चार वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेनं मतदान केलं, तेव्हा अख्खं जग उत्सुकतेनं पाहात होतं.

शिकागोच्या  एका सीनेटरनं सगळ्या जगाला प्रभावित केलं होतं. एका काहीशा विचित्र नावाचा वक्ता-  बराक ओबामा- शांतीचा दूत वाटू लागला. आणि म्हणूनच निवडणुका जरी अमेरिकेत होत्या, तरी जगभरात अनेक ठिकाणी लोक ओबामांच्या विजयासाठी, प्रसार, प्रचार आणि प्रार्थना करताना दिसले.
चार वर्षांनंतर खरी परिस्थिती तपासून पाहण्याची वेळ आली आहे. जगाला अजूनही ओबामा हवे आहेत. पण अमेरिकेचं काय? तिथल्या सर्वसामान्य माणसांचं काय? लवकरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

तसं कोणत्याही देशातील परिस्थितीचा अंदाज कधीच देशाबाहेरून लावता येत नाही. पण इंटरनेटवरच्या

 

प्रतिक्रिया आणि जाणकारांची मतं लक्षात घेता, याही निवडणुकीत दोनच मुद्दे महत्त्वाचे ठरतील. युद्ध आणि अर्थव्यवस्था.

तसं चार वर्षांमध्ये बरंच बदललं आहे, आणि बरंच काही, जैसे थे आहे.

चार वर्षांपूर्वी जेव्हा ओबामांनी निवडणुका जिंकल्या, तेव्हा अफगाणिस्तानात सुमारे ३४ हजार अमेरिकी सैनिक तैनात होते. ओबमांच्या काळात त्यात आणखी सुमारे ६६ हजारांची भर पडली.. . म्हणजे एकट्या अफगाणिस्ताना गेल्या वर्षीपर्यंत सुमारे

 

लाखभर अमेरिकन सैनिक होते.‘  मिलिटरी   सर्ज ‘ म्हणजे एकाच वेळी मोठ्य़ा संख्येनं सैन्य पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची ही योजना, पण त्यानं फार काही साध्य झालेलं नाही. अमेरिकेनं आता आपलं सैन्य हळूहळू मागे घेण्य़ास सुरूवात केली आहे. मात्र आजही हा आकडा ६८ हजारांच्या आसपास आहे. दशकभराच्या युद्धात अफगाणिस्तानात २ हजार अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत. इराकमधलं युद्ध संपल्याचं जाहीर करण्यात आलं असलं, तरी तिथेही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. ओबामा सत्तेत आले, तेव्हा दोन देशांमध्ये अमेरिकन सैन्य युद्ध लढत होतं. ओबामांच्या  काळात लिबिया आणि येमेनमध्येही अमेरिकन सैन्य अॅक्टिव्ह कोम्बॅटमध्ये उतरलं.

 
युद्ध संपलेलं नाही. ना अर्थव्यवस्था सुधारली आहे. मग  या चार  वर्षांत ओबामांनी मिळवलं तरी काय? हा प्रश्न अनेकजण विचारतील. ज्या माणसाकडे सगळं जग आशेनं  पाहात होतं, ज्याला अँटिसिपेटरी नोबेल पारितोषिक देण्यात आलं, त्यानं नव्या चढाईचे आदेश दिले.असं वर दिसणारं चित्र.

पण एक गोष्ट नमूद करायला हवी, ओबामांनी काही धाडसी निर्णय घेतले , जे आज नाही, तर भविष्यात

 

त्यांची ओळख बनतील. ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याचा आदेश देण, त्याची घोषणा जगासमोर करणं आणि त्यानंतर त्याविषयी चकार शब्दही न काढणं – आपल्या सर्वात मोठ्या यशाचं निवडणुकीत मार्केटिंग  न करण, यासाठी धैर्य लागतं.
ओबामा सत्तेत आले तेव्हा, एक गोष्ट त्यांना लगेचच समजली होती. निवडणुका जिंकणं आणि देश चालवणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ती जाण असल्यानंच आपला अजेंडा बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतले.

बुशविरुद्ध प्रचारात ओबामांच्या दोन घोषणा प्रसिद्ध झाल्या – येस वुई कॅन आणि बी द चेंज यू वाँट टू सी – आपण करू शकतो आणि बदलाची सुरूवात तुमच्यापासून करा.

चार वर्षांनी, एका प्रचारसभेत बोलताना ओबामांनी एका वाक्यात आपलं पुढचं लक्ष्य मांडलं. ‘’आता फोकस युद्धाकडून देश-उभारणीकडे वळवण्याची वेळ आली आहे.’’ ओबामांना, अमेरिकेला आणि कदाचित जगालाही अपेक्षित असलेला बदल तो हाच आहे.  आणि अमेरिकेत  पुन्हा ओबामांची  सत्ता आली, तर हा बदल पाहायला मिळेल हा आशावादही कायम आहे.

Advertisements