राफेल नदालच आहे किंग ऑफ क्ले.. पॅरिसच्या लाल मातीत पुन्हा झाला नदालचाच राज्याभिषेक…

फ्रेन्च ओपनमध्ये राफेल नदालनं आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय. खरंतर ही स्पर्धा सुरू होण्याआधी नदाल आपलं जेतेपद राखू शकेल का अशी चर्चा रंगली होती. कारण नोवाक जोकोविचनं सलग तीन ग्रँड स्लॅम फायनल्समध्ये नदालचा पराभव केला होता. फायनलमध्येही जोकोविचनं दोन सेट गमावल्यावर लढाऊ खेळ केला. पण अखेर नदालनं जोकोविचला रोखलंच..

या डबल फॉल्टबरोबरच जोकोविचनं सर्व्हिस, गेम, सेट आणि मॅचही गमावली. नदालनं 6-4, 6-3, 2-6, 7-5 असा विजय मिळवला आणि सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सातव्यांदा फ्रेन्च ओपनची ट्रॉफी उचलली. या विजयाबरोबरच नदालनं बियाँ बोर्गचा सर्वाधिक सहा फ्रेन्च ओपन जेतेपदांचा विक्रमही मोडीत काढलाय..

नदालच्या खात्यात आता अकरा ग्रँड स्लॅम जेतेपदं जमा झालीयत. नदालनं सातवेळा फ्रेन्च ओपन, दोनदा विम्बल्डन आणि एकेकदा यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलंय. शिवाय त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी ना जोकोविच कडे आहे, ना रॉजर फेडररकडे… ती म्हणजे ऑलिम्पिकचं सुवर्ण… बीजिंगमध्ये नदालनं सुवर्णपदकाची कमाई केली होती.

नदाल फेडररच्या छायेतून कधीच बाहेर आला… जोकोविचच्या चढत्या काळात नदालला लागलेलं ग्रहणही आता सुटलंय. फ्रेन्च ओपनमधल्या नदालच्या विजयानं टेनिसमधल्या आणखी एका ग्रेट रायव्हलरीमध्ये नवी जान ओतली…. नदाल आणि जोकोविचमधली ग्रँड स्लॅम रायव्हलरी.

2005च्या फ्रेन्च ओपनपासून म्हणजे मागच्या 29 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 28 वेळी ते रॉजर फेडरर, राफेल नदाल किंवा नोवाक जोकोविच या तिघांपैकी एकानंच जेतेपद मिळवलंय. फेडरर आणि नदालची सद्दी संपवून जोकोविच गेल्या वर्षी टॉपवर पोहोचला. जोकोविचचं ते वर्चस्व नदालनंच संपवलंय. एकीकडे फेडरर कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्याकडे झुकतोय आणि त्याचवेळी नदाल आणि जोकोविचमधली स्पर्धा रंगात आलीय..

ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या फायनलमध्ये आजवर पाचवेळा नदाल आणि जोकोविच आमने-सामने आले आहेत. दोघांमधला ही सलग चौथी ग्रँड स्लॅम फायनल होती आणि विशेष म्हणजे ह्या चारही सामन्यांमध्ये मॅरेथॉन मुकाबला पाहायला मिळाला.

फ्रेन्च ओपनमधल्या पराभवानंतरही नोवाक अव्वल स्थानावर कायम आहे. आणि त्याच्या रँकिंगला सर्वात तगडं आव्हान आहे ते नदालकडूनच. नदाल सव्वीस वर्षांचाय, तर जोकोविचचं वय आहे पंचवीस.. म्हणजे पुढचा बराच काळ या रायव्हलरीचा आनंद लुटता येईल..

– जान्हवी मुळे

Advertisements