व्हॅलेन्टाईन डेला ऑस्कर पिस्टोरियसनं केलेल्या गोळीबारात, त्याची प्रेयसी आणि दक्षिण आफ्रिकेची नामवंत मॉडेल रीव्हा स्टीनकॅम्पचा मृत्यू झाला. त्याच गोळीबारात पिस्टोरियसची लोकांमधली प्रतिमा आणि त्याचं हीरोपण यांचाही अंत झाला.

Pistorius in Tears

Pistorius in Tears

पोलिसांच्या ताब्यात चेहरा झाकलेला ऑस्कर… कोर्टरूममध्ये आरोपपत्र वाचून दाखवलं जात असताना ढसाढसा रडणारा ऑस्कर… पिस्टोरियसचं हे रूप पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ज्या पिस्टोरियसला ते ओळखतात, तो हाच आहे का, असा प्रश्नही पडला.

जगभरात ऑस्करची ओळख आहे, कृत्रिम पायांनी धावून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला अॅथलीट म्हणून. एक असा नायक ज्याच्या आकांक्षांना त्याचं अपंगत्वही रोखू शकलं नाही…. जन्मतः दोन्ही पायांनी अधू असूनही ऑस्करनं खेळाची वाट निवडली, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आणि ब्लेड रनर म्हणून नावलौकिक मिळवला… मग इतर सशक्त धावपटूंसह ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून इतिहासही रचला.

2004 साली अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये ऑस्करनं १०० मीटर्स शर्यतीत ब्राँझ आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली

मग २००८ सालच्या बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये ऑस्कर १००, २०० आणि ४०० मीटर्स शर्यतीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

तर २०१२ साली लंडन पॅरालिम्पिकमध्ये त्यानं २०० मीटर्सचं रौप्य, ४०० मीटर्सचं सुवर्ण आणि १०० मीटर्स रिलेचं सुवर्णपदक पटकावलं.

त्याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये ऑस्कर ४०० मीटर्स आणि ४०० मीटर्स रिले शर्यतीसाठी पात्र ठरला होता. ऑस्करनं ४०० मीटर्स शर्यतीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली होती.

ऑस्करची हीच कामगिरी लक्षात घेऊन टाईम मॅगझिननं शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ऑस्करचा समावेश केला होता.

तोच ऑस्कर आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. ऑस्करनं जे केलं, किंवा त्याच्या हातून जे घडलं, तो गुन्हा होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. पण ऑस्करच्या आयुष्यात आलेल्या या वादळानं पुन्हा एकदा एका स्पोर्टस आयकॉनला नायक नाही, तर खलनायक ठरवलं आहे….

ऑस्करच्या अटकेनंतर आता त्याच्या व्यक्तीमत्त्वाला दुसरी बाजू असल्याची चर्चा होते आहे. ऑस्करच्या गर्लफ्रेण्डस, त्याचं गाड्यांवरचं प्रेम, भरधाव वेगानं ड्रायव्हिंग करण्याचा बेदरकारपणा, सगळ्याविषयी लोक बोलू लागले आहेत.

याआधीही पिस्टोरियस अडचणीत आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी याआधीही अशा घटना घडल्या आहेत, जेव्हा पोलिसांना मधे पडावं लागलं.

२००९ साली जोहान्सबर्गच्या वाल नदीत पिस्टोरियसच्या बोटीला अपघात झाला होता. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी एका महिलेला त्याच्या घराबाहेर हाकलल्याप्रकरणी अटक केली, पण त्याच्यावरचे आरोप नंतर मागे घेण्यात आले. आणि आता थेट प्रेयसीच्या हत्येचा आरोप पिस्टोरियसवर ठेवण्यात आला आहे.

संरक्षणासाठी पिस्टोरियस नेहमी हत्यार जवळ बाळगायचा, झोपताना डोक्याशी पिस्टल ठेवायचा. दक्षिण आफ्रिकेतलं गुन्हेगारीचं प्रमाण पाहता लोकांना त्यात काही वावगं वाटणार नाही. पण आता ह्याच संदर्भाला एक वेगळा अर्थ मिळाला आहे.

पिस्टोरियसला पाहिल्यावर कोण होतास तू, काय झालास तू, असा विचार मनात येऊ शकतो. पण या घटनेनं इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पिस्टोरियसनं असं का केलं?  पिस्टोरियसच्या व्यक्तीमत्त्वाला एक दुसरी काळी बाजू आहे का? आणि मैदानातल्या हीरोजवर किती विश्वास टाकायचा?

खेळाच्या मैदानातला देव मातीच्या पायाचा निघण्याची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकन सायकलिस्ट लान्स आर्मस्ट्राँगनं डोपिंग केल्याचा खुलासा झाला होता, आर्मस्ट्राँगनं त्यानंतर डोपिंगची कबुलीही दिली. त्याआधी अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्सच्या रंगेल कहाण्या उघड झाल्यावरही चाहत्यांना धक्का बसला होता. हॅन्सी क्रोनिएनं फिक्सिंगची कबुली दिल्यावर क्रिकेट विश्वही असंच हादरून गेलं होतं.

इतरही अनेक उदाहरणं देता येतील- कुणी खेळात चीटिंग केली, तर कुणाचा पाय मैदानाबाहेर घसरला.

जगात कोणतीही गोष्ट घडणं अशक्य नाही, समोरची व्यक्ती तुमचे सगळे अंदाज तोडू शकते, हे ऑस्करनंच सिद्ध केलं होतं. आता तीच गोष्ट पुन्हा ऑस्करलाच लागू पडते.

पिस्टोरियसनं मैदानात यश मिळवलं, आणि त्याच्या कहाणीनं सर्वांना अचंबित केलं. पण मैदानाबाहेर या कहाणीनं कोणती वळणं घेतली आहेत, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. त्यामुळे ऑस्करविषयी इतक्यात कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण काही अपवाद वगळले तर खेळाच्या मैदानातलं व्यक्तीमत्त्व, यशस्वी खेळाडूंची चाहत्यांमधली प्रतिमा आणि आपल्य़ा हीरोजचं प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्य वेगळं असू शकतं, हे मात्र सिद्ध झालं आहे.

– जान्हवी मुळे

Advertisements