Sean Abbott

फिल ह्यूग्स गेला आणि जाताना चटका लावून गेला… पण शॉन अबॉटचं काय? त्याला तर आता मेल्याहून मेल्यासारखं वाटत असेल.. अबॉटनं टाकलेला बाऊन्सर नक्कीच ह्यूग्सला मारण्यासाठी नव्हता, तर त्याची विकेट काढण्यासाठी होता.

भारताचे माजी कर्णधार नरी काँट्रॅक्टर म्हणतात, “जे घडलं, त्याच अबाॅटची काय चूक आहे? त्यानं ही घटना विसरून जायला हवं. खरं तर तो हे कधीच विसरू शकणार नाही. पण त्यानं आपल्या गोलंदाजीवर काहीही परिणाम होऊ देऊ नये, क्रिकेट खेळणं थांबवू नये.”

ह्यूग्सच्या कुटुंबियांना किंवा शॉन अबॉटला काय वाटत असेल ते काँट्रॅक्टर यांच्याशिवाय कोणाला ठावूक असेल? 1961–62च्या मोसमात वेस्ट इंडीज दौऱ्यावर बार्बाडोसविरुद्ध सराव सामन्यात चार्ली ग्रिफिथचा चेंडू काँट्रॅक्टर यांच्या डोक्यावर, मागील बाजूस आदळला होता. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये जवळपास सहा दिवस बेशुद्धावस्थेत होते. त्या गंभीर दुखापतीतून काँट्रॅक्टर सावरले, त्यांना पुन्हा कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण पुढची दहा वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले. “रस्त्यावर चालताना अपघात होतो, म्हणून कोणी चालणं थांबवतं का? आयुष्यात अशी जोखीम सगळीकडेच असते. गाडी चालवणं हीसुद्धा मोठी जोखीम आहे, म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग करणंच थांबवाल का? अपघात थांबवणं कुणाच्याच हातात नाही.” असं काँट्रॅक्टर म्हणतात.

या घटनेनंतर काँट्रॅक्टर आणि ग्रिफिथ यांच्यातलं नातं कसं होतं, यावर काँट्रॅक्टर म्हणतात, “ग्रिफिथ रोज मला भेटायला हाॅस्पिटलमध्ये यायचा, असं मला सांगण्यात आलं. पण मी बेशुद्ध होतो,त्यामुळे मला तेव्हा त्याला भेटल्याचं आठवत नाही. मला नक्की आठवत नाही, पण १९६४ किंवा ६७ साली जेव्हा ग्रिफिथ भारतात आला होता, तेव्हा मी त्याला आणि हॉलला सीसीआयमध्ये भेटलो होतो. त्यानं मला मारण्याच्या किंवा जखमी करण्याच्या इराद्यानं चेंडू टाकला नव्हता.”

काँट्रॅक्टर यांनी तेव्हा झालं गेलं विसरून जायचं ठरवलं. स्वतः ग्रिफिथ यांनी त्या घटनेविषयी बोलताना गोलंदाजाची मनस्थिती कशी असते, यावर भाष्य केलं आहे. “मी जाणूनबुजून कुणालाही दुखापत केलेली नाही. इतका मोठा आघात होण्याची ती बहुदा पहिलीच घटना होती. कोणताही गोलंदाज एखाद्या फलंदाजाला जायबंदी करण्याच्या इराद्यानं बाऊन्सर टाकत नाही. फलंदाजाला चकवण्यासाठी, उसळत्या चेंडूवर खेळण्यास परावृत्त करण्यासाठी बाऊन्सर टाकला जातो, ज्यानं फलंदाज बाद होऊ शकतो.”

अर्थात ग्रिफिथ यांना काँट्रॅक्टर यांच्या त्या दुर्दैवी अपघातानंतर सावरण्यासाठी थोडा वेळ जावा लागला. ” मी त्या घटनेनं काहीसा हादरून गेलो होतो. क्रिकेट खेळणंच सोडून देण्याचा निर्णयही घेतला होता. पण जर ती घटना घडली नसती, तर तुम्हाला चार्ली ग्रिफिथ हे नावही लक्षात राहिलं नसतं. तो प्रसंग माझ्या आयुष्याचा, क्रिकेटमधील वाटचालीचा भाग बनला आहे, हे मी स्वतःला पटवलं. त्या प्रसंगातून सावरण्यासाठी ईश्वरानंच मला ताकद आणि धैर्य दिलं. माझे संघ सहकारी, कर्णधार आणि मित्रांनी त्यातून बाहेर पडण्यास मदत केली. म्हणूनच मी पुन्हा कसोटी क्रिकेट खेळू शकलो.” असं ग्रिफिथ यांनी नमूद केलं आहे.

शॉन अबॉटनं ग्रिफिथ यांचे हे शब्द लक्षात ठेवायला हवेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही अबॉटच्या पाठीशी उभं राहायला हवं असं मत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वकार युनूसनं मांडलंय.

या घटनेनंतर अबॉटनं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो पुन्हा खेळू शकेल? मला माहित नाही. शॉनला समुपदेशनाची गरज आहे, जे सुरू झालं असेल. त्याला काही काळ शांत राहू द्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि ह्यूग्सचा मित्र मायकल क्लार्क तसंच ह्यूग्सची बहीण मेगन यांनी अबॉटसोबत काही काळ घालवण्याचं ठरवलं आहे. अबॉटच्या दुःखावर त्यामुळे थोडीशी फुंकर घातली जाईल. पण पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची ताकद त्याला स्वतःला जुळवावी लागेल.

– जान्हवी मुळे

Advertisements