जिद्दी, कणखर आणि खंबीर… सायना नेहवाल बॅडमिन्टन कोर्टवर उतरतेय ती जिंकण्याच्याच इराद्यानं. भारताची फुलराणी अजिबात हार मानणाऱ्यांतली नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय…

इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत सायनाच्या खेळानं तिच्या चाहत्यांना आणि प्रतिस्पर्ध्यांनाही थक्क केलंय. मॅचपॉइंटवरून सायनानं सामना खेचून आणला आणि जिंकलासुद्धा..

इंडोनेशिया ओपन म्हणजे बॅडमिन्टन सुपर सीरीजची प्रीमियर इव्हेण्ट. या स्पर्धेत महिला एकेरीत जगातल्या टॉप टेन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मात्र त्या सर्वांमध्ये सायना अव्वल ठरली.

शुरेईनं यंदा इंडियन ओपन, जर्मन ओपन, बॅडमिन्टन एशिया चॅम्पियनशिप जिंकलीय. बॅडमिन्टनची सर्वात मानाची स्पर्धा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्येही शुरेईनं बाजी मारली. इंडोनेशिया ओपनच्या फायनलआधी शुरेईनं सलग ३१ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण सायनानं शुरेईची घोडदौड रोखली..
सुवर्णपदकापर्यंतच्या आपल्या वाटचालीत सायनानं दोन चायनीज खेळाडूंचं आव्हान मोडीत काढलं.

बॅडमिन्टनमध्ये मोठं यश मिळवायचं असेल, तर मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरतो, चीनचे खेळाडू. जागतिक रँकिंगचा विचार केला, तरी वर्ल्ड नंबर फाईव्ह सायनाच्या वर म्हणजे जगातल्या पहिल्या चार खेळाडू चीनच्याच आहेत. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवण्यात चीनच्या खेळाडूंचा हात कोणीच धरू शकणार नाहीत. त्यांचा सामना करण्यासाठी सायनानं आपला बचाव आणखी भक्कम केलाय..

इंडोनेशिया ओपनमध्येही तेच दिसून आलं. आधी क्वार्टर फायनलमध्ये शिजियान वँग आणि फायनलमध्ये ली शुरेईनं सायनाला जखडून ठेवलं. पण नेहमीसारखं आक्रमक न होता सायनानं नेटानं किल्ला लढवला आणि विजय मिळवला.

ऑलिम्पिकसाठी आपण तयार असल्याचंच सायनानं दाखवून दिलंय. पण तिला अशीच मेहनतही घ्यावी लागेल असं कोच पुलेला गोपीचंदला वाटतं.

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सायनानं क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र आता लंडनमध्ये कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही असाच सायनाचा निर्धार आहे..

ऑलिम्पिक काही आठवड्यांवर आलेलं असताना सायनाला लय सापडलीय. आणि म्हणूनच तिच्याकडून मेडलच्या आशाही वाढल्यायत..

जान्हवी मुळे, एबीपी माझा

Advertisements