पाकिस्तानच्या मातीत काही तरी खास असावं. म्हणूनच तिथे अनेक खंबीर महिलांनी जन्म घेतला. अस्मा जहांगीरपासून मलाला युसाफझाईपर्यंत अनेक स्त्रिया आज पाकिस्तानचं आणि पर्यायानं जगाचं रूप पालटवण्यासाठी प्रयत्न करतायत. तिथल्या सनातनी आणि कट्टरतावाद्यांचा सामना करतायत. खलिदा ब्रोही त्यातलीच एक. 2513bcc-2.cached

अवघ्या सोळाव्या वर्षी खलिदा महिलांवरील अत्याचाराविरोधात आंदोलनात उतरली. पण केवळ आंदोलन करून थांबली नाही, तर अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय.

बलुचिस्तानातल्या एका खेड्यात खलिदाचा जन्म झाला. टोळीवाल्यांच्या या प्रदेशात आजही जगणं सोपं नाही. त्यात महिलांची वाट तर आणखीनच खडतर. महिलांनी घराबाहेर पडू नये, असाच शिरस्ता. पण खलिदाचे वडील त्याला अपवाद ठरले. त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे खलिदाच्या आईला स्वतः लिहा वाचायला शिकवलं. आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनी गाव सोडून कराचीत राहण्याचा निर्णयही घेतला. पण खलिदा पाच वर्षांची असताना त्यांना गावी परतावं लागलं.

गावातला निसर्ग, तिथली संस्कृती, परंपरा यांत खलिदा रमून गेली. मात्र आपल्या समाजातल्या बालविवाह, ऑनर किलिंगसारख्या अनिष्ट प्रथा तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. खलिदा सोळा वर्षांची असताना घडलेल्या एका घटनेनं तिचं आयुष्य बदलून गेलं. खलिदाच्या एका मैत्रिणीची तिच्याच घरच्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या केली.

त्यानंतर खलिदानं ऑनर किलिंगविरोधात मोहीमच सुरू केली. फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तिचं काम चालायचं. ऑनर किलिंगसारख्या चालीरीतींना सरकारी नियम कसं खतपाणी घालतायत हे या मोहिमेतून समोर आलं. अम्नेस्टी इन्टरनॅशनलच्या पाठिंब्यामुळे दोनच वर्षांत खलिदाच्या मोहिमेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं. मीडियात खलिदाला प्रसिद्धी मिळत गेली. पण गावात येण्याच्या तिच्या वाटा बंद झाल्या.

समाजातल्या एखाद्या प्रथेविरुद्ध आवाज उठवणं सोपं नसतं. तरीही अनेकजण ते धैर्य दाखवतात. त्यातूनच आंदोलन तर उभं राहतं. पण अनेकदा प्रश्न सुटत नाहीत. केवळ सरकारी धोरणं बदलून समाज बदलणार नाही याची जाणीव खलिदाला झाली. तीन वर्ष ऑनर किलिंगविरोधात मोहिम चालवल्यावरही आपल्या गावातली परिस्थिती जैसे थे आसल्याचं तिच्या लक्षात आलं.

खलिदानं मग आपली योजनाच बदलून टाकली. सर्वात आधी खलिदानं गावातील लोकांची, टोळीवाल्या नेत्यांची आणि समाजातील मोठ्या लोकांची माफी मागितली. खलिदासाठी ते पाऊल फार कठीण होतं. पण त्यामुळे तिच्या समाजातील कला, संगीत, भाषा यांच्यावर आधारीत योजनेसाठी परवानगी मिळाली.

स्थानिक कलाकुसर आणि भरतकामाचा प्रसार करण्यासाठी खलिदानं गावात एक केंद्र सुरू केलं. प्रत्येक घरातील बायका दिवसातले दोन-तीन तास तिथं काम करायच्या. अनेकींनी त्याआधी कधीच घराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं. मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाल्यावर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. जमलेल्या महिलांना खलिदानं फक्त भरतकामच शिकवलं नाही, तर लिहा-वाचायला शिकवलं आणि आपल्या हक्कांची जाणीवही करून दिली.

सहा महिने सेंटरवर काम करणाऱ्या महिलांना खलिदानं स्वस्तात कर्ज उपलब्ध करून दिलं आणि स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. वाढत्या महागाईच्या काळात घरी पैसा येतोय म्हटल्यावर पुरुषांनीही थोडं नमतं घ्यायला सुरूवात केली.

सेंटरवर तयार होणारी कलाकुसर खलिदानं कराची आणि इतर मोठ्या शहरांत नेली अगदी थेट फॅशन शोज पर्यंत. आज खलिदाच्या टीमनं बलुचिस्तानातील आदिवासी स्त्रियांचा सुघार हा नवा फॅशन ब्रँडच तयार केला आहे. सुमारे २५ गावांत सध्या अशी भरतकामाची केंद्रं चालवली जातात आणि आठशेहून अधिक महिलांना त्यामुळे रोजगार मिळालाय. येत्या दहा वर्षांत दहा लाख महिलांपर्यंत पोहोचायचं लक्ष खलिदानं नजरेसमोर ठेवलंय.

केवळ धोरणं आणि कायदे आणून महिलांचं सबलीकरण होणार नाही, तर ठोस योजनाही राबवली जायला हवी, हे खलिदानं दाखवून दिलंय. तिच्या या कहाणीतून आपल्यालाही शिकण्यासारखं बरच काही आहे.

– जान्हवी मुळे

Advertisements