दुष्काळाविषयी बोलताना मी मैदानांना पाणी बंद करणं चुकीचं ठरेल असं मत मांडलं. त्यावरून एक तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. ‘तुम्ही मुंबईकर, तुम्हाला दुष्काळ काय माहित?’

खरं सांगायचं तर मी मूळची मुंबईकर नाही. आमच्या कर्जतमध्येही पाण्याचा मोठा प्रश्न होता. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण अशी परिस्थिती असायची. नगरपालिकेचं पाणी यायचं, पण ते कधीच पिण्यायोग्य नसायचं. कर्जतला पूर्वी पळसदरीच्या तळ्यातून पाणीपुरवठा व्हायचा, जे ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलं होतं. टेकडीवर पाण्याची टाकीही बरीच जुनी. गाव वाढून शहर झालं, पण Two days, two storiesपाण्याची सोय केलेली नव्हती. म्हणजे काही योजना कागदावर पडून होत्या. पण त्या अंमलात कधी येणार याची कर्जतकर वाट पाहायचे. गावात विहिरींमुळे पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती.

पण घरं, वाडे पाडून मोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या, तसं विहिरी बुजवून बोअरवेची संख्या वाढली. आणि विहीरींचे झरेही त्यामुळे आटू लागले. साधारण १५-१६ वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रश्नाची झळ विहिरीवाल्या घरांनाही बसू लागली.  झाडांसाठी, साफसफाईसाठी नगरपालिकेचं पाणी वापरलं जायचं. पण पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवणं जिकीरीचं बनलं. आमच्या घरी तर गाई-गुरं आणि पाहुण्यांचाही राबता असायचा. शेजार-पाजारचेही विहिरीवरून पाणी न्यायला यायचे उन्हाळ्यात. विहिरीचा केवळ एकच झरा मोकळा होता. बाकी आटलेले.

तास- दोन तास वाट पाहिल्यावर विहिरीत बादलीभर पाणी साठायचं, तेच काढून पिण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरलं जायचं. अनेकदा पाण्यावर लक्ष ठेवायचं, ते काढायचं काम मीही केलं आहे. टँकरनं आलेल्या पाण्यासाठी उडणारी धांदल मलाही माहित आहे. पाण्याअभावी सुकणारी झाडं, तळमळणारी जनावरं पाहिली आहेत. आजोळी नागावला गेल्यावर तर डोक्यावर हंडा-कळशी घेऊन खेपा घालाव्या लागायच्या.

शेतावरची परिस्थिती तर आणखी बिकट. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणा-या मोरबे डॅमपासून हाकेच्या अंतरावर असणारा हा प्रदेश, पण लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल चालताना पाहायचे. आजही काही आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचा नळ नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही.

अर्थात आज तुम्ही कर्जत शहरात आलात तर चित्र बरंच बदललं आहे. आज पाणीटंचाई जणू उरलेलीच नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना अखेर अस्तित्वात आली आहे. पेज नदीचं पाणी मोठ्या टाकीत साठवून वर्षभर पुरवलं जातं.

ही परिस्थिती पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, पाण्याचा प्रश्न टंचाईमुळे नाही, तर नियोजनातल्या अभावामुळेच निर्माण झाला आहे. पाण्याची साठवण, पुरवठा करणारी सक्षम व्यवस्था असेल तर दुष्काळाची झळ कमी करता येऊ शकते. यंदाचे दोन महिने काढणं कठीण जाईल, पण पुन्हा अशी स्थिती येऊ द्यायची नसेल, तर आतापासूनच विचार करायला हवा.  किमान कर्जतसारख्या भागात जिथे पाऊस मेहेरबान आहे, तिथे पाण्याचं योग्य नियोजन व्हायलाच हवं. केवळ धरणं बांधून हा प्रश्न सुटणार नाही, हे मराठवाड्यात सिद्ध झालं आहेच.

 

 

Advertisements