12 मार्च, 2011

स्थळ – नागपूरचं नवं व्हीसीए स्टेडियम

प्रतिस्पर्धी – दक्षिण आफ्रिका

मॉर्ने मॉर्कलच्या चेंडूवर एक धाव काढून सचिननं आपलं शतक पूर्ण केलं.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचं ते 99वं शतक होतं… त्यानंतर एक वर्ष उलटलं, पण हे क्षण परत अनुभवायला मिळालेले नाहीत…

एक वर्ष. म्हणजे 52 आठव़डे. 365 दिवस… एवढा मोठा कालावधी लोटला, तरी शंभराव्या शतकाची प्रतीक्षा कायम आहे.

या 365 दिवसांमध्ये सचिन टेस्ट आणि वन डे मिळून 22 सामने खेळलाय, आणि त्यानं एकूण 179 आंतरराष्ट्रीय धावा जमा केल्यायत. गेल्या वर्षभरात सचिननं 11 कसोटी सामन्यांमध्ये 37.04च्या सरासरीनं 778 धावा केल्यायत. तर वन डेत 11 सामन्यांमध्ये 301 धावा केल्यायत. सचिननं यादरम्यान कसोटीत 6 आणि वन डेत 2 अशी एकूण 8 अर्धशतकं ठोकलीयत.

मास्टर ब्लास्टरनं गेल्या वर्षभरात चारवेळा 80 धावांचा टप्पा ओलांडला आणि त्यापैकी दोन वेळा नव्वदचा आकडाही पार केलाय. मात्र शतकाच्या भोज्याला शिवण्यात त्य़ाला अपयशच आलंय.

खरंतर जानेवारी 2010 ते 12 मार्च 2011 या सव्वा वर्षाच्या कालावधीत सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 11 शतकं ठोकली.

पण 12 मार्च 2011 नंतर असं काय घडलं, की सचिन आंतरराष्ट्रीय शतकापासून वंचित राहिला?  सचिन आणि शंभराव्या शतकाच्या मार्गात कोणत्या गोष्टींनी खोडा घातला??

  • वेस्ट इंडीज टूरऐवजी विश्रांती

खरंतर विश्वचषकानंतरही मास्टर ब्लास्टर फॉर्ममध्ये होता. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सचिननं कोची टस्कर्सविरुद्ध खेळताना 66 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावा तटवल्या. पण त्यानंतर चित्र पालटलं.

आयपीएलनंतर सचिननं विश्रांतीचा निर्णय घेतला. वैयक्तिक कारणांसाठी, घरच्यांना वेळ देण्यासाठी सचिननं वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतली. मात्र त्यामुळे सचिनची लय बिघडली.

सचिनच्या फॉर्ममध्ये घसरण झाली. इंग्लंड दौऱ्यावरही त्याचाच प्रत्यय आला.. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये सचिननं 4 कसोटी सामन्यांमध्ये 2 अर्धशतकं ठोकली. पण तो आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. आठ डावांमध्ये सचिननं केवळ 273 धावा केल्या. चौथ्या कसोटी सामन्यात ओव्हलवर पहिल्यांदाच शतकांचं महाशतक आवाक्यात दिसू लागलं. पण 91 धावांवरच सचिन बाद झाला..

  • गोलंदाजांचा सचिनसाठी सापळा

एरवी विक्रमांचे डोंगर रचणाऱ्या सचिनला या एका विक्रमापासून रोखण्यासाठी गोलंदाजांनीही प्रयत्नांची शर्थ केली. सचिन फलंदाजीसाठी आलाय म्हटल्यावर प्रतिस्पर्धी गोलंदाजही टिच्चून गोलंदाजी करताना दिसले.

गोलंदाजांनी नवे नवे सापळे रचले आणि सचिन मोक्याच्या क्षणी त्यात अडकला, असं चित्र वारंवार दिसू लागलं. वानखेडे स्टेडियमवर, घरच्या मैदानात खेळताना सचिन 94 धावांपर्यंत पोहोचला. पण रवी रामपॉलसारख्या गोलंदाजानंही सचिनला शतकापासून रोखलं.

सचिनसमोर एरवी हतबल होणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनीही यावेळी मात्र दुप्पट जोषानं खेळ केला. आणि मास्टर ब्लास्टरला शंभराव्या शतकासाठी वाट पाहायला लावली.

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सचिन कोषात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सचिनला पुन्हा फॉर्म गवसल्यासारखं दिसलं.

मेलबर्नमध्ये सचिननं पहिल्या डावात 73 आणि दुसऱ्या डावात 32 धावा केल्या, तर सिडनी कसोटीत त्यानं पहिल्या डावात 41 आणि दुसऱ्या डावात 80 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियात पहिल्या दोन कसोटींमध्ये सचिन मोकळेपणानं खेळला. पण सचिनला समोरून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन वाढत गेलं.

डाव सांभाळायचा की शतकाचा पाठलाग करायचा हे कोडं बहुदा सचिनला पडलं. तो कोषात गेला. त्यामुळेच मग वन डे मालिकेतही सचिन आपला नैसर्गिक खेळ करू शकला नाही. शतकांचं शतक पूर्ण करण्याचं स्वप्नही दुरावत गेलं…

असं म्हणतात की, क्रिकेट इज ए ग्रेट लेव्हलर. महान खेळाडूही शेवटी माणसंच आहेत, असं क्रिकेटचा खेळच दाखवून देतो. डॉन ब्रॅडमनना 100ची सरासरी गाठण्यासाठी चारच धावा हव्या होत्या, पण नियतीनं त्यांना त्या चार धावा करू दिल्या नाहीत. आता शतकांच्या शतकाच्या उंबरठ्यावर सचिनलाही नियतीनं तिष्ठत ठेवलंय.

जान्हवी मुळे, स्टार माझा.

Advertisements