फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या अंतिम फेरीत सायना नेहवालचा पराभव झाला. प्रेझेन्टेशन दरम्यान सायनानं चाहत्यांना हसून दाद दिली, पण तिच्या चेहऱ्यावरची निराशा लपत नव्हती.

अव्वल मानांकित सायनाला जपानच्या मिनात्सु मितानीनं पराभूत केलं. अवघ्या ३९ मिनिटांत सायनानं हा सामना १९-२१, ११-२१ असा सरळ गेम्समध्ये गमावला…

मितानीच्या कोर्ट कव्हरेज आणि स्ट्रोक्सना सायनाकडे उत्तर नव्हतं. या पराभवानं सायनाच्या

फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सायना या सामन्यातही गुडघ्याला स्ट्रॅपिंग लावून खेळायला उतरली. ऑलिम्पिकपासूनच सायनाला गुडघेदुखीनं सतावलं होतं. तरिही सायनानं ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. ऑलिम्पिकनंतर सायनानं विश्रांती घेतली. पण तिचा उजवा गुडघा अजूनही त्रास देतोय आणि त्याचाच परिणाम तिच्या हालचालींवर होतो आहे.

तरीही सायना डेन्मार्क ओपनमध्ये खेळायला उतरली. उपांत्य फेरीत सायनानं वर्ल्ड नंबर वन यिहान वँगवर मात केल्यावर सायना आपल्या गुडघेदुखीविषयी बोलली होती. विशेष म्हणजे यिहाननं हा सामना गुडघेदुखीमुळेच अर्ध्यावर सोडून दिला.

मी ऑलिम्पिकनंतर वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेतला, मला त्यामुळे फ्रेश वाटतं आहे. पण प्रत्येक स्पर्धा कठीणच असते. माझा उजवा गुडघा एकदम व्यवस्थित झालेला नाही. पण मला लढण्याची ताकद दिल्याबद्दल इश्वराचे आभार.

जिद्द, अनुभव आणि झुंजार वृत्तीच्या जोरावर सायनानं डेन्मार्क ओपन जिंकलं. पण पॅरीसमध्ये मात्र फायनलचा अडथळा पार करण्यात तिला अपयश आलं.

सायना या सामन्यात थकल्यासारखी वाटली. बॅडमिन्टनसारख्या खेळात पूर्ण कोर्टभर सहजतेनं वावर करता येणं गरजेचं असतं. सायनाला नेमकी हीच गोष्ट जमत नव्हती आणि याचा फायदा मितानीनं उचलला.

टेनिस आणि बॅडमिन्टनसारख्या खेळात गुडघेदुखीचा त्रास स्वाभाविक आहे. कोर्टवर पळताना आणि स्ट्रोक्स खेळताना पायावर, त्यातही गुडघ्यांवर दबाव येतो. पण वयाबरोबरच हे दुखणं वाढत जाऊ शकतं. सायनाला आणखी बराच काळ खेळायचं असेल, तर या दुखण्यावर उपाय शोधायला हवा.

बॅडमिन्टनच्या जगात सायनानं दरारा निर्माण केला आहे. चीनी खेळाडूंना आव्हान देण्याची, त्यांच्यावर मात करण्याची हिंमत दाखवली आहे. तीही अवघ्या बावीस वर्षांच्या वयात. पण आता सायनाची लढाई सुरू आहे फिटनेससाठी… आशा आहे की सायना हाही अडथळा लवकर पार करेल….

Advertisements