भारताच्या शेजारच्या या छोट्याशा देशानं लोकशाहीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरूवात केलीय. त्या वाटेवरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एक एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुका.

म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान सू की ही निवडणूक लढवतायत. खोमू या संसदीय क्षेत्रातून सू कींनी उमेदवारी दाखल केलीय. ६६ वर्षांच्या सू की 1989 पासून नजरकैदेत होत्या. नोव्हेंबर २०१०मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. आणि गेल्य वर्षी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

गेली सुमारे 50 वर्ष म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशाही सुरू होती. ढेपाळत चाललेली आर्थिक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा वाढता दबाव पाहून जनरल थॅन श्वेना ही पावलं उचलण्याशिवाय पर्याय नव्हता. थान श्वेनी सूत्रं थिएन सिनकडे सोपवली, त्यांना राष्ट्रपतीपद दिलं आणि मग लष्करानं सत्तेचं हस्तांतरण करण्यास सुरूवात केली. अर्थात सत्तेच्या नाड्या अजूनही लष्कराच्याच हाती आहेत.

काही का असेना, पण म्यानमामध्ये सुधारणांची सुरूवात झालीय. त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या, अपेक्षेप्रमाणेच लष्करानं उभ्या केलेल्या नेत्यांनाच त्यात विजय मिळाला. आता होणाऱया पोटनिवडणुकाही निःपक्षपातीपणे पार पडतील का हे सांगता येणं कठीण आहे.. गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर फार काही फरक पडलेला. त्यामुळेच या पोटनिवडणुकांबद्दल लोकांच्या मनात जितकं कुतूहल आहे, तेवढीच साशंकताही आहे..

मात्र तरिही सू किंनी त्यात सहभाग घेतलाय. कारण त्यानिमित्तानं या देशात लोकशाहीला पोषक वातावरण निर्माण होतंय. संसदेवर निवडून जाऊन सू कींना सरकारचा विरोध करता येईलच, शिवाय 2015मध्ये त्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतात. त्यामुळंच या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

नोबेल विजेत्या सू की आणि त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीबद्दल आदर असला, तरी मतदार लष्करशहांच्या दबावाखाली येऊ शकतात, ही भीती कायम आहे. म्हणूनच या निवडणूकीवर आंतरराष्ट्रीय समुदाय बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

खनिजसंपत्तीनं संपन्न असलेल्या म्यानमारला चीनचा शेजार लाभलाय. त्यामुळेच भारतानं तिथल्या लष्करशहांशी घनिष्ठ नातं जोडलं, तर आंग सान सू कींबरोबरही भारतीयांचं जिव्हाळ्याचं नातंय. ईशान्य भारतील सुरक्षेसाठीही म्यानमारमध्ये शांतता आणि सुव्यवस्था असणं गरजेचंय. त्यामुळेच भारतासाठीही या निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणारेय.

– जान्हवी मुळे

(link t my old post about Suu Kyi, Myanmar and India https://janhavee.wordpress.com/2010/11/24/%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/ )

Advertisements