कर्जत परिसरात सध्या महामार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आणि त्यासाठी झाडांवर कुऱ्हाड पडते आहे.

चांगले रस्ते हवेत, विकास हवा, तर काही वेळा वृक्षतोड टाळता येत नाही. विकासाला माझा विरोध नाही. पण गरज नसताना जेव्हा झाडांची सर्रास कत्तल होते, तेव्हा खरंच डोक्यात तिडीक जाते. असाच प्रकार आमच्या शेताजवळ घडलाय. आणि त्यात एका दुर्मिळ वृक्षाचा बळी गेलाय.

20140422_090331

 

हे नांदुरकी चं झाड माझ्या बाबा, काकांच्या लहानपणापासून म्हणजे किमान साठ वर्ष उभं होतं. कर्जत-भिसेगाव परिसरात अशी दोनच मोठी झाडं शिल्लक होती. एक  रेल्वे गेटजवळ, जे आता अस्तित्वात नाही. आणि दुसरं आमच्या हद्दीवर, ज्यावर सोमवारी कुऱ्हाड चालली.


20140422_090239

खरंतर विकासकामांसाठी, आणि एरवीही जंगलात कुठलीही झाडं तोडण्यापूर्वी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. त्यासाठी वनखात्याकडून आधी पाहणीही केली जाते. ज्यांच्या हद्दीतील झाडं तोडली जाणार आहेत, किंवा ज्यांची जागा जाणार आहे त्यांना नोटीस दिली जाते. वनखात्याच्या पाहणीत जी झाडं तोडायची आहेत त्यावर नंबर टाकले जातात. आणि जी झाडं तोडायची नाहीत, किंवा वाचवायची आहेत त्यांवर फुली मारली जाते. झाडं तोडण्याचं काम खासगी कंत्राटदाराला दिलं जातं.

20140422_090309

नांदुरकीच्या या झाडावरही फुली मारण्यात आली होती. मात्र कंत्राटदारानं बेधडकपणे झाड तोडलंय. नशीब, त्याचं मशीन बंद पडलं, आणि शेजारचं वावळाचं झाड आणि दोनशे वर्ष जुनी आंब्याची दोन झाडं वाचली. (आमच्या शेतावर राहणाऱ्यांना कल्पना नव्हती, की ती झाड राखीव आहेत.)

माझे काका दुपारी घरी आले होते. संध्याकाळी शेतावर परत गेल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी लगेचच कर्जतच्या वन विभागात फोन लावला. काल मीही शेतावर गेले होते, काही स्पष्टीकरण मिळालं नाही तर पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीनं. अर्थात कर्जतचे वनअधिकारीही या घटनेनं नाराज आहेत आणि यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी तातडीनं पावलं उचलली आहेत.

पण काही झालं, तरी पाडलेला वृक्ष तर आता उभा नाही राहू शकत ना पुन्हा… आमच्या प्रवेशद्वाराजवळ राखणदारासारखा उभा होता तो एवढी वर्ष. आणि म्हणूनच त्याची ही अवस्था लक्षात आली लगेचच. पण अशी कित्येक झाडं विनापरवानगी तोडली जात असतील, अशी शंकाही उभी राहिली आहे. आणि म्हणूनच हा ब्लॉगप्रपंच.

आपल्या आसपास, एखादं झाड तोडलं जात असेल, तर झाड तोडणाऱ्याकडे तशी परवानगी आहे का, याची खातरजमा करून घ्या. आपल्या हद्दीतलं झाड तोडलं जाणार असेल, तर आधी त्याचा मोबदला घ्यायला विसरू नका. असा मोबदला देणं टाळण्यासाठी दुसऱ्या बाजूची सरकारी हद्दीतली राखीव झाडं तोडली जातात अशी तक्रार कानावर आहे. झाडांची तस्करी होत नाही ना, हेही तपासून पाहायला हवं.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी दुसरी झाडं लावल्याशिवाय झाडं तोडण्याची परवानगीच देऊ नये वनखात्यानं..

20140422_093303

Advertisements