चौसष्ठ घरांवर आनंदचं राज्य अबाधित राहिलंय…

मॉस्कोमध्ये झालेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदनं इस्रायलच्या बोरिस गेलफँदवर मात केली. मात्र त्यासाठी चाहत्यांना टायब्रेकरपर्यंत वाट पाहावी लागली. या लढतीत 12 गेम्सनंतरही आनंद आणि गेलफँद 6-6 असे बरोबरीत होते. मग टायब्रेकरमध्ये रॅपिड चेस सुरू झाल्यावर आनंदनं मागे वळून पाहिलं नाही.

टायब्रेकरमध्ये आनंदनं 2.5 विरुद्ध 1.5 असा विजय मिळवला आणि सलग चौथ्यांदा बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदावर कब्जा केला… आनंदच्या विजयाची बातमी पोहोचताच त्याच्या चेन्नईतल्या घरीही सेलिब्रेशन सुरू झालं…

आनंदचं हे सलग चौथं आणि एकूण पाचवं विश्वविजेतेपद आहे. साल 2000 मध्ये आनंदनं पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवलं. मात्र त्यावेळी बुद्धिबळाचं जग दोन संघटनांमध्ये विभागलं होतं. दोन्ही गट एकत्र आल्यावर 2007 मध्ये आनंदनं निर्विवाद विश्वविजेतेपद मिळवलं. आणि त्यानंतर गेली सात वर्ष बुद्धिबळाच्या जगावर आनंदचंच राज्यय. 2007, 2008 आणि 2010मध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आनंदनं जेतेपद मिळवलं. त्याशिवाय 2003 मध्ये झालेल्या रॅपिड चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही आनंदनं जेतेपद मिळवलं होतं..

बुद्धिबळाच्या विश्वावर आनंदचं निर्विवाद वर्चस्व आता पुन्हा सिद्ध झालंय. विश्वविजेतेपदाबरोबरच आनंदला 14 लाख यूएस डॉलर्सचं बक्षीसही मिळालंय. देशभरातून आनंदवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय..  बुद्धिबळाच्या पटावर आनंदही पंचवीस वर्षांपासून अधिराज्य गाजवतोय. वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षीही आनंदची विजयाची भूक आणि लढण्याची हिंमत कायम आहे.

आनंदसोबत खेळणारे कित्येकजण आता मागे पडलेयत. अनातोली कारपॉव्ह, गॅरी कॅस्परॉव्हसारखे चॅम्पियन्सही मावळलेयत.. व्लादिमिर क्रॅमनिक, व्हेसलिन टोपलोव्ह आणि आता बोरिस गेलफँदचं आव्हानही आनंदनं परतवून लावलंय. आनंदला आता प्रतीक्षा आहे नव्या पिढीच्या चॅलेन्जरची….

– जान्हवी मुळे

Advertisements