अंधेरीतला एक वाहता रस्ता. महामार्गावरचा सिग्नल पडला, की गाडी किमान दोन मिनिटं थांबते. आणि लगेचच अनेक लहान मुलं पुढे सरसावतात. कुणी काहीबाही विकण्यासाठी, तर कुणी भीक मागण्यासाठी. तसं मुंबईच्या शेकडो सिग्नल्सवर दिसणारं हे नेहमीचंच दृष्य. आणि ‘ती’ अशाच हजारो मुलांपैकी एक.. वय जेमतेम आठ-दहा वर्ष.

 कधी ती फुलं विकताना दिसते, तर कधी छोटी खेळणी. आणि कधी कित्येक दिवस गायब असते. त्या दिवशी हातात तिरंगा घेऊन ती धावत आली, आणि शेजारच्या गाडीतल्या मुलांशी बोलू लागली. 

 “दीदी, ये झंडा ले लो ना ” “झंडा ले कर क्या करेंगे? ” “कल वो झंडा-दिन है ना.. अच्छा लगेगा आप के हात में.. ” “कोई जरुरत नही, चलो जाओ यहां से..” ती साहजिकच हिरमुसली. शेजारच्या बाईकवाल्यानं तिला बोलवलं आणि तीन-चार तिरंगी बिल्ले विकत घेतले. पाच रुपयाच्या बिल्ल्यासाठी घासाघीस केली. पण शेवटी पैसे काढून दिले. 

 समाधानानं ती ट्रॅफिकमधून वाट काढत पुढे सरकली. आणि एकदम थबकली.

 समोर उभ्या स्कूलबसकडे, आतमधल्या मुलांकडे पाहू लागली. काय नव्हतं तिच्या नजरेत? कुतुहल, दुःख, आशा, निराशा… हातात तिरंगा आणि डोळ्यात स्वप्न घेऊन उभ्या तिला पाहून मीही क्षणभर सगळंच विसरून गेले. सिग्नल सुरू झाला, तसं ती भानावर आली. वाटेतून बाजूला होत डिव्हायडरवर उभी राहिली आणि हातातल्या झेंड्यांकडे पाहू लागली. 

 गाड्यांचे हॉर्न आणि मुलांच्या किलबिलाटापेक्षा तिच्या शांततेचा आवाज माझ्या डोक्यात अजूनही वाजतो आहे.. 

Advertisements