भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत. इजिप्त, इराक, दक्षिण आफ्रिका, ब्राझिलमध्ये यंदा निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण भारताच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या अफगाणिस्तानातील निवडणुका.

हमीद करझाई यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या पाच एप्रिलला अफगाणिस्तानात मतदान होणार आहे. तब्बल 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र अब्ब्दुल्ला अब्दुल्ला आणि अश्रफ गणी अहमदझाई या दोघांमध्येच मुख्य शर्यत असेल. एका अर्थानं या निवडणुका ऐतिहासिक आहेत, कारण अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेण्यास सुरूवात केल्यानंतर अफगाण नागरीक आपल्या नव्या नेत्याची निवड करणार आहेत.

अफगाणिस्तानात सध्या 38 हजार अमेरिकन सैनिक तैनात असून या वर्षअखेरीस तेही मायदेशी परततील. या बदलत्या परिस्थितीत भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अफगाणिस्तानात सक्षम सरकार असणं भारतासाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी हिताचं आहे. शनिवारी होणाऱ्या निवडणुका असफल ठरल्या, तर या देशात राजकीय अस्थितरता निर्माण होऊ शकते अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या निवडणुकीत खोडा घालण्याचे तालिबानचे प्रयत्नही सुरू आहेत. अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसांत हिंसाचार आणि तालिबानी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र तरीही अफगाण नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी नावनोंदणी केली आहे आणि हे चित्र नक्कीच आशादायी आहे.

– जान्हवी मुळे

===

यंदा निवडणुकांना सामोरं जाणारे महत्त्वाचे देश

30 एप्रिल – इराकमध्ये संसदीय निवडणुका

7 मे – दक्षिण आफ्रिकेत संसदीय निवडणुका

22 ते 25 मे – युरोपियन युनियनच्या संसदेसाठी निवडणुका

26-27 मे – इजिप्तमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका

14 जून – इस्राएलमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका

2 ऑगस्ट – टर्कीमध्ये  राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका

20 सप्टेंबर – न्यूझीलंडमध्ये संसदीय निवडणुका

5 ऑक्टोबर – ब्राझिलमध्ये संसदीय आणि राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका

Advertisements