कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध किंवा सत्तेसमोर उभं राहणं सोपं नसतं. पण इराणच्या शिरीन एबादी यांनी ती हिंमत दाखवली म्हणूनच इराणमध्ये अनेकांच्या आयुष्यात, खास करून स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडून आला..

56-212027-3634016280-cf3c010b99-bतेहरानमधल्या घरात लहान भावंडांसह बागडणारी छोटी मुलगी ते नोबेल पारितोषिक जिंकणारी मुस्लीम देशांतील पहिली महिला असा शिरीन एबादी यांचा प्रवास.

एबादी यांचा जन्म १९४७ साली एका संपन्न कुटुंबात झाला, जिथे मुलं आणि मुलींना समान वागणूक दिली जायची. अन्याय सहन करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. म्हणूनच त्यांनी न्यायाधीश व्हायचं ठरवलं. कायद्याचा अभ्यास करत असतानाच इराणच्या शाहविरुद्ध आंदोलनातही त्या उतरल्या होत्या. वयाच्या २२व्या वर्षी कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांची कनिष्ठ कोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूकही झाली.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इराण मुस्लिम राष्ट्र असलं तरी अरब राष्ट्र नाही. तिथे स्त्रियांना इतर मुस्लिम राष्ट्रांपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांना आजही पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान आहे. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांतीनंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवू लागली. शिरीन एबादींसह सर्व महिला न्यायाधीषांना आपलं पद सोडावं लागलं.

 एबादींना सल्लागार म्हणून बदली नोकरी मिळाली पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. १९८४ साली त्यांनी निवृत्ती घेतली.  खूप प्रयत्नांनंतर १९९२ साली एबादी यांनी वकिली कारकीर्द सुरू केली.

इतर वकिल ज्यावर बोलण्यासही धजावायचे नाहीत, असे संवेदनशील खटले एबादी यांनी लढवले. मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य आणि इस्लामशी निगडीत अनेक प्रश्न एबादी यांनी न्यायालयात उपस्थित केले आणि सत्ताधीषांना आव्हान दिलं. एबादी महिलांच्या अधिकाऱांसाठी लढणाऱ्यांचा आवाज बनल्या.. अत्याचार सोसणाऱ्यांची बाजू एबादी यांनी मांडली तीही इस्लामच्या चौकटीत राहूनच. एबादी अनेकदा कुराणमधल्या घटनांचे दाखले अशातऱ्हेने देत की कट्टरपंथी न्यायाधीशही गोंधळून जात. देशविदेशांतून शिरीनना भाषणासाठी आमंत्रणं येऊ लागली. एबादी यांनी पुस्तकांतूनही अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

२००० साली शिरीनना  तुरुंगात टाकण्यात आलं. कबुलीजबाब घेण्यासाठी आपला अतोनात छळ करण्यात आला, असं एबादींनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय. एबादींना लोकांचा पाठिंबा पाहता सरकारनं अखेर त्यांची जामिनावर सुटका केली.

२००३ साली एबादी यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं. पुरस्कार स्वीकारून एबादी घरी परतल्या तेव्हा विमानतळावर हजारो लोक,  सहकारी, पुरोगामी नेते, अधिकारी आणि अयातोल्ला खोमेनींची मुलगीही आली होती.

२००९ साली इराणच्या वादग्रस्त निवडणुकींनंतर राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद यांच्याविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. एबादी यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांच्या जीवाला आधीपासून धोका होताच, पण परिस्थिती चिघळत गेली. २००९ सालापासून एबादी इंग्लंडमध्येच वास्तव्याला आहेत. इराणमध्ये परतणं त्यांच्यासाठी सध्या अशक्य आहे. पण देशाबाहेर पडल्यावरही त्यांचं काम थांबलेलं नाही.

– जान्हवी मुळे

Advertisements