मणिपूर.. देशाच्या एका कोपऱ्यातलं राज्य, ज्याच्याकडे बहुतेकदा इतर भारतीयांचं फारसं लक्ष जात नाही. पण त्याच मणिपूरनं आपल्या देशाला दिल्या आहेत दोन नायिका.. बॉक्सर मेरी कोम, जिच्याविषयी आपण सगळेच जाणतो. आणि दुसरी इरोम चानू शर्मिला. आयर्न लेडी ऑफ मणिपूर. सहनशीलता, संघर्ष, कणखरता आणि मार्दव याचं प्रतिक बनली आहे शर्मिला.irom sharmila

जेवणाची नेहमीची वेळ टळून गेली तरी तुम्ही आम्ही भुकेनं कासावीस होतो. उपवासाच्या दिवशीही अनेकांचा एकादशी नि दुप्पट खाशी असा थाट असतो. मग विचार करा, गेली चौदा वर्ष, अन्नाचा कणही न घेता शर्मिला उपोषण करते आहे. मणिपूरमध्ये मानवाधिकारांसाठी शर्मिलाचा अहिंसक लढा सुरू आहे.

मणिपूर आणि आसाममध्ये फुटिरतावाद्यांचा बिमोड करण्यासाठी १९८०च्या दशकापासून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अक्ट अर्थात आफस्पा लागू करण्यात आलाय. ब्रिटिशांच्या राजवटीतल्या अध्यादेशावर आधारीत या कायद्यानं सैन्याला विशेषाधिकार दिले आहेत, ज्यांचा अनेकदा गैरवापरच होताना दिसतो. साल २०००मध्ये अशीच एक घटना घडली होती जिनं इरोम शर्मिलाचं आयुष्य बदलून टाकलं.

२ नोव्हेंबर २००० रोजी इम्फाळजवळच्या मालोम या छोट्या गावात आसाम रायफल्सच्या जवानांच्या एका गाडीसमोर विस्फोट झाला. त्यानंतर गाडीतील सैनिकांनी दहा निरपराध नागरिकांना गोळ्या घालून ठार केलं. मणिपूरमध्ये त्यावरून बरंच वादळ उठलं होतं. आफस्पाचा गैरवार पाहता हा कायदा मागे घेतला जावा या मागणीनं जोर धरला. इतर मणिपूरी जनतेप्रमाणेच २८ वर्षांची इरोम शर्मिलाही त्या घटनेनं पेटून उठली. मालोममध्ये हिंसाचार घडला त्या दिवशी शर्मिलाचा उपवासच होता. तिनं मग जेवण न घेण्याचा निर्धार केला आणि उपोषण सुरू ठेवलं.

तिसऱ्याच दिवशी शर्मिलाला अटक करण्यात आली. मणिपूर सरकारनं शर्मिलाला आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली कैदेत टाकलं आणि नाकातून बळजबरीनं अन्न द्यायला सुरूवात केली. आता चौदा वर्ष होत आली. पण शर्मिलाचा अहिंसक लढा अजून थांबलेला नाही. वयाची चाळीशी ओलांडल्यावरही तिचा निर्धार कायम आहे. आजवर कुणीही इतकी वर्ष उपोषणातून संघर्ष केलेला नाही. सैन्याकडून होणारा कायद्याचा गैरवापर आणि मानवाधिकारांचं उल्लंघन याविरुद्ध लढ्याची शर्मिला नायिका बनली आहे.

शर्मिलाची अधूनमधून कैदेतून सुटका केली जाते, ती पुन्हा अटक करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही पुन्हा तेच पाहायला मिळालं. शर्मिलाची मुक्तता करण्यात आली. मात्र तिनं उपोषण सुरूच ठेवल्यानं दोनच आठवडयात तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं. हे चक्र असंच सुरू आहे. पण शर्मिला हार मानणाऱ्यातली नाही, हे तिनं वारंवार सिद्ध करून दिलंय.

शर्मिलाच्या या लढ्यानं काय साध्य झालं, असा प्रश्न विचारला जातो. पण तिच्या सततच्या संघर्षामुळेच मणिपूरमधलं वास्तव इतर भारतीयांसमोर आलंय. मणिपूरच्या अनेक भागांतून आज आफस्पा मागे घेण्यात आलाय. पण हा कायदा पूर्णपणे मागे घेतला जाईपर्यंत आपली लढाई संपणार नाही असं शर्मिलानं स्पष्ट केलं आहे.

शर्मिलाला अनेक पक्षांनी निवडणुकीत उमेदवारी देऊ केली होती. पण ते शर्मिलानं नाकारलं. आपल्याला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, आपण एक सर्वसामान्य स्त्री आहोत आणि एक स्त्री म्हणून सामान्य, नॉर्मल आयुष्य जगायचं आहे, एवढीच शर्मिलाची अपेक्षा आहे. पण त्याच इच्छेनं शर्मिलाला असामान्य बनवलंय.

– जान्हवी मुळे

Advertisements