खेळाच्या मैदानातील काही महत्त्वाच्या घडामोडी…

हॉकीत महिला पुरुषांपेक्षा वरचढ

2013 साली हॉकीच्या मैदानात एकीकडे भारतीय महिलांनी इतिहास रचला, तर दुसरीकडे पुरुष संघानं मात्र निराशा केली..

जर्मनीत झालेल्या ज्युनियर महिला विश्वचषकात भारताच्या मुलींनी कांस्यपदकाची कमाई केली. सुशीला चानूच्या टीमनं मिळवलेलं पदक हे कोणत्याही हॉकी विश्वचषकात भारतीय महिलांचं पहिलंच पदक ठरलं. भारताच्या सीनियर महिला टीमनंही आशिया चषकात कांस्य आणि एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्यपदक मिळवलं.

देशांतर्गत हॉकीत आयपीएलच्या धर्तीवर हॉकी इंडिया लीगच्या निर्मितीनं भारतातील हॉकीपटूंना नवी संधी मिळवून दिली. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुषांच्या ज्युनियर आणि सीनियर संघांनी निराशाचकेली. आशिया चषकातलं रौप्य वगळता पुरुष संघाला अपयशच आलं. अर्थात ऑस्ट्रेलियानं ओशियानिया कप जिंकल्यानं भारतीय पुरुष संघाला 2014 सालच्या विश्वचषकात मागच्या दरवाज्यानं प्रवेश मिळाला आहे.

——————

बुद्धिबळाच्या पटावर सत्तापालट

बुद्धिबळाच्या सिंहासनावरून विश्वनाथन आनंदला यंदा पायउतार व्हावं लागलं.

चेन्नईत झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला नॉर्वेच्या वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसननं पराभूत केलं. पाच वेळचा विश्वविजेता आनंद कार्लसनविरुद्ध एकही डाव जिंकू शकला नाही. वर्षभरात इतर स्पर्धांमध्येही आनंदला संमिश्र यश मिळालं. अर्थात आनंदनंनिवृत्तीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत आणि नव्या वर्षात चांगली कामगिरी बजावण्याचा निर्धार केला आहे.

दुसरीकडे युवा पिढीनंही भारताच्या आशा जागवल्या. परिमार्जन नेगी, अभिजित गुप्ता, नारायणन श्रीनाथ यांनी उल्लेखनीय विजय नोंदवले. महिलांमध्ये सौम्या स्वामिनाथननं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचं रौप्यपदक मिळवलं. तर ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येनाशिकच्या विदित गुजराथीनं कांस्य पदकाची कमाई केली.

——

बॅडमिंटनमध्ये नवी आशा

भारतीय बॅडमिंटनची नायिका सायना नेहवालच्या कामगिरीला 2013मध्ये ग्रहण लागलं.  सायनाला वर्षभर दुखापतींनी सतावलं आणि तिची जेतेपदांची झोळी रिकामीच राहिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाली. रँकिंगमध्येहीसायनाची आठव्या स्थानावर घसरण झाली.

दुसरीकडे भारताच्या पी.व्ही. सिंधूनं मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावली. ग्वांग्झूमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं महिला एकेरीचं कांस्यपदक मिळवलं आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. त्याशिवायमलेशिया आणि मकाऊमध्ये झालेल्या ग्रांप्री गोल्ड स्पर्धांमध्येही सिंधूनं सुवर्णपदकं मिळवली. अर्थात इंडियन बॅडमिंटन लीगच्या मंचावर सायना आणि सिंधूमध्ये झालेल्या समोरा-समोरच्या लढाईत सायनानंच बाजी मारली.

आता पुढील मोसमात फिटनेसवर जास्त भर देण्याचा निर्धार सायनानं केला आहे. तर सिंधूसमोर आपला फॉर्म कायम राखण्याचं आव्हान आहे. 2014 साली भारतीय बॅडमिंटनच्या या दोन्ही नायिकांकडून कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये पदकांची अपेक्षा आहे..

एरवी भारतात बॅडमिंटनसाठी 2013चं वर्ष संमिश्र ठरलं. इंडियन बॅडमिंटन लीगच्या रुपानं या खेळाला नवी संजीवनी मिळाली. ऑगस्टमध्ये झालेल्या आयबीएलमध्ये सायना नेहवालच्या हैदराबाद हॉटशॉट्सनी जेतेपद मिळवलं. सायना आणि सिंधूमधल्या सामन्यानंस्पर्धेची चुरस वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष एकेरीत भारताच्या परुपल्ली कश्यपनं टॉप टेनमध्ये धडक मारली. के श्रीकांतनं थायलंड ओपनमध्ये तर त्याचा भाऊ नंदगोपालनं मालदिवमध्ये पदकं मिळवली. महाराष्ट्राच्या अक्षय देवलकर, प्राजक्ता सावंत आणिप्रज्ञा गद्रेनं आश्वासक कामगिरी बजावली.

गेल्या मोसमात कोर्टबाहेर मात्र वादविवादांनी उचल खाल्ली. आयबीएलच्या लिलावात कमी बोली लागल्यानं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा नाराज झाल्या. आयबीएलदरम्यान वर्तणुकीसाठी ज्वालावर शिस्तभंगाच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली, मात्र दिल्लीउच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेनं बंदीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान ज्वाला आणि अश्विनी पुन्हा एकत्र आल्यानं, महिला दुहेरीत पुढील वर्षी पदकाच्या आशा उंचावल्या.

टेनिसकोर्टवर पेस, सानिया, सोमदेवचा ठसा

टेनिस कोर्टवर 2013 साली भारताचे स्टार ठरले, लिअँडर पेस आणि सानिया मिर्झा..

पेसनं वयाच्या चाळिशीत ग्रँड स्लॅम विजय मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.. 2013 सालच्या अमेरिकन ओपनमध्ये पुरुष दुहेरीत पेसनं चेक रिपब्लिकच्या राडेक स्टेपानेकच्या साथीनं जेतेपद मिळवलं. पुरुष दुहेरीत ही जोडी रँकिंगमध्ये सध्यासातव्या स्थानावर आहे.

सानिया मिर्झानं या मोसमात केवळ दुहेरीवरच लक्ष केंद्रीत केलं. डब्ल्यूटीए स्पर्धांमध्ये महिला दुहेरीत सानियानं वेगवेगळ्या साथीदारांसह पाच जेतेपदं मिळवली आणि टॉप टेनमध्ये जागा बनवली. वर्षअखेरीस सानियानं नववं स्थान गाठलं. पुढील मोसमात काराब्लॅकच्या साथीनं महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी सानिया सर्वात मोठी दावेदार बनली आहे.

पुरुष एकेरीत सोमदेव देववर्मननंही खराब फॉर्म मागे टाकला आहे. वर्षाच्या सुरूवातीला सोमदेवचं रँकिंग सहाशेहूनही खाली होतं. मात्र वर्षअखेरीस त्यानं टॉप हंड्रेडमध्ये झेप घेतली आहे. त्याशिवाय रोहन बोपण्णा नवीन मोसमात पुरुष दुहेरीत पुन्हा एकदा पाकिस्तानच्याऐसाम उल हक कुरेशीच्या साथीनं खेळणार आहे. या इंडो-पाक जोडीकडून नव्या मोसमात चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

कोर्टबाहेर 2013चं वर्ष भारतीय टेनिससाठी उलथापलथींचं ठरलं. वर्षाच्या सुरूवातीलाच सोमदेव देववर्मनच्या नेतृत्त्वाखाली अकरा टॉप खेळाडूंनी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनविरुद्ध बंड पुकारलं. आयटाला नमतं घेत खेळाडूंच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.खेळाडूंनी एकत्र येऊन भारतीय टेनिस प्लेयर्स असोसिएशनची स्थापना केल्यानं खेळाडूंच्या प्रश्नांना वाचा फुटली. भारताचा दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीच्या पुढाकारानं होऊ घातलेली इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग हे नव्या मोसमात भारतीय चाहत्यांसाठी मोठंआकर्षण ठरेल. जगभरातले दिग्गज टेनिसपटू या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

तिरंदाजीच्या गोल्डन गर्ल्स

भारतीय तिरंदाजांसाठी 2013चं वर्ष गोल्डन इयर ठरलं. दीपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि रिमिल ब्रुईलीच्या भारतीय संघानं 2013 साली दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. ऑगस्ट महिन्यात पोलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात तर भारतीयमहिलांनी ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियावर सनसनाटी विजय मिळवला. स्वतः दीपिकानं वर्षभरात सात आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली.

पुरुष संघाला रिकर्व्ह तिरंदाजीत एकही पदक मिळवता आलं नाही. मात्र आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं पहिल्यांदाच कम्पाऊंड तिरंदाजीत सांघिक सुवर्णपदक मिळवलं.  2014 साली होणाऱे कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स पाहता भारतीय तिरंदाजांचा फॉर्मउत्साह वाढवणारा आहे.

—-

भारतीय ऑलिम्पिक संघटनेत सुधारणा

खेळाडू, चाहते, क्रीडा मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून वाढत्या दबावासमोर भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे आयओएला अखेर नमतं घ्यावं लागलं.

आयओसीच्या इशाऱ्यानंतर आयओएनं आपल्या घटनेत आवश्यक बदल केले होते. त्यानुसार आता आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तींना आयओएच्या निवडणुकांपासून दूरच ठेवलं जाईल. येत्या नऊ फेब्रुवारीला आयओएनं निवडणुका घेण्याचं निश्चित केलं. आयओएनंलवकरात लवकर निवडणुका घेतल्या तर भारताचा ऑलिम्पिकमध्ये परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

—-

अॅथलेटिक्सला डोपिंगचा डाग

2013 साली पुण्यात आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. भारतानं या स्पर्धेत 17 पदकांसह सहावं स्थान मिळवलं.  भारतासाठी थाळीफेकीत विकास गौडानं आणि महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले संघानं सुवर्णपदक मिळवलं. मात्र इतर मोठ्यास्पर्धांमध्ये भारतीय अॅथलीट्सकडून निराशाच झाली. त्यात नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं केलेल्या तपासणीत राष्ट्रीय स्तरावरील 23 अॅथलीट्स दोषी आढळल्यानं भारताची पुन्हा नाचक्की झाली. मात्र ज्युनियर स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या युवाखेळाडूंची कामगिरी आश्वासक ठरली..

नेमबाजीत अचूक लक्ष्यवेध

2013 साली भारताच्या हीना सिद्धू, लज्जा गोस्वामी आणि राही सरनोबतनं अचूक लक्ष्यवेध साधला.

24 वर्षीय हीनानं नोव्हेंबर महिन्यात म्युनिकमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये 10 मीटर एयर पिस्टलचं सुवर्णपदक मिळवलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णपदक मिळवणारी हीना भारताची पहिलीच पिस्टल नेमबाज ठरली.

राही सरनोबतनं कोरियात झालेल्या विश्वचषकात स्पोर्टस पिस्टलचं सुवर्णपदक मिळवलं.

तर ग्रॅनडामध्ये झालेल्या विश्वचषखात लज्जा गोस्वामीनं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात रौप्यपदक मिळवलं.

भारताचा अव्वल ट्रॅप शूटर आणि माजी विश्वचषक विजेता रंजन सोढीला 2013 साली खेल रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं…

———

कुस्तीच्या आखाड्यात युवा पैलवानांची बाजी

मुंबईकर संदीप यादवनं 2013 साली जागतिक कुस्तीच्या आखाड्यात आपला ठसा उमटवला. हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत संदीपनं ग्रीको-रोमन कुस्तीच्या 66 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. ग्रीको-रोमन कुस्तीत भारताचं हे पहिलंचआंतरराष्ट्रीय पदक ठरलं.

फ्री-स्टाईल गटात ऑलिम्पिकवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त दुखापतींमुळे खेळू शकले नाही. मात्र दोघांच्या गैरहजेरीत भारताच्या युवा पैलवानांनी आपला ठसा उमटवला. अमित कुमारनं 55 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलं तर बजरंग कुमारनं 60 किलोवजनी गटात कांस्यपदक मिळवलं.

आता 2014 साली कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्सच्या आखाड्यात भारताच्या युवा पैलवानांकडून अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

——–

स्नूकरपटूंची चमकदार कामगिरी

भारताचा आघाडीचा स्नूकरपटू आदित्य मेहतानं 2013 साली वर्ल्ड गेम्समध्ये तिरंगा फडकवला.

वर्ल्ड गेम्स म्हणजे ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या खेळांची सर्वात मोठी स्पर्धा. 2013 सालच्या जुलै महिन्यात कोलंबियामध्ये झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये आदित्यनं सुवर्णपदक मिळवलं. वर्ल्ड गेम्सच्या तीन दशकांच्या इतिहासात भारताचं हे दुसरंच पदक आहे. 2013 साली पहिल्या इंडियन ओपनमध्ये आदित्यनं रौप्यपदक मिळवलं. तर महिलांमध्ये विद्या पिल्लै आणि अरांता सांचिसच्या जोडीनं आयर्लंडमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवलं.

—-

बॉक्सिंगमध्ये उलथापालथ

भारतीय बॉक्सिंगसाठी मात्र यंदाचं वर्ष निराशाजनक आणि धक्कादायक ठरलं. भारताचा ऑलिम्पिकवीर विजेंदर सिंगवर ड्रग्जच्या तस्करीचे आरोप लागले.

विजेन्दरच्या मित्राला पोलीसांनी ड्रग तस्करीप्रकरणी ताब्यात घेतलं आणि तपासादरम्यान विजेन्दरचं नाव समोर आल्यानं भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. मात्र नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं केलेल्या चाचणीत  विजेन्दर निर्दोष असल्याचं समोर आलंपोलीसांनीही त्याला क्लीन चिट दिली. हा सगळा प्रकार मागे टाकत विजेन्दरनं पुन्हा सराव सुरू केला. मात्र त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये यश मिळालं नाही.

भारताच्या युवा बॉक्सर्सनी मात्र चांगली कामगिरी बजावली. शिवा थापानं एशियन युथ चॅम्पियनशिपचं सुवर्णपदकही जिंकलं. मात्र भारतीय बॉक्सिंगमागचं संकट अजूनही संपलेलं नाही. 2012चं वर्ष सरता-सरता भारतीय बॉक्सिंग संघटना म्हणजे आयबीएफवरआंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना म्हणजे आयबानं बंदी घातली होती. जी अजूनही उठवण्यात आलेली नाही.  नव्या वर्षात बॉक्सिंगला लागलेलं हे ग्रहण सुटेल अशीच आशा.

——–

आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक

इंडियन प्रीमियर लीगसाठी वादविवाद नवे नाहीत. मात्र यंदा आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या खुलाशानं भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटर्स श्रीशांत अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलीसांनी 16 मे रोजी अटक केली. तीनही खेळाडूंचे फोन रेकॉर्डस आणि सामन्याचं फुटेज यांच्या आधारे तिघांना गजाआड करण्यात आलं. अकरा बुकींनाही पोलीसांनी ताब्यात घेतलं.दरम्यान मुंबई पोलीसांनी चेन्नई सुपर किंग्सचा टीम प्रिन्सिपल आणि बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पनला सट्टेबाजीप्रकरणी अटक केली. श्रीनिवासन यांच्या विरोधात सूर उमटू लागले. मात्र श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडूनयेण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही.

बीसीसीआयनं तिघा क्रिकेटर्सवर आजीवन बंदी घातली. मात्र आयपीएलची डागाळलेली प्रतिमा कशी सुधारणार हा प्रश्नच आहे.

टीम इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

धोनीच्या टीम इंडियानं 2013 साली वन डेच्या मैदानात एका शानदार विजयाची नोंद केली. भारतानं पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवलं. आयीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे अखेरचं पर्व होतं. जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात यजमानांवर थरारक विजय मिळवला. शिखर धवन आणि रवीन्द्र जाडेजा भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. धवनला मालिकावीराचा पुरस्कारदेण्यात आला. महिनाभर आधीच भारतीय क्रिकेट आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानं ढवळून निघालं होतं. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी ब्रिगेडच्या विजयानं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जखमांवर फुंकर घातली.

—-


 

थँक यू, सचिन..

2013 साली भारतीय क्रिकेटमधलं एक युग संपुष्टात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती जाहीर केली.

तब्बल चोवीस वर्ष क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिननं 2013मध्ये आपली बॅट म्यान करण्याचा निर्णय घेतला.

16 नोव्हेंबर 2013… मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळून सचिननं क्रिकेटच्यामैदानातून निरोप घेतला, तेव्हा चाहतेही भावनावश झाले…

अर्थात सचिनला लगेचच ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानं चाहत्यांनी आनंदही साजरा केला..

– जान्हवी मुळे

Advertisements