कधी कधी आपण चूक ठरलो, याचा केवढा आनंद होतो! काल हे दोनदा झालं माझ्या बाबतीत. आधी एयर फ्रान्स विमानात बॉम्बची बातमी आणि मग बाजीराव मस्तानी. कालच हा चित्रपट पाहिला, काहीशी धाकधूक मनात ठेवूनच. I won’t say I loved the movie, but I did like it and that came as a surprise.

तसं आता बाजीराव मस्तानी चित्रपटाबद्दल खूप जणांनी खूप काही लिहून झालं आहे. तरीही मला जाणवलेले काही मुद्दे शेअर करावेसे वाटतात.

डिसक्लेमर – मी चिकित्सक स्वभावाची इतिहासप्रेमी आहे. ऐतिहासिक चित्रपट Accurate म्हणजे अचूक असावेत असा माझा अट्टाहास नाही. पण ते जास्तीत जास्त खरे म्हणजे Authentic वाटायला हवे, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. तसंच माझ्या पिढीच्या मराठी रसिकांवर राऊ, स्वामी अशा कादंबरी आणि मालिकांचा प्रभाव आहे. त्यामुळंच आम्ही अतिचिकित्सक बनलो आहोत. तेव्हा आमची समीक्षा खूप जास्त तांत्रिक झाली, तर तो योगायोग समजावा. 🙂

मसाले पदार्थाची चव वाढवतात. पण तोच अख्खा मसाला जेवताना दाताखाली आला, तर सगळी मजा जायची भीती असते. पण म्हणून हा पदार्थच वाईट ठरत नाही. बाजीराव मस्तानीमध्येही असेच काही खडे आहेत. तरीही आजच्या पिढीला बाजीरावांसारख्या योद्ध्याची ओळख करून दिली आहे या फिल्मनं हे लक्षात ठेवलं पाहीजे.

  • अभिनयाच्या बाबतीत काही सीन्स सोडले तर रणवीरला खरोखर सलाम.. तो इतरांपेक्षा वेगळा आणि थोड्या वरच्या दर्जाचा अभिनेता आहे, हे रणवीरनं पुन्हा सिद्ध केलंय. त्याची संवादफेक आणखी चांगली होऊ शकली असती, पण रणवीर शब्दांची भाषा विसरायला लावतो, यात शंका नाही.
  • दीपिका, प्रियांका तोडीस तोड आहेत. दीपिका नृत्यांगनेपेक्षा योद्धा आणि आईच्या रुपातील मस्तानीला जास्त न्याय देते. प्रियांकानं तुलनेनं दुय्यम भूमिकेला बरोबरीचं ठरवलं आहे. शिडशिडीत अंगकाठी सोडली, तर प्रियांका मराठीच वाटते बऱ्याच ठिकाणी. काय करणार, आमच्या डोक्यात पेशवीण म्हणून मृणाल कुलकर्णी घट्ट बसली आहे..
  • आणखी एक गोष्ट जाणवते. दीपिकाच्या मस्तानीसमोर काशीबाईंची भूमिका साकारेल, अशी कुणीच मराठी अभिनेत्री नव्हती का? खेदाची गोष्ट, म्हणजे असं एकही नाव सध्या तरी मला आठवत नाही. आणि इतर भाषिक अभिनेत्रींमध्ये प्रियांका सोडून इतर कुणाला ही भूमिका पेलवली असती, असं वाटत नाही.
  • सपोर्टिंग कास्टचा अभिनयही अफलातून आहे. तन्वी आझमीला तर दाद द्यायलाच हवी. दुसऱ्या पत्नीलाही सन्मान मिळावा म्हणून धडपडणाऱ्या मुलाविषयी वाटणारा अभिमान, समाज काय म्हणेल याचा विचार, आणि ही ब्यादच नको असा विचार करण्याचा बेरक्या स्वभाव.. So typical! मस्तच वठवलाय.
  • ‘अखंड भारत’ नावाचं प्रकरण तेव्हा अस्तित्वात होतं का? म्हणजे अशा नकाशांवर अखंड भारत वगैरे लिहिलेलं असायचं का?
  • कॉस्च्युम्स – नऊवारी साडी ही नेसलेलीच चांगली दिसते. शिवलेली नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. जर किलो किलो वजनाचा घागरा घालून नाचू शकतात, किंवा २० किलोचं चिलखत घालून लढण्याचे सीन्स करू शकतात, तर सुटसुटीत नेसलेली नऊवारी का सांभाळता येणार नाही?
  • कॉस्च्युमविषयी (उगाच) पडलेला आणखी एक प्रश्न – त्या काळात वेल्वेट आणि क्रेपचं कापड होतं का? जर एवढी मोठी फिल्म बनवली जाते आहे, तर अशा छोट्या गोष्टींविषयी तडजोड कशासाठी?
  • पिंगा हे गाणं चांगलं झालं असलं, तरी ऑथेन्टिक वाटत नाही. अज्जिबातच नाही. कारण कोरियोग्राफी- पिंगा म्हणताना पिंगा घालताना दिसत नाही कुणी. आणि लावणी-कम-मंगळागौरी म्युझिक. हा मोह टाळता आला असता.
  • मल्हारी गाणं चित्रपटांत असण्याबद्दल आक्षेप नाही. पण त्यातही कोरियोग्राफी खरंच खटकते.
  • चित्रपटातील काही कॅऱेक्टर्स विसाव्या शतकातले मराठी शब्द वापरतात, याऐवजी ते हिंदीतच बोलले असते तर बरं असंही वाटून गेलं.

बाकी चित्रपट संपल्यावर बाहेर पडलो, तेव्हा एकही प्रेक्षक काही बोलत नव्हता. थोड्या वेळानं आमच्या समोरून चालणारं एक (अमराठी) जोडपं इतिहासावर चर्चा करू लागलं. स्कूल मे नही क्या पढा था? वोही बाजीराव. इतना बडा था पता नही था. फिर से पढना होगा, कोई बुक है क्या?

चित्रपट बाजी मारतो, ती इथे. जातीपाती आणि धर्माच्या भिंती ओलांडणाऱ्या बाजीराव पेशव्यांची महती आता तरी महाराष्ट्राबाहेर पोहोचेल. कदाचित पानिपत आणि माधवराव पेशव्यांची कहाणीही दिसेल कधीतरी मोठ्या पडद्यावर.

 

 

Advertisements