A Reply to Vaibhav Chhaya’s post on FB

गेल्या आठवड्यातील घटनेत महिला पत्रकारांना सापत्न वागणूक मिळण्यामागचं कारण ‘त्या महिला आहेत’, एवढंच होतं.

एरवी घडणाऱ्या घटना बीटनुसार बदलत जातात. पुरुष सहकारी काहीच करत नाहीत, ही गोष्टही मला पटत नाही. अनेकदा पुरुष सहकारी patronizing role मध्ये जातात हे खरं आहे. पण अनेकदा पुरुष सहकारी, खास करून बॉसेस तुमच्यावर विश्वास दाखवतात, त्यामुळेच पुढे जाणं शक्य होतं. बरखा दत्तला प्रणय रॉयनी कारगिल युद्धात जाण्याची परवानगी दिली, म्हणून ती द बरखा दत्त झाली. तिला संधी मिळाली नसती तरीही तिनं आपली ओळख बनवली असतीच. पण मुद्दा हा आहे, की प्रणय रॉयसारख्या बॉसेसची कमी आहे.

इतर क्षेत्रातल्या महिलांपेक्षा पत्रकारितेतल्या महिलांची स्थिती वेगळी आहे. काही बाबतीत चांगली आणि काही बाबतींत वाईट. हे मात्र खरं की, महिला पत्रकारांनी एकत्र यायला हवं. पण तसे प्रयत्न जेव्हा केले जातात, तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद नगण्य असतो. टीव्हीजेएच्या महिला ट्रिपदरम्यान ही गोष्ट जाणवली होती. इन मिन सात जणी जमलो फक्त.

मी स्वतः क्रीडाविभागात वार्तांकन करते, आणि अनेकदा आंतरराष्ट्रीय विषयांवरही लिहिलं आहे. खेळांच्या बातम्या देतानाही त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी समोर आणली आहे. माझ्या सहकाऱ्यांनी आणि बॉसेसनी कधीच मला कमी लेखलेलं नाही. पण तरिही, एक महिला क्रीडा पत्रकार म्हणून काम करताना अनेक पूर्वग्रहांचा सामना करावा लागलाच. सुरूवातीच्या काळात माझ्या क्रिकेट आणि फुटबॉल ज्ञानाबद्दल शंका घेतली गेली आहे किंवा आश्चर्य व्यक्त केलं गेलं आहे. पण ते मूळात बायकांना खेळांमध्ये काही कळत नाही, हा जनरल समाजाचा समज असल्यामुळेच. आज ते चित्र बदललंय कारण- सानिया मिर्झा, सायना नेहवाल, इशा गुहा या खेळाडू आणि शारदा उग्रासारख्या पत्रकार..

बॉलिवूड आणि फिचरसाठीही हुशारी लागतेच. त्यातही फिचर म्हणजे केवळ सॉफ्ट न्यूज नाही. फिचरमध्ये मुलाखती, इन्व्हेस्टिगेटिव्ह आर्टिकल्स, प्रोफाईल, डॉक्युमेंटरी हे आणि इतर अनेक घटक येतात. दुसरं म्हणजे हुशारी ही केवळ राजकीय आणि इन्व्हेस्टिगेटीव पत्रकारितेइतकीच मर्यादित नाही. समाजातल्या अनेक घटनांवर मराठी महिलांनी सखोल वार्तांकन केलं आहे, करत आहेत. मराठीतही आणि इंग्लिश, हिंदीमध्येही. एकच उदाहरण पुरेसं आहे सध्या – योगिता लिमये, बीबीसी. Yogita Limaye बाकीची उदाहरणं तुम्ही शोधा.

मराठी माध्यमं मेल डॉमिनेटेड आहेत, कारण हा समाजच मेल डॉमिनेटेड आहे. माध्यमं सुद्धा समाजाचा आरसा आहेतच नाही. मीडियात जातीचा मुद्दा नेहमी उठतो, पण मला तरी आजवर कधीच तसं काही जाणवलं नाही. असे आरोप करणारी मंडळी मात्र स्वतः जातीवादी असल्याचं वारंवार जाणवलं.

आघाडीच्या चॅनेल्समध्येच काय आघाडीच्या वृत्तपत्रांतही एकही महिला संपादक
नाही. ज्यांच्या मालकीचं वृत्तपत्र आहे, त्यांचा अपवाद वगळता. यामागे कारणं अनेक आहेत.
१. पुरुषांना महिला बॉस आवडत नाही.
२. अनेक महिला हार्ड न्यूजपेक्षा सॉफ्ट न्यूजकडे वळतात आणि दुर्दैवानं हार्ड न्यूज करणाराच जास्त हुशार असा गैरसमज आहे.
३. पत्रकारिता हे ‘यू कॅन नॉट हॅव इट ऑल’ असं विश्व आहे. करियरवर लक्ष द्यायचं, तर घराकडे दुर्लक्ष होतं.
दिवसाचे कितीही तास, कुठल्याही वेळी बातमीच्या मागे धावत जाणं लग्नानंतर शक्य होत नाही बहुतेकींना. कारण बाईचं नोकरी करणं, अँकरिंग करणं ग्लॅमरस मानलं जातं. पण प्रत्येक वेळी जुळवून घेणं जमत नाही घरच्यांना. मुलं झाल्यावर शारिरीकदृष्ट्याही सगळं थकवणारं होऊन जातं. त्यामुळेच कुवतीपेक्षा कमी पण वेळेचं गणित सांभाळता येईल अशा पदांवर त्यांना समाधान मानावं लागतं. पुरुषांचं तसं नाही. त्यांचं घर सांभाळायला, डबे करून द्यायला बायका असतात.
कदाचित म्हणूनच फार कमी महिला संपादकपदावर किंवा इतर मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत आणि ज्या पोहोचल्या आहेत, त्यातही बहुतेक जणी अविवाहित किंवा सिंगल आहेत.

(टीप – महिला पत्रकार या महिला पत्रकार असतात. त्यांची वेगळी जात नसते. आणि हे लिहिणाऱ्या माझ्या जातीवर कोणी जाणार असेल, तर I can’t help it.)

Advertisements