पाकिस्तानी राष्ट्रध्यक्ष आसिफ अली झरदारींचा भारत दौरा म्हणजे एक खाजगी दौरा होता. पण तरिही वाट वाकडी करून झरदारी दिल्लीला गेले आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

खरंतर दोन राष्ट्रनेत्यांमधली खाजगी भेटही राजकीय महत्त्वाची असते. तरिही झरदारी आणि मनमोहन भेटीदरम्यान अपेक्षेप्रमाणेच कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. मात्र पाकिस्तानसाठी आणि स्वतः झरदारींसाठी ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान एकाकी

एकीकडे ‘ब्रिक्स’ (BRICS) म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या पाच राष्ट्रांच्या बैठकीनं भारत,  रशिया आणि चीन यांच्यातलं नातं घट्ट झालंय. तर दुसरीकडे चीननं शिन झियांग प्रांतातल्या दहशतवादाचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळं पाकिस्तानच्या चीनबरोबरच्या संबंधांमध्येही तेढ निर्माण होतेय.

त्यातच मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईदसह अनेक दहशतवाद्यांना अभय दिल्यानं पाकिस्ताननं अमेरिकेचीही नाराजी ओढवून घेतलीय. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन सरकारवर तिथल्या तमिळ नागरिकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांत ठराव मांडण्यात आला, त्यावेळीही पाकिस्ताननं श्रीलंकन सरकारची बाजू घेतली होती. हे पाऊल अमेरिकेच्या विरोधात जाणारं. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातली दरी आणखी रुंदावतेय.

त्याशिवाय नुकतंच सेऊलमध्ये झालेल्या अणू परिषदेत पाकिस्तानच्या धोरणांवर टीका झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान आणखीनच एकाकी पडलंय.

भारताबरोबर व्यापारी संबंध

जवळचे नातेवाईक दूर होतात, तेव्हा शेजाऱ्यांना तरी सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न माणूस करतो, पाकिस्तानचंही सध्या तसंच चाललंय. जगभर विरोध वाढणं पाकिस्तानला परवडणारं नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचं मन वळवण्यासाठी पाकिस्तानला भारताशी संबंध सुधारणं गरजेचं आहे. म्हणूनच तर पाकिस्ताननं भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, म्हणजेच व्यापारासाठी पहिली पसंती दिलीय.

पाकिस्तान आणि अमेरिकेत निवडणुका

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच झरदारी आणि पंतप्रधान गिलानींच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीला आपण देशाची प्रतिमा सुधारत असल्याचं चित्र दाखवायचंय. तर अमेरिकेतही यंदा होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक संबंधांमध्ये सुधारण ही बराक ओबामांसाठी जमेची बाजू ठरू शकते. म्हणूनच अमेरिकेनंही झरदारींच्या भारत-भेटीचं स्वागत केलं.

झरदारींचं असुरक्षित भवितव्य

आसिफ अली झरदारी सध्या पाकिस्तानचे राष्ट्रपती असले, तरी त्यांच्या पदावर आणि भवितव्यावर टांगती तलवार कायम आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत. अशा परिस्थितीत झरदारींना पाकिस्तानातील जनतेचा विश्वास जिंकायचाय. भारताकडून काही पदरात पडलं तर, आपलं काम सोपं होईल अशी झरदारींना आशा असावी.

बिलावलचा प्रसार

झरदारी-मनमोहन भेटीइतकीच यावेळी चर्चा झाली ती बिलावल भुट्टो-झरदारी आणि राहुल गांधी या पुढच्या पिढीच्या नेत्यांची भेटीची.

अवघ्या २३ वर्षांच्या बिलावलनं पाकिस्तान पिपल्स पार्टीचा चेअरमन म्हणून अजूनतरी आपली वेगळी छाप पाडलेली नाही. मात्र तरिही भविष्यातला पाकिस्तानचा नेता म्हणून बिलावलला प्रोजेक्ट केलं जातं आणि भारताच्या भविष्यातल्या नेत्याला भेटणं बिलावलसाठी तरी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

– जान्हवी मुळे, स्टार माझा

http://starmajha.newsbullet.in/india/34-more/14970-2012-04-08-15-30-40

Advertisements