एकच कादंबरी, काही कविता आणि गूढ व्यक्तीमत्व. एमिली ब्राँटेनं मला कधी वेड लावलं, ते आता आठवतही नाही.

 

Wuthering Heights by Emily Brontë

Wuthering Heights by Emily Brontë

लहानपणी, शाळेत असताना पहिल्यांदा वुदरिंग हाईट्स वाचलं होतं. तेव्हा इंग्रजी वाचन फारसं करत नसे. पण अगदी पहिल्या पानापासून अधाशासारखं वाचलं होतं, एवढी नक्की आठवतंय. पुस्तक वाचून संपवलं आणि त्यातलं यॉर्कशायरच्या ओसाड माळरानांचं वर्णन आणि पात्रांनी माझ्यावर टाकलेली मोहिनी अजून उतरलेली नाही. इंग्लंड दौऱ्यावर असताना वेळात वेळ काढून काही तास यॉर्कशायरमध्ये घालवले होते.

 
‘वुदरिंग हाईट्स’ इंग्रजी साहित्यातली सर्वात उत्कट आणि विलक्षण प्रेमकहाणी मानली जाते. आकंठ प्रेमात बुडालेला आणि बदल्याच्या भावनेनं पछाडलेला नायक हिथक्लिफ, काहीशी हट्टी आणि वास्तवाचं भान असलेली पण प्रेमात स्वतःला विसरून गेलेली नायिका कॅथरीन अर्नशॉ.
प्रेमात आयुष्य उधळून देणाऱ्यांच्या कथा कमी नाहीत. पण कॅथरिनची व्यथा वेगळी आहे. हिथक्लिफमय होऊनही त्याला तोडण्याची हिंमत ती करते. प्रेमाबरोबरच मत्सर, द्वेष, विद्रोह अशा मानवी भावनांना हात घालणारी ही कहाणी आहे. कुणी या कथेला शोकांतिका मानतं, तर कुणाला कथेच्या शेवटी उज्ज्वल भविष्य दिसतं. 
सन १८४५-४६च्या दरम्यान, म्हणजे जेमतेम वयाच्या 28व्या वर्षी एमिलीनं ही कादंबरी लिहिली होती. तीही एलिस बेल या पुरुषी टोपणनावानं. काळाच्या कित्येक दशकं पुढे असलेलं एमिलीचं लिखाण तेव्हा गाजलं, पण सुरूवातीला अनेकांना रुचलं नाही. एमिलीच्या मृत्यूनंतर तिच्या साहित्याचा खरा दर्जा लोकांना पटला. पुढच्या दीड शतकात या कादंबरीवर भरभरून लिहिलं गेलं. त्यावर आधारीत कित्येक नाटकं, सिनेमे, डॉक्युमेंट्रीज निघाल्या. पण ही कादंबरी लिहिणाऱ्या एमिलीविषयी फारच तोकडी माहिती उपलब्ध आहे.
एमिली ब्राँटे (भाऊ ब्रानवॉल ब्राँटेनं काढलेलं चित्र)

एमिली ब्राँटे (भाऊ ब्रानवॉल ब्राँटेनं काढलेलं चित्र)

30 जुलै 1818 रोजी एमिलीचा जन्म झाला होता. त्यानंतर २-३ वर्षांतच एमिलीची आई निर्वर्तली. दोन बहीणी, भाऊ, वडिल आणि एक मावशी असा एमिलीचा परिवार. चर्चमध्ये काम करणारे तिचे वडील यॉर्कशायरच्या हॉवर्थमध्ये स्थायिक झाले. तिथं विरंगुळा म्हणून लहानपणी ब्राँटे भावंडं गोष्टी रचायचे.

 
आपल्या काल्पनिक विश्वातील देशांची त्यांनी अँग्रिया आणि गोंडाल अशी नावंही ठेवली होती. मोठेपणीही त्यांनी लिहिणं थांबवलं नाही. एमिलीच्या बहिणी – शार्लोट आणि अॅन ब्राँटे या दोघींच्या कादंबऱ्याही त्या काळात गाजल्या होत्या.
खरं तर एमिली आणि शार्लोटला स्वतःची शाळा सुरू करायची होती. त्यासाठी ट्रेनिंग घ्यायला त्या ब्रसल्समध्ये गेल्या. पण दोघींना शाळेचं स्वप्न अर्ध्यावर सोडावं लागलं. एमिली पुन्हा लिखाणाकडे वळली. वुदरिंग हाईट्स प्रसिद्ध झाल्यावर वर्षभरातच एमिलीचं निधन झालं. तिच्या निधनानंतर एमिलीच्या काही कविता शार्लोटनं प्रकाशित केल्या.
 
 
जवळपास १७० वर्ष झाली. पण एमिलीच्या भाषेची जादू कमी झालेली नाही. एमिली आपल्या छोट्या आय़ुष्यात एकच कादंबरी लिहू शकली म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाची गूढ किनार आणखी गडद झाली आहे.
Moors near Haworth, Yorkshire served as an inspiration and backdrop for Wuthering Heights

Moors near Haworth, Yorkshire served as an inspiration and backdrop for Wuthering Heights

 
Advertisements