महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचा थेंब आणि थेंब जपून वापरण्याची वेळ मराठवाड्यात आली आहे. लोक पाण्यासाठी जीव धोक्यात टाकताना दिसतायत. अशात आयपीएलवर पाणी वाया घालवायचं का, असा प्रश्न लोक विचारतायत.

Cricket Groundराज्यात मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स या आयपीएलच्या दोन संघाचे मिळून एकूण १६ सामने खेळले जातील. वानखेडे स्टेडियम आणि गहुंज्याच्या स्टेडियममध्ये या सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. आयपीएलदरम्यान या स्टेडियम्सच्या देखभालीसाठी आठवड्याला आठ लाख लीटर पाणी लागेल. म्हणजे आयपीएलच्या काळात ४८ लाख लीटर पाण्याचा वापर होईल, यावरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

लोकांच्या आयपीएलविरोधातल्या भावना तीव्र होतायत. पण मैदानांची पाण्याची गरज केवळ आयपीएलपुरती मर्यादित नाही. टेस्ट मॅचेस, रणजी मॅचेस, इतर सामन्यांसाठीही मैदानाची निगराणी गरजेची आहे.. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सेंटर हा लौकिक कायम ठेवायचा असेल, तर ग्राऊंडची देखभाल करणं आवश्यक आहे,

जाणकारांचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रात पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर बाकी आठ महिन्यांमध्ये ग्राऊंडच्या निगराणीसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते.

त्यासाठी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर टँकरनं पाणी आणलं जातं. साधारणपणे दिवसाला १० हजार लीटरचा एक टँकर अशा चार टँकर्सची गरज भासते. पण कोणत्याही स्पर्धेच्या आठवडाभर आधीपासून दरदिवशी ५ ते ६ टँकर पाणी वापरावं लागतं. म्हणजे दिवसभरात ५० हजार लीटर. स्पर्धेदरम्यान सामन्याच्या दिवसाचा अपवाद वगळला, तर मैदानावरील गवताला पाणी देणं गरजेचं आहे.

मुंबईत मैदानांसाठी पिण्याचं पाणी किंवा बीएमसीचं पाणी वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे हे पाणी दक्षिण मुंबईतल्या विहीरींमधून भाड्यानं आणलं जातं, अशी माहिती आहे. एरवी या विहिरींचं पाणी पिण्यासाठी नाही, तर सोसायटीजमध्ये टॉयलेटमध्ये वापरलं जातं.

पाण्याच्या अशा एका टँकरची किंमत साधारण ७०० रुपयांपासून सुरू होते. तसं आयपीएलदरम्यान फ्रँचायझी आपल्या यजमान स्टेडियमच्या असोसिएशनला प्रत्येक मॅचसाठी तीस लाख रुपये देते. म्हणजे आयपीएलच्या आठ सामन्यांदरमम्यान मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला २ कोटी  ४० लाख रुपये देते. याच पैशातून सामन्यांचं नियोजन केलं जातं.

खरंतर आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते. त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरता येईल. अर्थात सध्या मराठवाड्याला पैशाची नाही, तर पाण्याची गरज आहे. तसंच मुंबई किंवा इतर शहरांमधलं पाणी मराठवाड्याकडे वळवणं, हा या समस्येवरचा कायमचा तोडगा ठरू शकत नाही. त्यासाठी पाण्याची साठवण आणि संवर्धन करावं लागेल.

राज्यात दुष्काळ आहे, आणि मैदानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे वास्तव आहे. या विसंगतीवर मार्ग काढणं बीसीसीआयला शक्य आहे, कारण त्यासाठी आवश्यक पाठबळ बोर्डाकडे आहे.

मैदानं, बगीचे ही शहराची फुफ्फुसं म्हणून ओळकली जातात. त्यामुळेच मैदानांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करणं हाच एक पर्याय ठरू शकतो. ब्रिस्बेनंच गाबा स्टेडियम, बार्बाडोसचं केन्सिंग्टन ओव्हल आणि इंग्लंडच्या अनेक कौंटी क्लब्जमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबवण्यात आली आहे. शेजारच्या कर्नाटकात आणि गुजरातमधील काही नव्या स्टेडियम्समध्येही रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्याद्वारा मैदानात आणि स्टेडियमच्या छतावर पावसाचं पाणी साठवून पुढे अनेक महिने मैदानांसाठी वापरता येईल.

– जान्हवी मुळे

( http://abpmajha.newsbullet.in/ वरही प्रसिद्ध )

Advertisements