एका सहका-यासोबत झालेली चर्चा. सुरूवात अर्थातच निवडणुकीवरून.

“सध्याच्या परिस्थितीविषयी काय वाटतं, काय होईल?”

मी – काय होईल, याचं उत्तर मिळेलच. आणि माझं मत काय आहे, यानं फरक पडणार नाही. लोक ज्याला कौल देतील, तो सत्तेत येईलच. लोकशाही आहे आपली, म्हणजे सर्व विचारधारांना स्वातंत्र्य आहे इथे आणि सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. हिंदुत्ववादी नेता निवडून येणं हेही लोकशाहीचंच लक्षण आहे. आणि लोकांचा कौल मोदींना असेल, तर त्यांना एक संधी किंवा थोडा संशयाचा फायदा देण्यात हरकत नाही. मोदी कदाचित बदलले असतीलही, पण मोदी सत्तेत आले, तर एक पत्रकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक स्त्री म्हणून, I have to be ready to face tough times.

“असं का? तू snoopget विषयी बोलतेयस का?”

“नाही. मोदींचं पंतप्रधान होणं म्हणजे अनेकांना स्फुरण देणारं आहे. त्यात आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलसारखे लोक आहेतच, पण श्रीराम सेनेसारख्या संघटना आणि अमक्या मठाचे आचार्य, तमक्या मंदिराचे पुजारी, असे अनेक लोकही आले. त्यांच्या हिंदूधर्माविषयीच्या कल्पना आणि आडाखे तापदायक आहेत. खास करून बायकांसाठी. मुलींच्या कपड्यांवर बंधनं घालण्याची मागणी करणारे हे लोक, बायका पबमध्ये गेल्या की संस्कृती भ्रष्ट होते असा आकांत करतात. जणू संस्कृती ही बाईची जबाबदारी आहे. अशी माणसं शेफारली, तर कठीण आहे.”

चर्चेचा रंग साहजिकच बदलला मग. आणि माझं म्हणणं बरोबर असलं तर काही बायकांचं वागणंही चुकीचं असल्याचा सूर उमटला.

“म्हणजे तुला बायकांनी सिगरेट ओढणं मान्य आहे?”

“मला कोणीच सिगरेट ओढणं मान्य नाही. खास करून public placeमध्ये. फक्त स्वतःची नाही, समोरच्याचंही नुकसान करतो सिगरेट ओढणारा. आणि याउप्परही, कोणी सिगरेट ओढावी की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता तिसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीतही हुक्का, चिलीम, विडी आहेतच की. आणि गांजा ओढणारे साधू- ते व्यसन तर आणखीनच घातक.”

“पण कसं असतं, बायका अशा गोष्टी करतात, तेव्हा होणारा इम्पॅक्ट वेगळा असतो. म्हणजे एखाद्या घरात बापाला दारूचं व्यसन असेल, तर आई, तिच्या मुलाला सांगते, की वडिलांच्या दारूमुळे तिला किती त्रास झाला. मग मुलगा पुढे मोठं झाल्यावर दारूला हातही लावणार नाही, कारण त्याला दारूचे दुष्परिणाम माहित असतात. पण आईच जर दारू प्यायला लागली तर… ”

“अरे! म्हणजे पुरुषांना मोकळी सूट आणि बायकांभोवती कसलं कसलं बंधन.. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी काय फक्त एकट्या आईचीच आहे? आणि मुळात दारू पिणं आणि दारूचं व्यसन असणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

कुठल्याही गोष्टीचं प्रमाणाबाहेर सेवन वाईटच असतं. वाईन, रम, ब्रँडीसारखी पेयं कधीकधी आरोग्याला चांगलीही ठरतात. आपल्याकडे एखाद्याच्या हातात ग्लास दिसला, की लगेच त्याला दारुडा ठरवलं जातं, जे चुकीचं आहे.

मी दारूचं समर्थन करत नाहीए. पण दारू प्यायची की नाही, कोणतं ड्रिंक ‘दारू’ आहे आणि कोणतं नाही, हे वैयक्तिक प्रश्न आहेत. आणि एखाद्या बाईला आवडत असेल ड्रिंक घ्यायला, तर लगेच ती चवचाल, भ्रष्ट असल्याचं लेबल लावणं आणि आपली संस्कृती बुडाली असं म्हणणं मात्र साफच चुकीचं आहे.

मान्य, की काही विशिष्ट कालावधीत म्हणजे conception, pregnancy, बाळाच्या जन्मानंतरचा काही काळ, मूल लहान असेपर्यंत आईनं खाण्यापिण्यावर बंधनं पाळायला हवीत. आरोग्यशास्त्राचा आधार आहे त्याला. पण म्हणून सर्रास मनाई करायची आणि ‘पिणाऱ्या’ बायकांना ‘वाईट्ट’ ठरवायचं??? सोशल ड्रिंकिंगची कल्पनाच माहित नसल्यानं असं थेट मत मांडलं जातं. एखाद्या घरात ड्रिंक्स घेत असतील, आईनं स्वतः सर्व्ह केलं, तर उलट मुलांना कदाचित त्यात काही अप्रुप वाटणार नाही.They might not remain curious about it. Again, it’s a personal matter. कोणी पुरुष दारू पितो, तेव्हा त्याला धर्मभ्रष्ट करत नाहीत, मग बायकांना वेगळा न्याय कशासाठी? काही बंधनं जरूर पाळावीत, पण फक्त बायकांनीच का?”

“मला कसलंही व्यसन नाही, आणि माझ्या बायकोनं व्यसन केलेलं मला चालणार नाही”

“गुड. हा तुझा निर्णय आहे, चांगलाच आहे. पण तो इतरांवर लादू नको.”

आमची चर्चा तिथेच थांबली. पण माझ्या विचारांचं चक्र पुढे सरकलं.

मोदी सत्तेत आले, तर देशाचा विकास होईल न होईल हा प्रश्न अलाहिदा. पण अशा दांभिक विचारसरणीची माणसं डोकं वर काढतील, हे नक्की.

ताप आहे डोक्याला.

योगायोग पाहा ना? मदर्स डे आहे आज.. आईवर आणि पर्यायनं स्त्रियांवर महानतेच्या नावाखाली किती ओझं टाकलं जातं, याची जाणीव करून देणारा दिवस.

पण खरंच, आदर्श आई कोण हे कसं ठरवायचं? एखादी आई केवळ आईसारखी दिसत नाही, वागत नाही, म्हणून ती वाईट ठरते का? मुलांवर प्रेम, मुलांसाठी त्याग हे केवळ आईनंच करावं अशी अपेक्षा का केली जाते? अनेक आदर्श आया, आपल्या आंधळ्या प्रेमापोटी मुलांचं नुकसान करतात, ते योग्य आहे का?

मी अशा अनेक मुलींना ओळखते, ज्या रेग्युलरली पबमध्ये जातात, सिगरेटही ओढतात पण तरीही, न चुकता देवळात जातात, नवरात्रीत उपवास करतात, त्या हिंदू नाहीत का? धार्मिक नाहीत का? आणि त्या चांगल्या माता बनणार नाहीत का?

माझी संस्कृती, माझा धर्म सिगरेट ओढणाऱ्या किंवा दारू पिणाऱ्या बाईमुळे संकटात आलेला नाही. पण दंगलखोरांना घरातले सिलेंडर्स पुरवणाऱ्या आणि चिथावणी देणाऱ्या बायकांमुळे मात्र तो भ्रष्ट झाला आहे.

Advertisements