२० ऑक्टोबर २०११. लिबियातलं सर्त शहर.

पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलल्या मोअम्मर गडाफीच्या काफिल्यावर नाटो विमानांनी हल्ला केला. एकेकाळी महालात ऐशोआरामात राहणाऱ्या गडाफीला शेवटी लपण्यासाठी एका ड्रेनेज पाईपचा आधार घ्यावा लागाला. बंडखोरांनी गडाफीला पकडून ठार केलं आणि या हुकुमशाहच्या पाशातून लिबियाला मुक्त केलं.

लिबियात ४२ वर्ष अनिर्बंध सत्ता गाजवल्यावर गडाफीचा अखेर अंत झाला सामन्य नागरिकांनी मिळवलेला हा विजय पाहून जग स्तब्ध झालं.

या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गडाफीचा पाडाव ही अरब स्प्रिंगदरम्यान बंडखोरांचं सर्वात मोठं यश मानलं जातं. पण एक वर्षानंतर लिबियातली स्थिती आजही चिंताजनक आहे.

गडाफीच्या अंतानंतर लिबियन नागरिकांनी एका नव्या लिबियाचं स्वप्न पाहिलं. जुलैमध्ये लिबियात नवं सरकार स्थापन करण्यासाठी आणि संविधान तयार करण्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या.

राजकीय दृष्ट्या लिबियात काही प्रमाणात स्थैर्य आलं असलं, तरी सामाजिक पातळीवर अनेक प्रश्न या नव्या लोकशाहीपुढे आ वासून उभे आहेत. वेगवेगळ्या टोळ्यांनी बनलेल्या या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.

६४ दशलक्ष लोकांच्या लिबियात सुरक्षितता सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. गडाफीविरुद्ध लढलेल्या अनेक सशस्त्र बंढखोरांनी आपली अस्त्रं परत केलेली नाहीत. देशात अल-कायदासारख्या मूलतत्त्ववाद्यांचा प्रभाव वाढतो आहे. गेल्या महिन्यातच याचा प्रत्यय आला. ११ सप्टेंबरला बेन्गाझीमध्ये झालेल्या हल्ल्यात अमेरिकन राजदूत ख्रिस स्टिव्हन्स यांचा मृत्यू झाला.

लिबिया अजूनही शांतता आणि सुव्यवस्थेपासून दूर असल्याचंच त्यातून पुन्हा स्पष्ट झालंय. याचाच फायदा दहशतवादी संघटना उठवू शकतात. त्यामुळेच लिबियात स्थिरता येणं जगासाठी गरजेचं आहे.

Advertisements