आपल्या शेजारच्या आंटी गेल्या..

पद्माचा मेसेज आला आणि मन एकदम सुन्न होऊन गेलं. या आंटी म्हणजे माझ्या चाची, वरळीत आमच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या लक्ष्मी तिवारी.

त्यांचं आमचं काहीच नातं नव्हतं, ना फारशी ओळखपाळख. अगदी टिपिकल मुंबईतल्यासारखं. पण तरीही शेजारी कुणीतरी आहे, याचा आधार होता.

आम्ही तिघी नोकरी करणाऱ्या, तीही वेळेचा ठावठिकाणा नसलेली. घराचं दार त्यामुळे अनेकदा बंदच असायचं. पण सकाळी दार उघडल्यावर अनेकदा चाची दाराशी बसलेल्या असायच्या. ‘कैसी हो जानवी? ऑफिस जा रहे हो? ’ अशी चौकशी व्हायची.

आपण अगदी गडबडीत असलं, तरी अनेकदा थांबवून मागणी व्हायची, ‘जरा रद्दी पेपर हो तो देना बेटा..’ चाचींना कशाला हवे असतात पेपर, असा प्रश्न अनेकदा पडायचा. पण पुन्हा दार उघडून पेपर काढून दिले जायचे.

बाईच्या अंगात तसा खोचकपणा बराच होता. कधी कुणा पुरुष माणसानं आमचं दार ठोठावलं रे ठोठावलं, की या त्यांच्या दारातून बाहेर डोकावून पाहायच्या. मग तो नेमका कोण आहे, म्हणजे कोणी बिलं घेऊन आलेला, दूधवाला किंवा आमच्या घरचा आहे का, याची खात्री पडल्याशिवाय त्यांचं समाधान व्हायचं नाही. आमच्या घरात कोणीही आलं, की नेमकं कोण आहे, आम्ही कुठे बाहेर जातो आहोत याची त्यांना भारी उत्सुकता.

वैताग येतो अशा लोकांचा. पण चाचींच्या बाबतीत तसं नव्हतं. खरंतर त्यांचं आयुष्य तेवढ्या खोलीपुरतंच उरलं होतं. चाचींचा एक पाय कापावा लागला होता. जयपूर फूट लावून फार चालणं जमायचं नाही त्यांना. क्वचित खोलीबाहेर कॉरिडॉरमध्ये यायच्या आणि रोज सकाळी आत स्वयंपाकघरात जायच्या, तेवढंच. कदाचित म्हणूनच त्यांना बाकीच्यांच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घ्यायचं असावं, असं मी स्वतःला सांगायचे.

पण हेही खरं आहे, आमच्याही नकळत चाचींचं आमच्याकडे लक्ष असायचं. माझ्या मैत्रिणीकडून एकदा घराचं लॅच लॉक नीट लागलं नाही आणि दरवाजा तसाच उघडा राहिला. चाची दिवसभर दरवाजाशी बसून होत्या. संध्याकाळ झाल्यावरही काही हालचाल नाही म्हटल्यावर कुणी चक्कर येऊन पडली तर नाही ना, असं वाटल्यानं त्यांनी घरात डोकावून पाहिलं. मग आमच्या घरमालकिणीला फोन केला. चाची नसत्या तर? कुणी घरात शिरून काहीही करू शकलं असतं..   

कधी एखादं फळ, नातवासाठी चॉकलेट किंवा दिवाळीचा फराळ दिला, की चाची खूश व्हायच्या. चाचींनी हळूहळू अंथरूण धरलं. आमचं बोलणंही कमी होत गेलं. आणि आता त्या हे जगच सोडून गेल्या. चाचींच्या जाण्यानं जाणवलं, आपल्या नकळत काही माणसं जवळची झालेली असतात.

रोज सकाळी चाचा पूजा करायचे, त्यांच्या शंखध्वनीनं जाग यायची. पण आता बऱ्याच दिवसांत शंख कानावर पडलेला नाही..

– जान्हवी मुळे

Advertisements