व्हिक्टोरिया अझारेन्का, चॅम्पियन, ऑस्ट्रेलियन ओपन २०१३

ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी पुन्हा एकदा व्हिक्टोरिया अझारेन्काच्या हाती विसावली.

पण अव्वल मानांकित अझारेन्कासाठी हा विजय सोपा नव्हता. कारण सामना सुरू होण्याआधीपासून ऑस्ट्रेलियन चाहते अझारेन्काच्या विरोधात होते. सेमी फायनलच्या लढतीत अमेरिकेच्या स्लोआन स्टीफन्सविरुद्ध पाच मॅच पॉइण्टस गमावल्यावर अझारेन्कानं दुखापतीवर उपचारासाठी वेळ घेतला. तिचा तो निर्णय म्हणजे अनेकांना खिलाडूवृत्तीचा भंग वाटला. त्यात अंतिम फेरीत तिच्यासमोर आव्हान होतं चाहत्यांच्या लाडक्या ली नाचं. रॉड लेव्हर अरेनामध्ये अंतिम सामन्यादरम्यान लीलाही दुखापत झाली. मात्र तिनं तब्बल दोन तास चाळीस मिनिटं लढत दिली.

Vika 1

अखेर अझारेन्कानं लीवर 4-6, 6-4, 6-3 अशा विजयाची नोंद केली. आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. महिला टेनिसमध्ये अझारेन्काचं अव्वल स्थानही आता कायम राहणार आहे.

 

गेल्यावर्षी याच टेनिस कोर्टवर मारिया शारापोव्हाला हरवत अझारेन्कानं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं होतं. बेलारूसच्या या टेनिसस्टारनं सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी उचलून महिला टेनिसमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलंय…

तेवीस वर्षीय अझारेन्का खऱ्या अर्थानं टेनिसच्या नव्या पिढीची नायिका आहे. टेनिस कोर्टवरचा चपळ वावर, पॉवरफुल शॉट्स आणि बॅकहॅण्डचा चपखल वापर, ही तिच्या खेळाची वैशिष्ट्य. अझारेन्कामध्ये जिंकण्याची ईर्षा, जिद्द, एकाग्रता आणि संयमाचाही मेळ दिसून येतो.

पण कोर्टबाहेर मात्र व्हिका मनमोकळी म्हणून प्रसिद्धंय. अझारेन्काच्या मोकळ्या स्वभावानं ऑस्ट्रेलियन टेनिस चाहत्यांची नाराजीही दूर केली आहे. अझारेन्कापुढे आता पुढचं आव्हान असेल ते मोसमातल्या बाकीच्या ग्रँडस्लॅममध्येही आपला दबदबा कायम राखण्याचं.

——-

नोवाक जोकोविच, द ग्रेटेस्ट….

होय, द ग्रेटेस्ट… जोकोविच आता महानतम टेनिसपटूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे. कारण कुणाला सहजासहजं न जमणारी
djokoजोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदांची हॅटट्रीक साजरी केली आहे. एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत जेतेपदांची हॅटट्रीक करणारा जोकोविच ओपन इरामधला केवळ आठवा टेनिसपटू. ओपन इरामध्ये म्हणजे 1968नंतर केवळ बियाँ बोर्ग, इव्हान लेण्डल, जॉन मॅकेन्रो, पीट सॅम्प्रस, रॉजर फेडरर आणि राफेल नदालनंच सलग तीन वर्ष एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये जेतेपद मिळवलं.. पण त्यापैकी कुणालाही सलग तीनदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आलं नाही. जोकोविचनं ती किमया करून दाखवली आहे.गोष्ट जोकोविचनं साध्य करून दाखवली आहे.

२००८ मध्ये नोवाकनं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं होतं. २०११पासून या स्पर्धेवर त्याचंच वर्चस्व आहे. तसंच नोवाकचं हे कारकीर्दीतलं सहावं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

नोवाकनं हा ऐतिहासिक विजय साजरा केला, तो ब्रिटनच्या अँडी मरेला हरवून. रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मरेनं खरंतर पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. मात्र जोकोविचनं दुसरा सेट जिंकत कमबॅक केलं. तीन तास चाळीस मिनिटांच्या लढाईनंतर जोकोविचनं 6-7 ,7-6, 6-3, 6-2 असा विजय मिळवला.

या विजयानं जोकोविच आणि मरेमधल्या रायव्हलरीतही नवा रंग भरला आहे. गेल्या वर्षी जोकोविचलाच हरवत मरेनं यूएस ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. त्याच पराभवाची परतफेड जोकोविचनं मेलबर्नमध्ये केली.. आता जोकोविचसमोर पुढचं लक्ष्य आहे, ते फ्रेन्च ओपनचं जेतेपद. कारण नोवाकच्या कपाटात तेवढ्या एकाच ट्रॉफीची उणीव आहे.

– जान्हवी मुळे

Advertisements