One child, one teacher, one book and one pen can change the World…

article-2465900-18D2B2DD00000578-33_306x423शिक्षणाच्या बळावर अख्खं जग बदलता येतं, हा विचार मांडलाय पाकिस्तानची युवा कार्यकर्ती मलाला युसुफझाईनं. खेळा बागडायच्या वयात मलालानं आपल्या देशात पाकिस्तानात एक चळवळ उभी केली, जी आज जगभर पोहोचली आहे.

मलाला खरं तर जेमतेम सतरा वर्षांची आहे. तिचा जन्म १९९८चा. पाकिस्तानातल्या निसर्गरम्य स्वात खोऱ्यात मलाला राहायची आणि इतर सर्वसामान्य मुलींसारखीच आपल्याच विश्वात रमलेली असायची. तिचे वडील झियाउद्दीन युसाफझई शाळा चालवायचे. त्यातही मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करायचे मलालाला त्यांनीच शिक्षणासाठी आणि पुढे लिखाणासाठी प्रोत्साहन दिलं.

एका पश्तुन परिवारात, जिथे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, अशा वातावरणात मलालाचा जन्म झाला होता. पण झियाउद्दीन यांनी आपल्या मुलीला कधीच दुबळं मानलं नाही. मलालाई या पश्तुन नायिकेचं नाव त्यांनी आपल्या मुलीला दिलं. वडिलांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र मलाला विसरलेली नाही.

जेव्हा तुमच्यापासून एखादी गोष्ट हिरावून घेतली जाते, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते, मलालाच्या बाबतीतही काहीसं तसंच झालं.

स्वातवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यावर तिथल्या सामान्य माणचांची घुसमट होऊ लागली. मुलींनी तर शिकूच नये असा फतवा निघाला. मलाला तेव्हा अकराच वर्षांची होती. पण त्या वयातही तिनं बीबीसीच्या उर्दू वेबसाईटसाठी गुल मकाई या नावानं लेखन केलं आणि स्वातमधलं वास्तव, त्यातही लहान मुलांची, मुलींची होत असलेली फरफट जगासमोर आणली. मलालावर कौतुकाचा, पारितोषिकांचा वर्षाव होऊ लागला.

आपल्या वाढत्या लोकप्रियेचा उपयोग मलालानं शाळेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी केला. पाकिस्तानी तालिबानला ही गोष्ट रुचली नाही. त्यामुळेच ऑक्टोबर २००८मध्ये शाळेतून घरी जात असताना मलालावर जीवघेणा हल्ला झाला. सगळं जगच त्या घटनेनं हादरून गेलं. ब्रिटनमध्ये मलालावर उपचार करण्यात आले. मृत्यूला मात देऊन मलाला त्यानंतर पुन्हा उभी राहीली, आणि मलाला फंडच्या रुपानं आजही तिचं शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच आहे.

मलालानं जे धैर्य दाखवलं, त्याचं कौतुक जगभरातील लोकांनी केलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये गेल्या वर्षी युवकांच्या खास सभेत मलालानं भाषण केलं. तो दिवसच ‘मलाला डे’ म्हणून साजरा करण्याचं संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलं. जगातल्या सोळा सर्वात प्रभावशाली युवतींमध्ये मलालाचा समावेश केला जातो. पण एक सेलिब्रिटी बनल्यावरही आपलं उद्दिष्ट विसरलेली नाही.

मलालानं आपली कहाणि ‘आय एम मलाला’ या पुस्तकात मांडली आहे, जी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

– जान्हवी मुळे

Advertisements