एरवी विजयानंतर मैदानावर आरोळी ठोकणारा युवराज सिंग तुम्हाला आठवत असेल..

दिल्ली विमानतळावर युवी दाखल झाला, तोही एक विजय मिळवूनच.. यावेळी त्यानं कोणतीही आरोळी ठोकली नसली, तरी त्याची देहबोली सकारात्मकच होती.. युवराजनं चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं, आणि जणू कॅन्सरला ठेंगा दाखवला… जणू त्याला कॅन्सरला सांगायचंय, मी तुझ्यावर मात केलीय, आणि लवकरच मैदानात परतणार आहे..

कॅन्सरसारख्या आजारावर मात करणं, आणि त्यानंतर पुन्हा मैदानात खेळायला उतरणं, हे येरागबाळ्याचं काम नाही. पण युवराजची वृत्ती एखाद्या लढवय्याची आहे. त्याला काहीही अशक्य नाही.

याआधीही अनेक खेळाडूंनी कॅन्सरला हरवून पुन्हा मैदान गाजवलंय…

अशा लढवय्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठी कहाणी आहे लान्स आर्मस्ट्राँगची..

लान्स आर्मस्ट्राँग – सायकलिंग

अमेरिकेच्या या सायकलिस्टला 1996 साली वयाच्या पंचविशीत टेस्टिक्युलर कॅन्सर झाला.

कॅन्सरनं आर्मस्ट्राँगच्या मेंदूवरही आक्रमण केलं.

मात्र त्यावर मात करून आर्मस्ट्राँगनं पुन्हा सायकलिंगमध्ये कमबॅक केलं, आणि टूर द फ्रान्स ही सर्वात मानाची शर्यत जिंकली.

तीही एकदा नाही, दोनदा नाही, तर सलग सातवेळा..

मारियो लेमियू – आईस हॉकी

आईस हॉकीच्या ग्रेटेस्ट आयकॉन्सपैकी एक म्हणजे कॅनडाचा मारियो लेमियू..

1993 मध्ये कारकीर्दीच्या ऐन भरात असताना लेमियूला हॉजकिन्स लिम्फोमा झाला.

रेडिएशन ट्रीटमेंटनंतर लेमियूनं वर्षभरानं कमबॅक केलं आणि पुढे जवळपास बारा वर्ष तो खेळत राहीला.

एरिक एबिडाल – फुटबॉल

फ्रान्स आणि बार्सिलोनाचा डिफेण्डर एरिक अबिडलच्या यकृतावर ट्यूमर झाल्याचं गेल्या वर्षी मार्च महिन्यात स्पष्ट झालं. शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांनी तो मैदानावर परतला आणि मे महिन्यात चॅम्पियन्स लीग फायनलमध्येही खेळला.

एलिसा क्लेबानोव्हा – टेनिस

गेल्या वर्षी जुलैत एलिसाला हॉजकिन्स लिम्फोमा झाल्याचं स्पष्ट झालं. 22 वर्षांच्या एलिसाची कारकीर्दच नाही, तर आय़ुष्यच त्यामुळे धोक्यात आलं.

उपचारानंतर एलिसा पूर्णपणे बरी झाली, आणि गेल्या महिन्यात तिनं व्यावसायिक टेनिसमध्ये कमबॅकही केलंय..

कॅन्सरवर मात करण्याची किमया क्रिकेटर्सनीही साधलीय.

सायमन ओडोनेल – क्रिकेटर, ऑस्ट्रेलिया

1987 ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या सिमोन ओडोनेलला स्पर्धेनंतर लगेचच कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. केमोथेरपीनंतर 1988-89मध्ये ओडोनेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं.

डेव कॅलॅगन – क्रिकेटर, दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर डेव्ह कॅलेगनला 1991 मध्ये कॅन्सरवर उपचार करून घ्यावे लागले. पण पुढच्या वर्षीच त्यानं राष्ट्रीय संघात पदार्पण केलं.

मॅथ्यू वेड – क्रिकेटर, ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेडला वयाच्या सोळाव्या वर्षी टेस्टिक्युलर कॅन्सर झाला.

केमोथेरपीनंतर वेड बरा झाला, त्यानं क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. वेडनं गेल्या वर्षी ट्वेण्टी20 आणि यंदा वन डेत पदार्पणही केलं.

या सर्वांकडून युवराजलाही प्रेरणा मिळू शकते..

कॅन्सरवर मात करण्यासाठी लागणारी जिद्द आणि क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची इच्छा, ताकद, युवराजकडे आहेच. पण त्यानं आता पूर्ण फिट झाल्यावरच युवराजनं मैदानात परतावं. य़ुवीला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

जान्हवी मुळे, स्टार माझा.

Advertisements