तब्बल २४ वर्ष २२ यार्डांच्या पिचवर एकाच माणसानं राज्य केलं…

त्यानं स्वप्नांचा यशस्वी पाठलाग केला…

धावांचे नवे उच्चांक गाठले… आणि फलंदाजीचं रुपच बदलून टाकलं

मास्टर ऑफ द गेम… गॉड ऑफ क्रिकेट… द लीजंड… आणि भारतरत्न… सचिन रमेश तेंडुलकर….

Sachin

एवढी सगळी नावं, विशेषणं, पुरस्कार याआधी कुठल्याच क्रिकेटरला मिळालेले नाहीत आणि यापुढेही कदाचित कुणालाच मिळणार नाहीत.

अनेक क्रिकेटर्स आले आणि गेले. काही दिग्गजांनी या खेळावर आपली छाप सोडली. डॉन ब्रॅडमन यांच्यापासून ते गॅरी सोबर्स, सुनील गावस्कर, विवियन रिचर्डसपर्यंत अनेकांनी आपल्या खेळानं लोकांना भुरळ पाडली. पण सचिननं चाहत्यांच्या मनावर केलेलं गारूड इतक्यात उतरणार नाही. त्याच्या निवृत्तीनंतरही नाही. कारण सचिननं केवळ खेळाच्या मैदानात नाही, तर लोकांच्या मनावरही दीर्घकाळ राज्य केलं आणि आपल्या प्रत्येक शॉटबरोबर लोकांना आनंद वाटत गेला.

त्याचीच प्रचिती सचिनच्या अखेरच्या कसोटीतही आली. एरवी भारताची विकेट पडल्यावर चुटपुटणाऱ्या चाहत्यांनी यावेळी मात्र आनंद साजरा केला आणि सचिन… सचिन… च्या जयघोषानं वानखेडे स्टेडियम डोक्यावर घेतलं.

निवृत्तीच्या वाटेवरील एखाद्या महान क्रिकेटरला प्रतिस्पर्ध्यांकडून दिला जातो, तसाच गार्ड ऑफ ऑनर वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सचिनला दिला आणि विशेष म्हणजे एरवी तटस्थ राहणा-या अंपायर्सनीही सचिनला मानवंदना दिली.. सचिनच्या प्रत्येक शॉटवर मिळणारी दाद, निसटत्या क्षणी हेलकावणारं हृदय. तो बाद झाल्यावरची निशब्द शांतता. टाळ्यांचा कडकडाट आणि मनात जाणवणारी पोकळी. फक्त वानखेडेवरच नाही तर जगभरातल्या सचिनच्या चाहत्यांची अशीच अवस्था होती.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजची शेवटची विकेट पडली, आणि चाहत्यांना जाणीव झाली. मास्टर ब्लास्टरची कारकीर्द आता संपली. त्यानंतर वानखेडेवर जे घडलं, ते फारच थोड्या भाग्यवान खेळाडूंच्या वाट्याला आलंय.टीममेट्सचं, चाहत्यांचं प्रेम पाहून सचिन भारावून गेला.. सनग्लासेसच्या आड अंजलीचे डोळेही पाणावले. आणि चाहतेही हेलावून गेले. हजारो डोळ्यांतून वाहणारे ते अश्रू दुःखाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते. फक्त वानखेडेवरच नाही तर जगभरातल्या सचिनच्या चाहत्यांची अशीच अवस्था होती. कारण तेही गेली चोवीस वर्ष सचिनच्या सोबतीनं एक स्वप्न जगत आले होते.

सचिन खेळू लागायचा, तेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटायचं… निदान भारतात तरी.. सचिन तेंडुलकर या नावाची जादूच तशी आहे. इतका आनंद सचिननं वाटला आहे.

सचिनचा खेळ बहरत गेला, त्याच काळात देशही बदलत गेला.. सर्वसामान्य भारतीयांना आसपासच्या बदलांचं प्रतिबिंब किंवा प्रतिक्रिया सचिनच्या खेळात दिसली, आणि म्हणूनच त्यांना तो जास्त जवळचा, आपला सचिन वाटला. भारतातच नाही, तर क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात सचिनप्रेमींचा पंथच उदयास आला.

सचिनमुळेच अनेक लोक क्रिकेटकडे वळले. सोळा वर्षांच्या कोवळ्या वयातल्या सचिननं एरवी स्वयंपाकघरातच राहणाऱ्या आणि क्रिकेटचा गंधही नसणाऱ्या मातांचं लक्ष वेधून घेतलं. एखाद्या आजीबाईंनाही गोड चेहेऱ्याच्या निरागस सचिनविषयी माया वाटू लागली. त्याआधीही भारतात महिला क्रिकेट पाहायच्या, खेळायच्या. पण सचिनबरोबर एका वेगळ्या युगाची सुरूवात झाली. एरवी पुरुषांचं वर्चस्व असणाऱा हा खेळ अनेक महिलांना, मुलींना सचिनमुळे आपलासा वाटू लागला.

सचिननं केवळ आनंदच वाटला नाही तर लोकांच्या मनात विश्वासही निर्माण केला. त्याच्या शतकावर फटाके फोडले जायचे.  भारताच्या विकेट्स पडल्या, तरी सचिन मैदानात आहे तोवर लोक निश्चिंत असायचे. आपण जिंकू शकतो, हा विश्वास सचिननं देशाला दिला. अगदी कारकीर्दीच्या सुरूवातीपासून.

सचिननं पाकिस्तानात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा मैदानातच नाही, मैदानाबाहेरही इतिहास कात टाकत होता. ते वर्षच बदलांचं होतं. १९८९ साली सचिननं पाकिस्तानचा मुकाबला केला, त्याच वर्षी बर्लिन भिंत कोसळली आणि जर्मनीचं एकीकरण झालं. चीनच्या बीजिंगमध्ये तियानानमेन चौकात हिंसाचारानं जग हादरून गेलं. भारतातही त्यानंतरच्या काही वर्षांत बरीच उलथापालथ घडली.. राजीव गांधींची हत्या, अधूनमधून उफाळणारे सांप्रदायिक वाद, नव्वदच्या दशकातल्या आर्थिक सुधारणा आणि आर्थिक मंदीचा काळ, मॅच फिक्सिंग प्रकरणं, कारगिल युद्ध, दहशतवादी हल्ले अशी अनेक वादळं भारतानं झेलली. अशा नाजूक काळात ज्या मोजक्या व्यक्तींनी देशाच्या आशा कायम जाग्या ठेवल्या, त्यात सचिन अग्रणी आहे. हीरोच्या शोधात असलेल्या देशाला सचिनच्या रुपानं नवा नायक मिळाला. अनेकदा त्याच्या खेळानं कठीण काळात देशाचं मनोबल उंचावलं. म्हणूनच क्रिकेट पिचवरचा हीरो भारताचा आयकॉन बनला.

सचिन अशा काळात खेळत होता, जेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या खेळाडूंनी खेळांच्या दुनियेत ठसा उमटवला होता. पण सचिननं आणि त्याच्या पिढीतल्या विश्वनाथन आनंद, लिअँडर पेस यांच्यासारख्या खेळाडूंनी देशाला एक नवा आत्मविश्वास दिला. आणि मग या शतकाच्या सुरूवातीपासून भारतीयांनी इतर खेळांमध्येही आपली ओळख निर्माण करायला सुरूवात केली. 

सचिनच्या बरोबरीनं देशातली अख्खी पिढी लहानाची मोठी झाली. डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर यांच्यासारखे क्रिकेटचे दिग्गज असोत किंवा राहुल द्रविड, सौरव गांगुली, मॅथ्यू हेडन, ब्रायन लारासारखे समकालीन खेळाडू या सर्वांनीच सचिनच्या महानतेवर शिक्कामोर्तब केलंय. वीरेन्द्र सहवाग, युवराज सिंग, विराट कोहली वाढले, ते सचिनलाच पाहात. म्हणूनच २०११ साली टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेटच्या या नव्या पिढीनं सचिनलाच खांद्यावर उचलून धरलं.

सचिनच्याच कारकीर्दीत क्रिकेट खऱ्या अर्थानं आधुनिक झालं. नवीन तंत्रज्ञान, वन डेची वाढती लोकप्रियता सचिनच्या खेळाला पूरक ठरली, आणि सचिनसारख्या आक्रमक फलंदाजांमुळे क्रिकेटलाही नवी संजीवनी मिळाली. टीव्हीच्या प्रसारामुळे सचिन घराघरात पोहोचला, सचिनची प्रतिमाही लार्जर दॅन लाईफ बनत गेली.

आधुनिक भारतात स्वातंत्र्यांनतरच्या काळात अनेकांनी आपल्या कर्तृत्त्वानं देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. पण अख्ख्या देशाच्या अस्मिता जागवणारा सचिनशिवाय दुसरा कुणीच नाही, ज्यानं सगळ्या जाती-धर्माच्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या राज्यांत राहणाऱ्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांना एकत्र आणलं असेल. त्यामुळेच सचिन खऱ्या अर्थानं भारतरत्न ठरलाय.

खरंतर महानतेचं कोणतही मोजमाप नसतं. कोणत्याही दोन खेळाडूंची तुलना करू नये असं म्हणतात. पण तरिही सचिनची महानता मोजायची, तर आता क्रिकेटचा मापदंडही छोटा ठरावा. सचिननं क्रिकेटच्या मर्यादा कधीच ओलांडल्या आहेत. फुटबॉलचा पेले, बॉक्सर मोहम्मद अली, बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन, फॉर्म्यला वन ड्रायव्हर मायकल शुमाकर, टेनिसमधले मार्टिना नावरातिलोव्हा आणि रॉजर फेडरर,  यांच्यासारख्या महानतम खेळाडूंच्या बरोबरीनंच सचिनचं नाव घेतलं जातं. त्यातल्याही अनेकांनी सचिनचं कौतुक करताना शब्द आखडते घेतलेले नाहीत…

या सर्व महानतम खेळाडूंचे काही गुण सचिनच्या स्वभावात ठळकपणे दिसून येतात. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सचिन, प्रसिद्धीच्या शिखरावरही पोहोचल्यावरही कायम राहिलेली त्याची विनम्रता, सामाजिक जाणीव हे सगळं मनाला भावणारं. गेली चोवीस वर्ष तो फक्त आनंद देत आला आहे. वादविवादांपासून सचिनही दूर नव्हता, पण जंटलमन या प्रतिमेला त्यानं तडा जाऊ दिला नाही. आणि म्हणूनच सचिन क्रिकेटचा आणि भारताचा सर्वात मोठा आयकॉन आहे. निवृत्तीनंतरही..

– जान्हवी मुळे

Advertisements