अमेरिका आणि रशियामधलं शीतयुद्ध संपून दोन दशकं उलटली आहेत. पण आजही दोन्ही देशांमधला तणाव निवळला आहे का, हा प्रश्न पडाव्यात अशा घटना अधून-मधून घडताना दिसतात. सध्या युक्रेनमध्ये तेच सुरू आहे. पूर्व युरोपातील या देशात आंदोलनामुळे युरोप आणि रशिया समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणातही त्याचं प्रतिबिंब पडतंय. याच घडामोडींचा हा संक्षिप्त आढावा:

रशियावर युक्रेनमध्ये हस्तक्षेपाचा आरोप   

युक्रेनमधल्या क्रिमिया या स्वायत्त प्रजासत्ताक राज्यात शुक्रवारी सुरू झालेल्या हालचालींनी अचानक जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिमियातील काही महत्त्वाच्या सरकारी इमारती रशिया समर्थकांनी ताब्यात घेतल्या आहेत. तर दोन विमानतळांवर अज्ञात व्यक्तींनी ताबा मिळवला आहे. या प्रदेशात रशियन सैनिकांचा, हेलिकॉप्टर्सचा वावर सुरू झाला आहे.

खरंतर युक्रेनबरोबरच्या काराराअंतर्गत रशियानं क्रिमियामध्ये नाविक तळ उभारला आहे. मात्र आता सैनिकांना रस्त्यावर उतरवून रशियानं या कराराचा भंग केला आहे, असा आरोप युक्रेनचे हंगामी राष्ट्राध्यक्ष ओलेक्झांड्र तुर्चिनोव्ह यांनी केला आहे.

अमेरिका, संयुक्त राष्ट्रांची भूमिका

अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी युक्रेनला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र सध्या क्रिमियात होत असलेल्या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चिंता व्यक्त केली जाते आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी तर स्पष्ट इशारा दिला आहे, की ‘काही दिवसांपूर्वीच अख्खं जग सोची ऑलिम्पिकसाठी रशियात एकवटलं होतं, आता मात्र रशिया जगाचा रोष ओढवून घेण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून कोणत्याही सैनिकी कारवाईला अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोधच राहील’

साहजिकच युक्रेनमध्ये पुतिन यांनी लष्कराला उतरवलं, तर अमेरिका आणि युरोप प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

का महत्त्वाचा आहे युक्रेन?

भौगोलिक स्थान, व्यापाराच्या संधी आणि इतिहासाच्या दृष्टीनं युक्रेनला महत्त्वाचं स्थान आहे. एका सिद्धांतानुसार युक्रेनच्याच गवताळ प्रदेशात आर्यांचा आणि इंडो-युरोपियन भाषांचा (संस्कृतसह भारतीय भाषांच्या पूर्वज) उगम झालाय.

आधुनिक काळात पूर्व युरोपातील हे राष्ट्र म्हणजे युरोप आणि रशियामधला दुवा आहे. खरंतर युक्रेन आकारानं आपल्या महाराष्ट्रापेक्षा जवळपास दुप्पट, पण लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्म्याहूनही कमी असलेला देश आहे. साडेचार कोटी लोकसंख्येचं हे राष्ट्र, सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

काय आहे ‘युरोमैदान’?

युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला युरोमैदान असं नाव पडलंय. ‘मैदान’ म्हणजे युक्रेनियन भाषेत मोकळी जागा अथवा शहरातला मोठा चौक. कीव्ह (किएव्ह) या युक्रेनच्या राजधानीत इंडिपेण्डन्स चौकात नोव्हेंबरमध्ये युरोमैदानची सुरूवात झाली.

राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुनोविच यांनी एखाद्या हुकूमशहासारखी एकाधिकारशाही मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात युक्रेनची आर्थिक स्थिती ढासळत गेली. त्यात यानुनोविच यांनी युरोपियन युनियनशी करार करण्याचा निर्णय मागे घेतल्यानं युक्रेनची जनता रस्त्यावर उतरली. युक्रेनमधील लोकांसाठी ‘युरो’ म्हणजे केवळ युरोपियन युनियन नाही, तर मुक्त व्यापार आणि मुक्त विचारांचं प्रतीक आहे.

युरोमैदानचं फलित काय?

जन-आंदोलनाच्या रेट्यापुढे रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष यानुकोविच यांना देश सोडून जावं लागलं. ओलेक्झांड्र तुर्चिनोव्ह यांनी हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

पण या घडामोडींनी युक्रेनचा समाज दोन गटांत विभागला गेलाय. युक्रेनियन भाषा बोलणारे, प्रामुख्यानं पश्चिम युक्रेनचे रहिवासी- ज्यांनी युरोमैदानचं समर्थन केलं आणि दुसरा गट आहे रशियन भषिक, रशिया समर्थक, पूर्व युक्रेनच्या रहिवाशांचा, ज्यांचा यानुकोविचना पाठिंबा होता.

रशियाला युक्रेनमध्ये एवढा रस का वाटतो?

युक्रेन रशियाचा जवळचा देश आहे, खास करून पूर्व युक्रेनशी रशियाचं सांस्कृतिक नातं आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष यानुनोविच यांना रशियानंच आश्रय दिला आहे.

रशियासाठी व्यापाराच्या दृष्टीनं क्रिमियाचं स्थान तर आणखी महत्त्वाचं आहे. त्याहीपेक्षा, पूर्व युक्रेनमध्ये बहुसंख्य लोक रशियन बोलणारे आहेत, आणि म्हणूनच रशियाच्या जवळचे आहेत. क्रिमियाच्या पंतप्रधानांनी तर तणावाच्या पार्श्वभूमीवर थेट पुतिननाच मदतीसाठी साकडं घातलं आहे. कदाचित क्रिमियात दिसणारे रशियन सैनिक त्याचाच परिपाक असावेत. अर्थात क्रिमियामधली ही लाट हळूहळू पूर्व युक्रेनमध्ये पसरेल, अशी भीती युक्रेनियन भाषिकांना वाटते आहे.

युक्रेनमधील घडामोडींचा परिणाम काय होईल?

दोन वेगवेगळ्या गटांत विभागलेला हा देश किती काळ एकसंध राहिल, याविषयी साशंकता व्यक्त होते आहे. युक्रेनचं विभाजन होण्याची शक्यता मोठी असली, तरी व्लादिमीर पुतिन काय पावलं उचलतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. युक्रेनमधला गृहकलह युरोपला आणि जगाला पुन्हा एका युद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन न जावो, हीच आशा.

– जान्हवी मुळे

Advertisements