Yelena Isinbayeva

येलेना इसिनबायेव्हानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, की ती किती ग्रेट आहे..

रशियाच्या या बोल्ड ब्युटीनं तीच क्वीन ऑफ  पोल व्हॉल्ट असल्याचं पुन्हा सिद्ध केलं आहे.

बीजींग ऑलिम्पिकनंतर म्हणजे गेली पाच वर्ष येलेनाला आऊटडोर जागतिक स्पर्धा किंवा ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक जिंकता आलं नव्हतं. लंडन ऑलिम्पिकमध्ये तिला ब्राँझपदकावर समाधान मानावं लागलं. तर देगूमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ती चक्क सहाव्या स्थानावर फेकली गेली. पाच वर्ष जगज्जेतेपदापासून आता घरच्या मैदानात येलेनानं पुन्हा सोनं लुटलं.

येलेनानं ४.६५ वरून स्पर्धेत प्रवेश केला. आणि मग एकाच प्रयत्नात ४.७५चं अंतरही पार केलं. त्यामुळे अमेरिकन ऑलिम्पिक चॅम्पियन आणि येलानची मुख्य प्रतिस्पर्धी जेनिफर सुहरवर दबाव वाढला.

इसिनबायेव्हानं मग बार ४.८२वर नेला आणि ते अंतरही पार केलं. मग ४.८९ मीटरवर उडी मारली. जेनिफर सुहर आणि क्युबाची यारिस्ले सिल्वा यांनी ते अंतर पार करण्याचा एक एक प्रयत्न असफल ठरत गेला, इसिनबायेव्हाचं जेतेपद निश्चित होत गेलं.. येलेनानं कॅमेऱ्याला मिष्किल स्माईल दिलं.. मॉस्कोवासियांचा जल्लोष पाहून शीतयुद्धाच्या काळातल्या रशिया-अमेरिका संघर्षाचीच अनेकांना आठवण झाली असेल.. युक्रेनचा महान पोल व्हॉल्टर आणि सहावेळचा जगज्जेता सर्जी बुबकाही त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला.

येलेनाच्या खात्यात सुवर्ण जमा झालं होतं. मात्र तिनं तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. कधीकधी आयुष्यात ही असमाधानी वृत्ती माणसाला आणखी मोठं बनवते. येलेनाच्या बाबतीत तेच घडलं. सुवर्ण निश्चित झाल्यावर येलेनानं बार ५.०७ मीटरवर नेण्यास सांगितलं. आणि आपलाच ५.०६ मीटरचा विश्वविक्रम मोडण्याची इच्छा दाखवली..

 ४०० मीटर रेसची फायनल बाकी असल्यानं चाहत्यांची उत्कंठा काही काळ ताणली गेली. पण त्यानंतर येलेनाला मिळालेल्या रिसेप्शनचा अगदी उसेन बोल्टलाही हेवा वाटला असेल..  दुसऱ्या प्रयत्नात येलेना हा विक्रम मो़डण्याच्या अगदी जवळ गेली. मात्र थोडक्यात ती संधी तिच्या हातून गेली.

तिसरा प्रयत्नही असफल ठरल्यावरच येलेनानं हसऱ्या चेहऱ्यानं सुवर्णपदकाचं सेलिब्रेशन केलं. अंगावर रशियन ध्वज लपेटून ती प्रशिक्षक इवाजेनीय ट्रॉफिमोव्हकडे झेपावली.. स्पर्धेच्या मॅस्कॉटबरोबर आपल्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं.. यावेळी विश्वविक्रमाची संधी हुकली असली, तरी येलेनानं याआधी १७ वेळा आऊटडोअर आणि १३ वेळा इनडोअर अशा तब्बल ३० विश्वविक्रमांची नोंद केली आहे.

खेळाच्या मैदानात एखादा विश्वविक्रम रचणं सोपं नसतं.. एखादं तरी ऑलिम्पिक मेडल जिंकावं, एकदातरी विश्वविक्रमाला गवसणी घालावी, हे प्रत्येक अॅथलीटचं स्वप्न असतं. बहुतेकांची झेप तिथवर पोहोचत नाही. पण इसिनबायेव्हानं ही कामगिरी एकदा नाही, दोनदा नाही तर वारंवार करून दाखवली आहे.

येलेना केवळ महान पोल व्हॉल्टर नाही तर महानतम अॅथलीट्समध्येही तिचा समावेश केला जातो.. टेनिसमध्ये जे स्थान मार्टिना नावरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ आणि विल्यम्स भगिनींचं आहे, किंवा नादिया कोमेन्सी ही जशी जिम्नॅस्टिक्सची ओळख आहे, तसंच पोल व्हॉल्ट म्हणजे येलेना इसिनबायेव्हा हे जणू समीकरणच बनलं आहे.

पाच फूट साडेआठ इंचं उंची, काटक शरीरयष्टी, सुंदर चेहरा, मादक डोळे, म्हणजे येलेना… प्रचंड मेहनत, कमालीची एकाग्रता म्हणजे येलेना.. सतत नवी उंची गाठण्याची इच्छा म्हणजे येलेना..

येलेनाची कहाणी सुरू झाली रशियाच्या वोल्गोग्राड शहरात. इतिहासाची पानं चाळून पाहिलीत तर, या शहराचा रक्तरंजीत भूतकाळ समोर येईल. दुसऱ्या महायुद्धादरम्यान स्टालिनग्राड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या शहरात जर्मन आणि रशियन फौजांमधलं निर्णायक युद्ध झालं होतं, जे २०० दिवस चाललं. या हीरो सिटीनंच मग रशियाला अनेक अॅथलीट्स दिले. मैदानावरच्या त्या हीरोंमध्ये येलेना इसिंबाएव्हाचं नाव सर्वात आघाडीवर आहे.. 

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या येलेनाचे वडील व्यवसायानं प्लंबर तर आई एका दुकानात काम करायची. येलेना आणि तिच्या बहिणीसाठी दोघांनी अपार कष्ट घेतले आहेत. (अनेकांना माहित नाही, पण येलेनाचे वडील गाझी इसिनबायेव्ह हे मूळचे दाजेस्तानातल्या ताबासारान वंशाचे सुन्नी मुस्लीम तर आई रशियन आहे. )

शाळेत असताना येलेना जिम्नॅस्टिक्सचा सराव करायची. पण तिच्या उंचीमुळे स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये अडचणी येऊ लागल्यावर येलेना वयाच्या पंधराव्या वर्षी पोल व्हॉल्टकडे वळली. त्यानंतर सहाच महिन्यांत, आपल्या तिसऱ्याच स्पर्धेत म्हणजे १९९८च्या यूथ गेम्समध्ये तिनं पहिलं जेतेपद मिळवलं.आणि त्यानंतर मग मागे वळून पाहिलंच नाही.

अथेन्स आणि बीजींग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, २००५ आणि २००७ साली जागतिक अॅथलेटिक्सचं सुवर्ण, २००४, २००६, २००८ आणि २०१२ साली जागतिक इनडोअर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक, २००६ साली वर्ल्ड कपचं सुवर्ण, आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स फायनलमध्ये २००४ ते २००९ या काळात पाच सुवर्णपदकं.. येलेनाच्या जेतेपदांची गणती करताना दमछाकच व्हायची,

जिम्नॅस्टिक्समुळे लवचिक झालेलं शरीर, जबरदस्त तंत्र, ताकद आणि स्किल्सचा समन्वय.. ही येलेनाच्या यशाची वैशिष्ट्य. प्रत्येक व्हॉल्टआधी ती आपल्या पोलशी बातचीत करताना दिसते. तिची स्टाईल आणि लूक्स पाहता फॅशन जगताचा तिच्याभोवती गरडा पडला नसता तरंच नवल. पण त्या गराड्यातही येलेनानं आपलं ध्येय कायम ठेवलं. सतत उंचावर जाण्याचं ध्येय..

पोल व्हॉल्टमध्ये ५ मीटरवर उडी मारणारी ती पहिलीच महिला ठरली. २००५च्या लंडन ग्रांप्रीमध्ये येलेनानं हा विक्रम केला होता आणि आजवर केवळ जेनिफर सुहरलाच तेवढी उंच झेप घेता आली आहे. तीही केवळ एकदाच.

३१ वर्षीय येलेना एवढ्यात थांबणार नाहीए, हे मॉस्कोतील जागतिक स्पर्धेनं सिद्ध केलं आहे. येलेनानं आता ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. ती संसार थाटण्याच्या विचारात आहे, तिला आई व्हायचं आहे.. मात्र ब्राझिलच्या रिओमध्ये २०१६ साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तिची इच्छा आहे.

पोल व्हॉल्टिंगला मोठा इतिहास असला, तरी या खेळात महिलांचा सहभाग जरा उशीरानंच झाला. पण इसिंबाएव्हाच्या रूपानं या खेळाला एक नायिका मिळाली आणि पोल व्ह़ॉल्टच्या लोकप्रियतेत वाढ झाली. येलेना पोल व्हॉल्टचाच नाही तर महिला अॅथलेटिक्सचाही चेहरा बनली आहे आणि जगभरातील महिलांसाठी एक प्रेरणास्थानही…

– जान्हवी मुळे, एबीपी माझा

Advertisements