11 ऑगस्ट 2008.

भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस. कारण याच दिवशी अभिनव बिंद्रानं जिंकलं होतं भारतासाठी ऑलिम्पिकमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक…

10 मीटर एयर रायफल प्रकारात अभिनवनं सुवर्णवेध केला आणि जणू देशातल्या खेळांमध्ये नवी जान फुंकली.

एक जमाना होता, जेव्हा ऑलिम्पिकचं सुवर्ण म्हटलं, की भारतातले क्रीडा चाहते हॉकीच्या सुवर्णकाळाच्या आठवणींमध्येच रमायचे.. पण अभिनवनं ते चित्र बदललं.. बीजिंगमध्ये जगातल्या सगळ्या नेमबाजांना मागे टाकत, अभिनवनं सुवर्णलूट केली.

चार वर्षांनंतर आता अभिनवला खुणावतंय आणखी एक आव्हान.. लंडन ऑलिम्पिकचं सुवर्णपदक..

Abhinav Bindra

लंडनमध्ये अभिनव सुवर्णकमाई करणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. नेमबाज अंजली भागवतच्या मते, अभिनव फायनलमध्ये पोहोचला, तर सुवर्णपदक नक्कीच जिंकेल..

प्रचंड एकाग्रता, मेहनत, परिपूर्णतेचा ध्यास यांमुळेच अभिनव इथवर पोहोचलाय. आणि लंडन ऑलिम्पिकआधी, अगदी वेळेत त्याला लय सापडताना दिसतेय.

यंदा जानेवारी महिन्यात दोहा इथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत अभिनवनं सुवर्णपदकाची कमाई केली होती. जून महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही अभिनवनं सातत्यानं चांगल्या स्कोअरची नोंद केलीय.

लक्ष्य साधण्यासाठी काहीही करण्याची तयारी, जिद्द आणि आत्मविश्वास यांची अभिनवकडे अजिबात कमी नाही. पण आता आणखी एक गोष्ट त्याच्या बाजूनं आहे. ऑलिम्पिक फायनलमध्ये खेळण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव…

तरिही, यंदा अभिनवचं मिशन आणखी खडतर बनलंय. कारण याआधी एकाही रायफल शूटरनं आपलं मेडल कायम राखलेलं नाही. पण अभिनवचा जन्मच जणू इतिहास रचण्यासाठी झालाय.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. अभिनवचंही तसंच आहे. लहान वयातच अभिनवमधल्या टॅलेण्टची चुणूक दिसली होती

1998 मध्ये, वयाच्या 15 व्या वर्षी अभिनव कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला. वयाच्या सतराव्या वर्षी अभिनव सिडनी ऑलिम्पिकमध्ये खेळला, त्यावेळी अभिनवला फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण तिथेच रोवली गेली एका स्वप्नाची बीजं..

मग चार वर्षांनी अथेन्समध्ये पात्रता फेरीत ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडूनही अभिनवला, मेडल जिंकता आलं नाही. फायनलमधल्या निराशाजनक कामगिरीनं अभिनवच्या स्वप्नाला नवी चेतना दिली. आणि त्याचंच प्रतिबिंब 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळालं.

ऑलिम्पिकशिवाय कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही अभिनवनं शानदार कामगिरी बजावलीय.

2002च्या मॅन्चेस्टर कॉमनवेल्थ गेम्समध्ये अभिनवनं वैयक्तिक रौप्यपदक मिळवलं.

2006च्या मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये अभिनवला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

तर दिल्लीत 2010 साली अभिनवनं पुन्हा रौप्यपदकाची कमाई केली.

2002, 2006 आणि 2010च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं एयर रायफल प्रकारात सुवर्णपदकं मिळवली, त्यात अभिनव बिंद्राचं महत्वाचं योगदान होतं.

2002 मध्ये समीर आंबेकरच्या साथीनं तर 2006 आणि 2010मध्ये गगन नारंगच्या साथीनं अभिनवनं भारतासाठी टीम इव्हेण्टमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

वर्ल्ड चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक जिंकणारा अभिनव पहिलाच भारतीय नेमबाज ठरला.

2006 साली झाग्रेबमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अभिनवनं ही कामगिरी बजावली होती..

वडिलांचं भक्कम आर्थिक पाठबळ असल्यानं अभिनवला कोणत्याही गोष्टीची चणचण कधीच जाणवली नाही. उत्तम रायफल आणि स्वतःची खाजगी शूटिंग रेंज, परदेशात सराव, अशा सोयी सुविधा अभिनवला उपलब्ध झाल्या. पण त्याच्याकडून अपेक्षाही वाढल्या आणि दरवेळी अभिनवनं कामगिरीचा आलेख चढता ठेवला. मात्र अभिनवचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता.

साल 2006ची गोष्ट.

मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान अभिनवला पाठदुखीनं ग्रासलं. अभिनवचं दुखणं काही आठवड्यांतच एवढं वाढलं की त्याला साधी रायफलही उचलणं जड जात होतं. जवळपास वर्षभर अभिनव नेमबाजीपासून दूर राहिला. त्याचं करियर जवळपास संपल्यात जमा होतं. पण दुखापतीवर मात करत, अभिनवनं बीजिंगमध्ये इतिहास रचला. या वर्षाच्या सुरूवातीला एशियन चॅम्पियनशिपमध्येही अभिनवनं सुवर्ण जिंकलं, तेव्हा तो फ्लुनं त्रस्त होता. म्हणतात ना, असा अडथळा, चॅम्पियन्सची जिंकण्याची इच्छा आणखी प्रबळ करतो. अभिनवच्या बाबतीत तेच घडलं.

आता लंडनमध्ये इतिहास पुन्हा एकदा अभिनवला खुणावतोय. वूलविचच्या रॉयल आर्टिलरी बराकीत लंडन ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेचं आयोजन होणार आहे. 30 जुलैला 10 मीटर एयर रायफल शूटिंग स्पर्धा खेळवली जाईल.

बीजिंगआधी ऑलिम्पिकचं सुवर्ण हे अभिनवचं स्वप्न होतं, पण आता, तीच कामगिरी लंडनमध्ये साधणं ही त्याच्यासाठी एक जबाबदारी बनलीय. कारण देश अभिनवकडे अपेक्षेनं पाहतोय…

– जान्हवी मुळे

Advertisements