दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलावर गेली चौदा वर्ष अनभिषिक्त सत्ता गाजवणारे राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेझ यांचं मंगळवारी निधन झालं. ५८ वर्षांचे शावेझ गेली दोन वर्ष कॅन्सरशी झुंज देत होते.

डॅशिंग, कलरफुल, काहीसा विक्षिप्त, वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय.. ह्युगो शावेझ यांचं वर्णन याच शब्दात करावं लागेल.

Hugo Chavez

Hugo Chavez

जग शावेझ यांना ओळखतं ते व्हेनेझुएलाचा ५६वा राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेला पुरून उरलेला नेता म्हणून. २००६ साली संयुक्त राष्ट्रांच्या सभेत बोलताना शावेझ यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना थेट सैतानाची उपमा दिली. त्यामुळेच समाजवादी आणि अमेरिकाविरोधी इस्लामिक राष्ट्रांत, खास करून इराणमध्ये त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.

शावेझ यांनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून दक्षिण अमेरिकेत समाजवादाचा पुरस्कार केला. आणि त्याच अमेरिकेशी व्यापारही वाढवला.

तेलानं संपन्न असलेल्या व्हेनेझुएलात शावेझ यांनी उद्योगांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि देशाला विकासाच्या वाटेवर आणलं. तसंच दक्षिण अमेरिकेतील देशांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. क्युबाच्या फिडेल आणि राऊल कॅस्ट्रोबरोबर शावेझ यांची खास मैत्री होती.

शावेझ यांचा जन्म एका सामान्य घरात झाला होता. पुढे पॅरा-ट्रूपर म्हणून त्यांनी सैन्यात काम केल. १९९२ साली त्यांनी लष्करी उठावाचं नेतृत्व केलं, पण तो अपयशी ठरला. शावेझनी पुढे युनायटेड सोशलिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएलाची स्थापना करत निवडणूक लढवली आणि सत्ताही मिळवली. तेव्हापासून चौदा वर्ष व्हेनेझुएलात त्यांची अनभिषिक्त सत्ता होती.

शावेझ यांचं व्यक्तिमत्व हाही अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. व्हेनेझुएलात जवळपास रोज शावेझ तासंतास टीव्हीवर भाषणं देताना दिसायचे. आठवड्यातून एकदा ‘हलो प्रेसिडेंट’ हा टीव्ही शो असो किंवा संयुक्त राष्ट्रांचा मंच, शावेझची रॉकस्टारसारखी अदाकारी लक्षात राहायची.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या बदल्यात आपल्याला हवं ते करून घेता येऊ शकतं, हे शावेझनी ताडलं होतं, आणि त्याचा वेळोवेळी पुरेपूर वापरही करून घेतला. विरोधकांना दडपून टाकण्याची नीती, समाजवाद आणि एकाधिकारशाही गाजवणारे शावेझ हुकूमशहापेक्षा कमी नव्हते. मात्र व्हेनेझुएलात तेवढेच लोकप्रियही होते.

शावेझ यांची जागा कोण घेणार, यावर व्हेनेझुएलातला समाजवाद, दक्षिण अमेरिकेतलं अर्थकारण आणि पर्यायानं जगाचा व्यापारही अवलंबून आहे. व्हेनेझुएलाच्या संविधानानुसार आता पुढील तीस दिवसांत अध्यक्षपदाची निवडणूक होणं गरजेचं आहे. अर्थात आपला उत्तराधिकारी म्हणून शावेझ यांनी निकोलस मदुरो यांची आधीच निवड केली आहे. एकेकाळी बस ड्रायव्हर असणारे मदुरो शावेझ यांच्यासारखेच समाजवादी विचारसरणीचे आहेत आणि विशेष म्हणजे सत्यसाईबाबांचे भक्त आहेत.

– जान्हवी मुळे

Advertisements