अँगेला मर्कल, जर्मनीच्या चॅन्सेलर, युरोपियन युनियन रुपी शाळेची हेडमास्तरीण… अगदी ब्रिटन, फ्रान्सलाही अँजेला बाईंचा दरारा वाटतो.

angela-merkel-2011-7-19-10-0-51अँगेला मर्कल आजच्या घडीला युरोपच नाही तर जगातल्या सर्वात ताकदवान महिला आहेत. युरोपियन युनियनच्या आर्थिक नाड्या अँगेला बाईंच्याच हातात आहेत. जगाच्या राजकारणात सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर दुसऱी सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण असेल तर अँगेला मर्कल.

या मर्कलबाई म्हणजे नेमकं काय रसायन आहे, याची जाणीव जगाला २००९ साली युरोझोनमधल्या आर्थिक संकटाच्या काळात झाली. ग्रीसनं आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचं जाहीर केलं. ग्रीस दिवाळखोरीत निघालं असतं तर त्याचा फटका युरोपातल्या युरो चलन वापरणाऱ्या इतर देशांना आणि मग पर्यायानं जगालाही बसला असता. कर्जांमुळे युरोपातल्या इतर अनेक देशांचीही आर्थिक स्थिती हालाखीची बनली होती. त्यावेळी युरोपची नजर मदतीसाठी जर्मनीकडे वळली.

अँगेला मर्कल यांनी निर्णय घेण्यास वेळ लावला. पण ग्रीसला युरोपियन युनियनमार्फत आर्थिक मदत देऊ केली. अर्थात त्यासाठी ग्रीसवर काही निर्बंधही घातले. कुणाला अँजेलाबाईंचा निर्णय म्हणजे कडक शिक्षा वाटली. पण त्यांनी उचललेल्या पावलामुळे युरोपची अर्थव्यवस्था सावरते आहे.

युरोझोनमध्ये ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इटलीसारख्या राष्ट्रांतील दिग्गज नेत्यांना आर्थिक संकटामुळे आपली खुर्ची गमवावी लागली. पण त्याच काळात अँगेला मर्कल यांची सत्ता भक्कम झाली. गेल्या वर्षी मर्कलबाई तिसऱ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी भरघोस मतांसह निवडून आल्या.

60 वर्षीय अँजेला म्हणजे जगाच्या राजकारणातलं एक रहस्यमय व्यक्तिमत्व. 2005 साली त्या पहिल्यांदा चॅन्सेलरपदी निवडून आल्या तेव्हा त्यांच्या स्टायलिश ब्लेझर्सची आणि हसतमुख चेहऱ्याची चर्चा जास्त व्हायची. पण लवकरच त्यांचं पोलादी व्यक्तिमत्व जगासमोर आलं.

एका धार्मिक पित्याची मुलगी, एक वैज्ञानिक, कार्यकर्ती आणि राजकारणी… अँजेला यांच्या व्यक्तीमत्वाचे हे वेगवेगळे पैलू आहेत. पूर्वश्रमीच्या अँजेला कासनेर यांचा जन्म हॅम्बर्गमध्ये झाला, तेव्हा जर्मनी एकसंध राष्ट्र नव्हतं. पश्चिम जर्मनीत चर्चमध्ये पाद्री म्हणून काम करणारे त्यांचे वडील नंतर पूर्व जर्मनीत स्थायिक झाले. घरात समाजवादी विचारांचा पगडा होता आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांचा वावर असायचा. शीतयुद्धाच्या काळात वाढलेल्या अँजेला यांनी सुरूवातीला विज्ञानाची कास धरली. रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करणाऱ्या अँजेला यांचं आयुष्य 1989मध्ये पूर्ण बदलून गेलं.

बर्लिन भिंत कोसळली आणि दोन्ही जर्मनींची एकीकरणाकडे वाटचाल सुरू झाली. त्या मंतरलेल्या दिवसांत अँगेला राजकारणाकडे वळल्या. मग दशकभरात जर्मन संसद, चॅन्सेलर हेलमट कोल यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद अशी झेप घेतली. पण त्याच हेलमट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना मर्कल यांनी कुठलीच हयगय केली नाही. पुढे 2000 साली ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनचं अध्यक्षपद आणि 2005 साली जर्मनीचं चॅन्सेलरपद असा अँजेला बाईंचा प्रवास. या दोन्ही पदांवर आरूढ होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

वयाची साठी गाठल्यावरही अँगेलाबाईंचा उत्साह तरुणांना लाजवेल असाय. मर्कल स्कीईंग आणि फुटबॉलच्या चाहत्या आहेत. ब्राझिलमधल्या फिफा विश्वचषकात तर त्या जर्मन टीमच्या सर्वात मोठ्या चीअरलीडर बनल्या होत्या.. विश्वचषक जिंकल्यावर खेळाडूंना त्यांनी आईच्या मायेनं आलिंगन दिलं. आजच्या जमान्यात राजकारणात येण्यासाठी उत्सुक महिलांसाठी अँगेला मर्कल खऱ्या अर्थान रोल मॉडेल बनल्या आहेत.

– जान्हवी मुळे

Advertisements