ओसामा बिन लादेन अजूनही जिवंत आहे.. मी असं म्हणतेय, याचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल. कारण अमेरिकेच्या नेव्ही सील्सनी अल कायदाच्या या प्रमुखाचा अंत केला, त्याला आता एक वर्ष लोटलंय.. पण खरंच, ओसामा आजही जिवंत आहे. कारण त्याची संघटना अल कायदा अजूनही,संपलेली नाही..

2 मे २०११ रोजी पहाटे पहाटे, पाकिस्तानच्या अबोटाबादमधले लोक हेलिकॉप्टर्स आणि गोळीबाराच्या आवाजानं जागे झाले. नेमकं काय घडलंय, हे कळेपर्यंत मात्र सकाळ उजाडली. त्या ऑपरेशन नेपच्युन स्पिअरमध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील्सच्या जवानांनी खात्मा केला होता जगातल्या मोस्ट वॉण्टेड अतिरेक्याचा.. ओसामा बिन लादेनचा..

खरंतर ओसामा आणि अल कायदा हे अमेरिकेचंच बायप्रोडक्ट. सौदी अरेबियातल्या धनढ्य बिन लादेन ग्रुपचा एक वारसदार. कडव्या विचारसरणीचा अरब. अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून बसलेल्या रशियन सैन्याच्या विरोधात लढणाऱ्या मुजाहिदीनांबरोबर लादेनही युद्धात उतरला. मुजाहिदिनांना अमेरिकेनंही छुपा पाठिंबा दिला होता. त्या जिहादचा हीरोम्हणून लादेनचा अरब विश्वात गौरवही झाला. पण कुवेतच्या मदतीसाठी अमेरिकेनं इराकवर हल्ला केलात्या हल्ल्याला सौदी अरेबियानं पाठिंबा दिलाआणि लादेनचं आणि सौदी सरकारचं बिनसलं. देशाबाहेर हाकलला गेल्यावर लादेननं आधी सुदानमग अफगाणिस्तान आणि शेवटी पाकिस्तानात आश्रय घेतला. अफगाणिस्तानात असतानाच अल कायदानं अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याची योजना बनवली आणि ती तडीसही नेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानात अल कायदा आणि तालिबानविरुद्ध युद्ध पुकारलं, पण लादेनला हुडकून काढण्यात दहा वर्ष गेली.

ऑपरेशन नेपच्यून स्पिअरमध्ये लादेन मारला गेला, तेव्हा नाईन इलेव्हनच्या अमेरिकेतील हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पण अंत केवळ ओसामाचा झालाय. ओसामाला मानणारे, त्याच्या मार्गावरून चालणारे अजूनही जिवंत आहेत. नुकतंच अफगाणास्तानात झालेल्या हल्ल्यांनी आणि पाकिस्तानात वाढलेल्या दहशतवादी कारवायांनी हीच गोष्ट दाखवून दिली.

ओसामा मारला गेल्यान अल कायदावर परिणाम नक्कीच झाला. त्यांच्या हालचाली मंदावल्यात, पण थांबलेल्या नाहीत. मुळात अल कायदासारख्या संघटना कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाशिवाय तग धरून राहू शकतील अशा पद्धतीनंच उभारल्या जातात. त्यामुळेच लादेन संपल्यावरही अल कायदाचं आतंक पसरवण्याचं काम थांबलेलं नाही.

गेल्या वर्षभरातलं जागतिक वातावरणही दहशतवादासाठी आणखी पोषक बनलंय. येमेनमध्ये अस्थिरता, लिबियन क्रांती, सुदानमध्ये जमा झालेले युद्धाचे ढग, सिरियातलं अराजक या सगळ्या घडामोडींमुळे अरब विश्वात मूलतत्ववाद्यांचा प्रभाव वाढताना दिसतोय. ((एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की लादेन मुळचा येमेनचा आहे, त्याला सौदी अरेबियातून बाहेर काढल्यावर सुदाननं आश्रय दिला होता. त्यामुळे या भागात लादेनबद्दल आजही आत्मीयतेचं वातावरण आहे.)) त्यातच इराक, अफगाणिस्तानातली युद्धं आणि त्यामुळं अमेरिकेच्या आणि पर्यायानं जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अल कायदाच्या पथ्थ्यावरच पडलाय.

1980 आणि 90च्या दशकात आशिया आणि आफ्रिकेतल्या हजारो मुस्लीम तरुणांना ओसामानं प्रेरणा दिली, आजही अरब विश्वात ओसामाचा, त्याहीपेक्षा त्याच्या विचारसरणीचा प्रभाव कायम आहे.

त्यामुळेच आजही अल कायदाशी संलग्न अनेक गट फोफावताना दिसतायत. त्यात सर्वात शक्तिशाली बनलाय अल कायदा इन अरेबियन पेनिनसुला अर्थात AQAP . दक्षिण येमेनमध्ये या संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली आहेत आणि तिथे समांतर सरकार चालवलंय.

एक्यूएपीप्रमाणेच येमेनमधील इस्लामिक जिहाद, लिबियातील इस्लामिक फायटिंग ग्रुप, सोमालियातील अल शबाब, नायजेरियातील बोको हराम, अल कायदाचे इराक, अल्जिरीया, माली आणि चीनमधील गट, पाकिस्तान तालिबान आपापल्या प्रदेशात आतंक पसरवण्याच्या तयारीत आहेत.

एक ओसामा मारला गेलाय, पण इतर हजारो ओसामा आजही जिवंत आहेत. जगापुढचं संकट संपलेलं नाही.

–       जान्हवी मुळे

Advertisements