Turning and turning into the widening gyre

The falcon cannot hear the falconer;

Things fall apart; the centre cannot hold;

Mere anarchy is loosed upon the world…

–       W.B. Yeats

आयरिश कवी डब्ल्यू बी यीट्सच्या या ओळी गेल्या आठवड्यापासून सारख्या मनात रुंजी घालतायत. माझ्या काही आवडत्या कवितांपैकी ही एक आहे. 1919 मध्ये प्रकाशित झालेल्या या कवितेत महायुद्धानंतरच्या युरोपचं वर्णन आणि बायबलमध्ये ख्रिस्तानं दिलेलं पुन्हा अवतरण्याचं वचन, यांवर यीट्सनं भाष्य केलं आहे. वर दिलेल्या चार ओळी तत्कालिन परिस्थितीचं वर्णन करतात. या ओळींचं थेट भाषांतर नाही, पण सारांश काहीसा असा आहे.

फाल्कन, म्हणजे बहिरी ससाणा, आणि फाल्कनर म्हणजे ससाण्याला नियंत्रित करणारा शिकारी. आकाशात घिरट्या घालत सावज हेरणारा ससाणा, आपल्या घिरट्या वाढवत जातो आणि शिकाऱ्यालाच जुमानेसा होतो. गोष्टी हाताबाहेर जातात. मध्यवर्ती सत्ता कोलमडते आणि अराजकाची लाट जगाला आपल्या कवेत घेत जाते.

95 वर्षांनंतरही जग यीट्सच्या कवितेपेक्षा वेगळं वाटत नाही. गेल्या काही दिवसांतील घटना यीट्सच्या कवितेची आठवण करून देतायत मला. अरब विश्वातील अशांतता, बांगलादेशातला हिंसाचार, यांत आता भर पडली आहे युक्रेनमधली उलथापालथ, व्हेनेझुएलातली निदर्शनं आणि थायलंडमधल्या सत्तासंघर्षाची… (आणि भारतात येऊ घातलेल्या निवडणूका… कोण जाणे त्यानंतर काय चित्र असेल इथे! )

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतले हे देश. पण तिथली दृष्यं बरीचशी एकसारखी आहेत सध्या. आर्थिक संकट, व्यवस्थेविरोधात लोकांचं आंदोलन, हिंसाचार, अस्थिर सरकार, अराजक.. हा निव्वळ योगायोग, की जागतिकीकरणाचा आणखी एक परिणाम?

एक मात्र नक्की, गेल्या आठवड्यात चर्चेत आलेल्या तीनही देशांमध्ये; म्हणजे युक्रेन, व्हेनेझुएला आणि थायलंडमध्ये; एक समान दुवा आहे- या तीन्ही देशांतील संघर्षाला आर्थिक पडझडीची किनार आहे.

– जान्हवी मुळे

Advertisements