इम्रान खान…

पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर..

जगातल्या ग्रेटेस्ट ऑलराऊंडर्सपैकी एक..

पाकिस्तानला विश्वविजय मिळवून देणारा कर्णधार..

आणि शेकडो महिलांचा हार्टथ्रोब…

क्रिकेटविश्वात इम्रान खानची हीच ओळख आहे.. पण त्याच इम्राननं राजकारणाच्या मैदानातही आपली इनिंग उभारायला सुरूवात केली आहे.

इम्रानच्या प्रेरणेनं आज पाकिस्तानात बदलाचे वारे वाहतायत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्याच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षानं दुसरं स्थान मिळवलं आहे. इम्रानच्या हाकेला पाकिस्तानच्या जनतेनं साद दिली आणि या ऐतिहासिक निवडणुकांमध्ये पाकिस्तानातील मतदानाचा उच्चांक गाठला गेला. मतांच्या सुनामीवर स्वार होत पाकिस्तानचं पंतप्रधानपद जिंकण्याचं इम्रानचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. मात्र खैबर पख्तुंख्वा या प्रांतात त्याचा पक्ष सत्तेवर आला आहे. तसंच तेहरीक ए इन्साफ हा पाक संसदेच्या खालच्या सभागृहात म्हणजे नॅशनल असेंब्लीमध्ये मुख्य विरोधी पक्ष ठरला आहे.

एक क्रिकेटर ते यशस्वी राजकारणी हा इम्रानचा प्रवास थक्क कऱणारा आहे..

क्रिकेटर ते राजकारणीimran

इम्रानमधल्या नेतृत्त्वगुणांची पहिली झलक क्रिकेटच्या मैदानातच पाहायला मिळाली. एक कर्णधार या नात्यानं इम्राननं पाकिस्तानला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. पाकिस्तानच्या संघावर इम्रानचा जबरदस्त वचक होता.

आपल्या कारकीर्दीत इम्राननं 88 कसोटी सामन्यांत 3,807 धावा केल्या आणि 362 विकेट्स काढल्या. तर वन डेत 175 सामन्यांत त्याच्या नावावर 3,709 धावा आणि 182 विकेट्स जमा आहेत.

कर्णधार म्हणून इम्रानचं सर्वात मोठं यश ठरलं १९९२च्या विश्वचषकाचं जेतेपद.. वयाच्या ३९व्या वर्षी इम्राननं पाकिस्तानच्या युवा संघाला विश्व-विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. त्या स्पर्धेत इम्रानचा आवेश एका कर्णधारापेक्षाही एका नेत्याला साजेसाच होता.

विश्वचषकानंतर इम्राननं क्रिकेटला अलविदा केलं. इम्राननं मग समाजकारणात प्रवेश केला. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यानं कॅन्सर पेशंट्ससाठी पाकिस्तानात शौकत खानुम मेमोरियल हॉस्पिटलची स्थापना केली जिथे गरिबांना फुकट उपचारांची सोय केली. मियांवाली या मूळगावी कॉलेजही उभारलं

१९९६ साली त्यानं पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ म्हणजे न्यायाची चळवळ या मोहिमेची स्थापना केली. १९९९ साली याच मोहिमेचं राजकीय पक्षात रुपांतर झालं. पक्षाचं चिन्ह – क्रिकेटची बॅट.. २००२ च्या निवडणुकीत इम्रान या पक्षातर्फे नॅशनल असेंब्लीवर निवडून आला. भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या विरोधात तेहरिक ए इन्साफनं २००८च्या निवडणुकांवर बहिष्कार घातला पण २०१३मध्ये चमत्कार घडवला.

पाकिस्तानातल्या भ्रष्टाचार आणि अस्थिरतेला कंटाळलेल्या लोकांना इम्रानच्या व्यक्तिमत्त्वानं आणि विचारसरणीनं आकर्षित करून घेतलं, इंटरनेटच्या वापरामुळे तरुण पिढीवर त्याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळतो.

क्रिकेटचं वलय, बुलेटप्रुफ काचेऐवजी थेट जनतेशी संवाद, युद्धाला विरोध अमेरिकेवर टीका आणि अमेरिकेच्या ड्रोन मिसाईल हल्ल्यांविरुद्ध आवाज याचा इम्रानला निवडणूकीत फायदा झाला.

निवडणूक तोंडावर आली असताना प्रचारादरम्यान इम्रानला अपघात झाला, एका रॅलीत १४ फुटांवरील स्टेजपर्यंत नेणारी लिफ्ट तुटल्यानं त्याच्या मणक्यास फ्रॅक्चर झालं, पण मोडून पडला कणा, तरी विश्वास कायम आहे अशा निर्धारानं त्यानं हॉस्पिटलच्या बेडवरूनच जनतेला संबोधित केलं आणि अपेक्षित नाही पण ठळक यशाची नोंद केली.

अर्थात इम्रानच्या रणनीतीविषयी संदिग्धता कायम आहे. त्याच्यावर पाकिस्तानातल्या तालिबानना झुकतं माप दिल्याचा आणि महिलांच्या अधिकारांविषयी ठळक भूमिका घेत नसल्याचा आरोप कायम होतो. नया पाकिस्तानचं स्वप्न दाखवत इम्राननं ही निवडणूक लढवली.

आता संसदेत विरोधक आणि पाकिस्तानात एका प्रांतात सत्ताधारी अशी भूमिका त्याला सांभाळायची आहे. निवडणूका आणि प्रत्यक्ष कारभारात जमीनअस्मानाचं अंतर असतं. पण एका विखुरलेल्या देशाच्या क्रिकेट संघाला एकत्र आणणारा हा कर्णधार राजकारणाच्या पिचवर काय करतो, याकडे क्रिकेटविश्वाचंही लक्ष राहील..

जान्हवी मुळे, एबीपी माझा.

Advertisements